सध्या ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. त्यामुळे घरीच असतो. परिचितांचे फोन येतात. त्यातल्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा असतो की, “सध्या काय लिहितो आहेस?” मी उत्तर देतो की, “फ्रान्सचा घटनात्मक इतिहास, फ्रेंच राज्यक्रांती, तिचे तत्त्वज्ञान याचा अभ्यास करतोय.” कोरोना-कोरोनाच्या बातम्या वाचून, ऐकून तुम्हा सर्वांना कंटाळा आला असेलच, म्हणून थोड्या रूचीपालटासाठी हा एक नवीन विषय...
कोणत्याही देशाची राज्यघटना त्या देशाचा इतिहास समजल्याशिवाय समजणे फार अवघड आहे. पहिल्या शतकापासून फ्रान्सच्या इतिहासाला सुरुवात होते. तिथून सुरुवात केली, तर हा इतिहासही इतका चित्रविचित्र आणि हजारो घटनांनी भरलेला आहे की, याचा पूर्ण आढावा घेणे हे फार थकविणारे काम आहे. हा इतिहास वाचताना काही राण्यांचा विषय येतो. सोळाव्या शतकातील फ्रान्सची राणी कॅथेरिन डि मेडिसी हिचा कालखंड खुनी इतिहासाचा कालखंड आहे.
ती जन्माने फ्रेंच नव्हती, ती इटालियन होती. तिचा जन्म फ्लोरेन्स येथे १५१९ साली झाला. ‘मेडिसी’ हे तिच्या घराण्याचे नाव होते. ते राजघराणे होते. इटली म्हणजे पोपचा देश. तिचा जन्म झाला, तेव्हा मेडिसी घराण्याचाच लिओ हा पोप होता. कॅथेरिनचे आईवडील तिचा जन्म झाल्यानंतर तीन आठवड्यांतच मृत्यू पावतात. ती दोन वर्षांची असताना पोप लिओचा अंत होतो. त्यानंतर जो पोप होतो, त्याचे नाव होते अॅण्ड्रियन. त्याच्यावर विषप्रयोग होतो आणि तो मरतो. विषप्रयोग मेडिसी घराण्यामार्फतच होतो. विषप्रयोग ही मेडिसी घराण्याची खासियतच. पुढे कॅथेरिनदेखील या कलेत तरबेज झाली.
त्यानंतर जो पोप झाला, त्याचे नाव सातवा क्लेमंट. त्याच्या काळात मेडिसी घराणे लोकक्षोभाला बळी पडते. कॅथेरिन तेव्हा चार-पाच वर्षांचीच असते. तिचा सांभाळ तिची काकू करते. लोकं मेडिसी घराण्याच्या लोकांना आपल्या ताब्यात घेतात. कॅथेरिन राजकन्या असते. तिला जर ठार केली, तर हे घराणे संपून जाईल, म्हणून तिला नग्न करून ठार करण्याची योजना आखली जाते. मात्र, तिला पकडणे बंडखोरांना शक्य होत नाही. कारण, ती कॉन्व्हेंटमध्ये आश्रयाला गेली असते. शेवटी पोप सैन्य घेऊन येतो आणि तिची सुटका करतो.
कॅथेरिन राजघराण्याची जरी असली तरी ती दिसायला फार सुंदर नव्हती. उंचीदेखील सर्वसाधारण होती. मेडिसी घराण्यातील मुलामुलींना भेदक नजरेचे वरदान लाभले होते. कॅथेरिनलासुद्धा अशी भेदक दृष्टी होती. तिच्या डोळ्यांची जरब जबरदस्त होती, असे तिच्या अधिकार्यांनी लिहून ठेवले आहे.
फ्रान्सचा राजा आपला दुसरा मुलगा हेन्री याच्यासाठी तिला मागणी घालतो. युरोपातील राजघराण्यांचे विवाह फक्त राजकीय कारणांसाठी होत असत. तेथे प्रेम, एकमेकांची अनुरूपता वगैरेंचा काही संबंध नसे. स्पेन, पोर्तुगीज, जर्मन राजकन्या ब्रिटनच्या राण्या झालेल्या आहेत. असे प्रत्येक राज्याचे चाले. असे विवाह करून दोन राज्ये एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाई.
ऑक्टोबर १५३३ साली फ्रान्सच्या हेन्री आणि इटालियन कॅथेरिन यांचा विवाह झाला. दोघांचे वय तेव्हा होते फक्त १४ वर्षं. म्हणजे, बालविवाह ही तेव्हा जगाचीच रीत होती, हे आपल्याकडच्या ’पुरोगाम्यांनी’ लक्षात ठेवावे. राजपुत्र हेन्री १५ वर्षांचा असतानाच काही स्त्रिया त्याच्या रखेल झाल्या. त्याच्या आवडीच्या रखेलचं नाव होतं, Diane De Poitiers. ती त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी मोठी होती आणि विधवा होती. तिचा शयनकक्ष कॅथेरिनच्या कक्षाच्या खालीच होता. मेडिसी घराणे विषप्रयोगात तज्ज्ञ असल्याचे आपण वर पाहिलेच.
हेन्रीच्या मोठ्या भावाचे नाव होते फ्रान्सिस. १५३६ साली टेनिसचा खेळ खेळून एक ग्लासभर पाणी तो प्यायला. त्याच्या इटालियन सचिवाने त्याला पाण्याचा पेला दिला. त्या पाण्यात विष होते. विष फ्रान्सिसच्या शरीरात भिनते आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. यामुळे राजगादीवर आरूढ होण्याचा क्रमांक हेन्रीचा लागतो. भावाचा मृत्यू होऊन दुसर्या भावाला राजगादीचा मार्ग मोकळा होण्याची ही इतिहासातील एक बोलकी घटना आहे.
पहिली दहा वर्षे कॅथेरिनला संतानप्राप्ती झाली नाही. राणीचे काम राज्याला वारस देण्याचे असते. दहा वर्षे कॅथेरिन हेन्रीच्या दृष्टीने दुर्लक्षित होती. परंतु, ती स्वतः मात्र सूक्ष्म निरीक्षणकर्ती होती. सत्ता राबविणारी माणसे कोण आहेत, त्यांचे गुण-दोष काय आहेत, त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी स्त्रियांचा उपयोग कसा करता येतो, विषाचा उपयोग कसा करता येईल, या सर्व बाबतीत ती इतरांच्या दृष्टीने दुर्लक्षित असली, तरी संधीची वाट बघत बसणारी महाधूर्त बाई होती. १५४७ साली राजा मरतो आणि हेन्री गादीवर येतो. कॅथेरिनचा दर्जा राणीचा होतो. तिथे राणी म्हणजे राजाची केवळ बायको नव्हे, तर सत्तेत राजाच्या बरोबरीने स्थान असलेली अशी व्यवस्था तेव्हा होती. असे असले तरी सत्ता राजाची रखेल Diane De Poitiers हिच्याकडेच होती.
पुढे कॅथेरिनला मुलं व्हायला लागतात. तिथून तिला दहा मुलं होतात. दरबारातील एका स्पर्धेत भाग घेताना हेन्रीच्या डोक्याला आणि डोळ्याला प्राणांतिक जखम होते आणि त्यात त्याचा १५५९ साली मृत्यू होतो. सार्वभौम सत्ताधीश काळाच्या पडद्याआड जातो आणि त्याचा मुलगा फ्रान्सिस दुसरा हा गादीवर येतो. तो फक्त १५ वर्षांचा असतो. कॅथेरिन सिंहासनावर बसू शकत नाही. फ्रेंच राज्य कायद्याने स्त्रीला गादीवर बसता येत नाही. कॅथेरिनचे स्थान राजाचे रक्षक आणि राज्य पालक असे होते. मुलगा अल्पवयीन असल्याने कॅथेरिन सर्व निर्णय करीत असे. राजाचे काम फक्त ‘मम’ म्हणण्याचे असे. सत्ता आपल्या हातात येताच तिने Diane De Poitiers ला हाकलून लावते. तिची संपत्ती ताब्यात घेतली जाते. तिला कॅथरिनने ठार केले नाही, हेच तिचे नशीब!
याच काळात फ्रान्समध्ये कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात सतत लढाया होत राहिल्या. वेगळे मत असणार्याला जिवंत ठेवायचे नाही, ही प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिकांची मानसिकता होती. ‘आमचाच येशू ख्रिस्त आणि बायबल खरे,’ असे म्हणून हे ख्रिश्चन एकमेकांच्या कत्तली करीत. कॅथेरिन अतिशय धूर्त होती. ज्याचा उपयोग आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आहे, त्याचे ती रक्षण करी. प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक सरदारांना एकमेकांशी लढत ठेवीत असे. एखाद्या सरदाराला नाहीसा करायचा असेल, तर ती त्याला दरबारात बोलवायची. कधी अशा एखाद्याला अटक केली जाई, त्याला मृत्यूदंड दिला जाई, तर दुसरा एखादा मारेकर्यामार्फत मारला जाई. १५६० साली राजा फ्रान्सिस मेला. त्यानंतर तिचा दुसरा मुलगा चार्ल्स नववा राजा झाला. प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक यांच्यातील युद्ध संपविण्यासाठी तिने एक करार घडवून आणला.
वरवरची शांतता निर्माण करण्यात आली. प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक यांचा संघर्ष केवळ धार्मिक तत्त्वज्ञानाच्या वेगळेपणाशी नव्हता. पोपचे तेव्हाचे स्थान ‘धर्मसत्ता’ आणि ‘राज्यसत्ता’ असे दोन्ही होते. पोपची सत्ता म्हणजे कॅथॉलिकची सत्ता आणि कॅथॉलिकची सत्ता म्हणजे इटलीची सत्ता. अनेक फ्रेंच्यांच्या राष्ट्रीय स्वभावात इटलीची सत्ता बसत नव्हती. फ्रान्समध्ये जे प्रोटेस्टंट होते, त्यांना ‘ह्युजेनॉट’ असे म्हटले जाते. कॅथेरिनने मोठ्या धोरणाने आपली मुलगी मार्गारेट हिचे लग्न नेवारे नावाच्या फ्रान्सच्या प्रदेशाचा राजा हेन्री जो प्रोटेस्टंट होता, त्याच्याशी लावून देण्याचे ठरविले. या लग्नसमारंभासाठी तिने प्रोटेस्टंट सरदारांसह आपल्या संपूर्ण परिवारावला पॅरिसला बोलावले. १८ ऑगस्ट १५७२ साली हा विवाह संपन्न झाला.
राजघराण्याचा विवाह असल्यामुळे त्याच्या भव्यतेची कल्पना आपण करू शकतो. ‘ह्युजेनॉट’ समुदायाच्या प्रमुखाचे नाव होते, अॅडमिरल कोलायनी. लग्नाची तिथी संपल्यानंतर आनंदोस्तव चालू होता. तिसर्या दिवशी अॅडमिरल कोलायनीवर गोळीबार होतो, ते जखमी होतात. त्यांच्या समाचारासाठी राजा चार्ल्स येतो. त्याचेसुद्धा अर्ध रक्त फ्रान्सचे आणि अर्ध इटालियन असते. फ्रान्सचे रक्त म्हणत की, ‘जखम तुम्हाला झाली नसून मलाही झाली आहे, मी याचा सूड घेईन.’ कॅथेरिनने पॅरिसमध्ये जमलेल्या सर प्रोटेस्टंटना वेचून वेचून ठार करण्याची योजना तयार केली होती.
कॅथेरिन आणि तिचे सहकारी राजा चार्ल्सला म्हणतात, ’‘आपले राजघराणे सुरक्षित राहण्यासाठी या ‘ह्युजेनॉट’ला ठार करणे आवश्यक आहे. ते बेसावध आहेत आणि आपल्या ताब्यात आहे.” चार्ल्सचे फ्रान्सचे रक्त असा विश्वासघात करायला तयार नव्हते. इटालियन राणी दीड तास त्याला समजून सांगत होती. शेवटी ती म्हणाली की, ’‘तू जर हत्येची आज्ञा दिली नाहीस, तर मी दूर कोठेतरी निघून जाईन.”
हत्येचा दिवस २४ ऑगस्ट हा ठरला. ‘बॉर्थेल्युम्यू डे’ हा एक पवित्र दिवस होता. ‘बॉर्थेल्युम्यू डे’ हा येशू ख्रिस्ताच्या पहिल्या १२ शिष्यांपैकी एक होता. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा प्रचार करतो म्हणून तेव्हाच्या राजसत्तेने कातडी सोलून त्याला ठार केले. त्याचा स्मृती दिवस अत्यंत पवित्र समजला जातो. या पवित्र दिवशी फ्रान्सच्या इटालियन राणीने फ्रान्सच्या इतिहासातील काळा दिवस ठरावा, असे हत्याकांड घडवून आणले. याचे वर्णन मेरी पार्मेली आपल्या फ्रान्स विषयीच्या पुस्तकात असे करते -
’आभासी सुरक्षेच्या आवरणाखाली पती, पत्नी, मुले शांतपणे झोपली होती. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर किंकाळ्या आरोळ्यांनी ती जागी होऊ लागली. भयानक कापाकापीची ती शिकार झाली. पॅरिसला रक्ताची सवय नव्हती असे नाही. अशा प्रकारे वाहणारे रक्त प्रथमच पाहिले जात होते. पॅरिसच्या रक्ताच्या तुलनेत रणांगणात सांडलेले रक्त दयाद्र समजायला हवे. स्त्रिया आणि मुले रात्रीच्या पोशाखात होती. भेदरलेल्या माता आपल्या अपत्यांच्या रक्षणाची पराकाष्टा करीत होत्या. आपल्या पतीच्या प्राणांची भीक मारेकर्यांकडे मागीत होत्या. कॅथेरिन या हत्याकांडात कशी वागली? पश्चाताप, सहानुभूती, दुःख, दया यापैकी कोणतीच भावना तिने व्यक्त केली नाही. अॅडमिरल कोलायनीचे डोके मसाला भरून पोपकडे पाठविण्याच्या कामाला ती लागली होती.
फ्रान्स या हत्याकांडात दोषी होता का, हे परमेश्वरच सांगू शकतो. परंतु, या हत्याकांडाची योजना, पुढाकार फ्रेंच्यांचा नव्हता. ही योजना इटालियन स्त्रीच्या डोक्याची, तिच्या स्पॅनिश सल्लागारांची असावी.” मेरी पार्मेली हिचे हे शब्द आहेत. तिचा दुसरा मुलगा देखील मारतो आणि तिसरा मुलगा हेन्री गादीवर येतो. तेव्हा सत्ता कॅथेरिनच्या हातातच राहाते. हे दोघेही जण सात महिन्याच्या अंतराने मरण पावतात. कॅथेरिन डी मेडिसी ही इटालियन फ्रान्सची राणी अतिशय कारस्थानी, धूर्त, संधीची वाट पाहत बसणारी, विरोधकांना कौशल्याने संपविणारी, आपल्या घराण्याच्या हातीच कायमची सत्ता राहावी यासाठी वाट्टेल ते करणारी होती. मी तिची माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तके संदर्भासाठी पाहिली. ती इटालियन आहे, मेडिसी घराण्याची आहे आणि तिचे वागणे इटली आणि मेडिसी घराण्याला धरून आहे, असेच बहुतेकांचे मत आहे. तिची स्तुती करणारा एकही इतिहासकार मला भेटलेला नाही. सत्तेच्या सिंहासनावर न बसता, सत्ता कशी राबवायची, इतरांना कसे नाचवायचे, हे फ्रान्सच्या या इटालियन राणीने प्रत्यक्ष करून दाखविले. सत्तेच्या चाव्या हातात असताना तिचा अंत झाला.