समृद्ध आंग्रिया प्रवाळ बेट संरक्षित होणार; 'मॅंग्रोव्ह सेल'कडून प्रस्ताव; पहा व्हिडीओ

31 May 2020 02:07:48

marine _1  H x  

 छायाचित्र सौजन्य - डब्लूसीएस
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावाने 'आंग्रिया बेट' प्रसिद्ध

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण किनारपट्टीपासून १०५ किमी दूर समुद्रात असलेल्या समृद्ध आंग्रिया प्रवाळ बेटाला 'सागरी क्षेत्र कायदा, १९७६'अंतर्गत संरक्षण देण्याचा प्रस्ताव वन विभागाने राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य सरकाराने या प्रस्तावाचे अवलोकन करुन त्याला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'ला पाठविण्यात येईल. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) आंग्रिया बेटावरील समृद्ध सागरी जैवविविधता संरक्षित करण्यासाठी या बेटाला संरक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
 
 

marine _1  H x  
 
 
 
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्राची सीमा १२ सागरी मैल अंतरापर्यंत आहे. १२ ते २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्याला 'विशेष आर्थिक क्षेत्र' (exclusive economic zone) म्हटले जाते. हे संपूर्ण क्षेत्र 'केंद्रीय विदेश मंत्रालया'च्या अधिकाराअंतर्गत येते. सागरी जैवविविधता संवर्धनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात केवळ दोन क्षेत्रांना संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये 'मालवण सागरी अभयारण्य' आणि 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले आंग्रिया प्रवाळ बेट कोकण किनारपट्टीपासून ५६.७ सागरी मैल दूर आहे. या बेटाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याठिकाणी जाता येत नाही. मात्र, या बेटावरील सागरी जैवविविधता लक्षात घेता तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. यासाठी वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने या बेटाला 'सागरी क्षेत्र कायद्या'अंतर्गत 'विशेष आर्थिक क्षेत्रा'मध्ये संरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
 
 
 
 
 
 
आंग्रिया प्रवाळ बेट हे १२ सागरी मैलाच्या पुढे येत असल्याने ते 'विदेश मंत्रालया'च्या अधिकाराअंतर्गत येते. त्यामुळे अशा परिस्थितीत या क्षेत्राला 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित करता येत नसल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेन्द्र तिवारी यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या या बेटाला केवळ 'विदेश मंत्रालया'च्या 'सागरी क्षेत्र कायद्या'अंतर्गत कायदेशीर संरक्षण देता येईल. म्हणूनच त्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाला पाठवल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ च्या अखेरीस 'मंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया'च्या (डब्लूसीएस) टीमने या बेटावर जाऊन केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणाच्या आधारे हा प्रस्ताव तयार केल्याचे, तिवारी म्हणाले.
 
 
याविषयी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, 'कांदळवन कक्षा'कडून आंग्रिया बेटाच्या संरक्षणाबाबत प्राप्त झालेला प्रस्ताव गेल्याच आठवड्यात आम्ही राज्य शासनाला पाठवला आहे. राज्य शासनाने या प्रस्तावाचे अवलोकन करुन त्याला मंजूर दिल्यानंतर तो प्रस्ताव 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालय' आणि त्यांच्याकडून 'विदेश मंत्रालया'ला पाठवला जाईल. प्रवाळांच्या समृद्ध जैवविविधतेसाठी आंग्रिया बेट प्रसिद्ध असून कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने ही जागा उत्कृष्ट झाल्याचे मत ज्येष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञ आणि 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी 'महा MTB'शी बोलताना व्यक्त केले. या जागेला संरक्षित करण्यासाठी मॅंग्रोव्ह सेल आणि फाऊंडेशनने आवश्यक ते प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनदंन करु इच्छितो, असे आपटे म्हणाले.
 
 
 
आंग्रिया बेटाविषयी....
कोकण किनारपट्टीपासून १०५ किमी अंतरावर आंग्रिया प्रवाळ बेट आहे. हे बेट समुद्रात साधारण २,०११ किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. त्याची खोली २० ते ४०० मीटरपर्यंत आहे.६५० किमी क्षेत्रावर केवळ प्रवाळ खडक असून इतर सागरी जीवांची जैवविविधता आहे. 'भारतीय वन्यजीव संस्था'ने (डब्लूआयआय) आंग्रिया बेटाचा समावेश भारतातील १०६ 'महत्वपूर्ण किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्रां'च्या (आयसीएमबीए) यादीत केला आहे.
 
 
आंग्रिया बेटावरील सर्वेक्षणे...
'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी १९९० साली या बेटाला भेट दिली होती. त्यानंतर या बेटाचे सर्वप्रथम सर्वेक्षण आणि छायाचित्रण २००८-०९ च्या सुमारास सारंग कुलकर्णी यांनी केले होते. २०१४ साली 'यूएनडीपी' प्रकल्पाअंतर्गत 'कांदळवन कक्ष' आणि 'राष्ट्रीय समृद्रशास्त्र संस्था'ने (एनआयओ) या बेटाचे सर्वेक्षण केले. त्यानंतर आता २०१९ च्या अखेरीस 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' आणि 'डब्लूसीएस'ने आंग्रिया बेटाच्या सागरी जैवविविधतेचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना प्रवाळांच्या १५० हून अधिक प्रजाती, माशांच्या १२० प्रजाती, इनवर्टीब्रेटच्या ४० हून अधिक प्रजाती आढळून आल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0