‘लॉकडाऊन’ची शिथीलता आणि मद्याची दुकाने सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्या मद्यपींचा झिंगाट अवघ्या देशाने पाहिला. परिस्थिती भीषण असतानाही डोळ्यांवर झापडं बांधून वावरणार्या बेजबाबदारांना शब्दांत समजावणे तसे कठीणच. मात्र, याच काळात स्वीडनमध्ये एका अनोख्या रेस्टॉरंटमध्ये राबविण्यात आलेली अनोखी संकल्पना आता काळाची गरज बनली आहे.
माणूस कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्याने चैनीच्या गोष्टी आता सध्या बाजूला राहिल्या. परंतु, भूक भागवण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडण्याची गरज आजही व्यक्त केली जात आहे. जगभरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्यांचा नित्यनेमाने सुरू असलेला व्यवसाय ठप्प आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये रुतलेला व्यवसायाचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यसाठी नवनव्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. अशातच मंदीतील संधी ओळखून एका व्यावसायिकाने अनोखे रेस्टॉरंट उभारले आहे.
एका उघड्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एका दिवसात एकच व्यक्ती जेवणाचा आस्वाद घेऊ शकते. इथे ना वाढपी आहेत, ना ऑर्डर घेण्यासाठी कर्मचारी, पैसे घेण्यासाठी कॅश काऊंटर नाही. तुमच्यासोबतही कुणी व्यक्ती जेवण करू शकत नाही, असा सरळ साधा नियम... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली ही दक्षता... ज्या स्वीडनमध्ये २२ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला आहे, तर मृतांची संख्या २७०० च्या घरात आहे. त्या ठिकाणी उभे राहिलेले हे रेस्टॉरंट म्हणजे जगातील सर्वात स्वच्छ आणि कोरोनामुक्त जागा असल्याचा दावा केला जात आहे.
मोकळ्या मैदानात एक टेबल लावले आहे, त्यावर जाऊन तुम्ही बसायचे... पदार्थ ठेवलेली टोपली एका दोरीच्या साहाय्याने तुमच्या टेबलावर वरून सोडली जाईल. जेवणाचा आस्वाद घ्या, त्याच टोपलीत पैसे ठेवा, असा साधारणतः रिवाज. ’टेबल फॉर वन’ असे या हॉटेलचे नाव आहे. एकदी व्यक्ती जेवून गेली की, पुढील पाच दिवस या टेबलावर दुसरे कुणीही बसून जेवत नाही. सध्या प्रायोगिक तत्त्वावर या रेस्टॉरंटची सुरुवात केवळ जनजागृतीसाठी झाली, असे म्हणता येईल. कारण, 10 मे रोजी उद्घाटन होणार्या या हॉटेलची नेमकी सुरुवात ऑगस्टपासून होणार आहे.
ग्राहकांनी वापरलेली भांडी दोनदा घासणे, निर्जंतुकीकरण करणे, टेबल, टोपली आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे, अशी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. रैसमस या शेफने हॉटेलचा मेनूही ठरवला आहे. विविध पदार्थ आणि पेयांचा आस्वाद ग्राहकांना इथे घेता येईल. या रेस्टॉरंटच्या मालक लिंडा यांनीही कोरोनामुक्त रेस्टॉरंट असल्याचा दावा केला आहे.
भविष्यात असे अनेक प्रयोग जगभरात केले जातील. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा घटक आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जाईल. सार्वजनिक वाहनांतून प्रवास असो, कार्यालयातील वावर, चित्रपट पाहणे, हॉटेल्समध्ये, बाजारात जाणे किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे लोकांशी संबंध येईल. अद्यापही ‘सोशल डिस्टन्सिंग’ म्हणजे काय, हे १०० टक्के जनतेला समजलेलेच नाही. याचा प्रत्यय आपल्याला दररोज वाढणार्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतून येतच असेल.
कोरोना संकटाचे गांभीर्य अजूनही रस्त्यावर मोकाट फिरणार्या मद्यपींना, पोलिसांवर धावून येणार्या समाजकंटकांना नाही. सभ्य सुक्षिशित समाजही यापासून अलिप्त नाहीच. गेल्या दोन महिन्यांमध्ये अडाणी अशिक्षितांमधला समजूतदारपणाही दिसला आणि शिकल्या सवरलेल्यांचा मूर्खपणाही उघड झाला. भविष्यात अशाच ‘सोशल डिस्टन्सिंग’ची लस स्वतःच्या मेंदूत टोचून जोपर्यंत घेत नाहीस तोपर्यंत कोरोनाच्या संकटापासून जगाला कुणीही वाचवू शकणार नाही...!