सर्वोत्तम सुनील छेत्री

29 May 2020 21:03:37

Sunil Chhetri _1 &nb
 



 
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला एक सर्वोत्तम खेळाडू म्हणजे सुनील छेत्री...त्याच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश...




भारतामध्ये क्रिकेटशिवाय दुसरा खेळ जो लोकप्रिय मानला जातो, तो म्हणजे फुटबॉल. भारतामध्येही हा खेळ हा ब्रिटिश काळापासून तसा खेळला जात होता. मात्र, त्याला ‘ग्लॅमर’ मिळायला बराच कालावधी लागला. असो. भारतामध्येही असे काही खेळाडू आहेत, ज्यांची तुलना ही नेहमीच जगातील महान खेळाडूंबरोबर करण्यात आली. भारतीय फुटबॉल संघ हा अनेक महान खेळाडूंच्या योगदानामुळे जागतिक फुटबॉलच्या नकाशावर आला. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील छेत्री. या खेळाडूच्या कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल संघाची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यास भाग पाडले. त्याच्या नावावर अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. अनेकवेळा त्याची तुलना मेस्सी, रोनाल्डोसारख्या फुटबॉलमधील स्टार खेळाडूंसोबत करण्यात आली आहे. तेव्हा, त्याच्या कामगिरीचा आढावा घेऊया...
 
 
सुनील छेत्रीचा जन्म सिकंदराबादमध्ये ३ ऑगस्ट, १९८४ रोजी झाला. त्याचे वडील के. बी. छेत्री हे भारतीय सेनेचे अधिकारी होते. तसेच, त्याची आई सुशीला छेत्री या महिला फुटबॉल संघामध्ये होत्या. त्यामुळे त्यांना लहानपणीच फुटबॉलचे बाळकडू मिळाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे लहानपणापासूनच फुटबॉलबद्दल त्याला कुतूहल होते. वडील सेनेमध्ये असल्यामुळे त्यांच्या नेहमी वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत असत. परंतु, याचा वाईट प्रभाव कधीच सुनीलवर पडला नाही. शालेय जीवनापासूनच त्याने खेळाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करत अनेक फुटबॉल क्लबचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले होते.
 
 
अखेर वयाच्या सतराव्या वर्षी २००१मध्ये दिल्लीमधून फुटबॉलच्या वाटचालीला सुरुवात केली. त्याने फुटबॉलमधील व्यावसायिक कारकिर्द मोहन बागान या क्लबसोबत सुरु केली. काही कालावधीनंतर त्याने जेसीटी क्लबमधून खेळण्यास सुरुवात केली. या क्लबमधून खेळताना त्यांने ४८ सामन्यांमध्ये २१ गोल केले. भारतीय फुटबॉल संघामध्ये त्याने ‘सिनिअर’ आणि ‘ज्युनिअर’ अशा दोन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले. २००७ मध्ये कंबोडियाविरुद्ध झालेल्या कठीण सामन्यामध्ये त्याने दोन विजयी गोल करत, एका रात्रीत चांगली प्रसिद्धी मिळवली. पुढे भारतीय फुटबॉल आणि सुनील छेत्री हे जणू समीकरणच झाले. जगभरातून त्याच्या कौशल्याची चर्चा होऊ लागली. त्याची कामगिरी पाहता, फुटबॉल संघात सहभागी होण्यासाठी दुसर्‍या देशांचेही प्रस्ताव येऊ लागले. २००८मध्ये आशियाई विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी उत्तम राहिली. त्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने २७ वर्षांनंतर आशियाई विश्वचषक भारताच्या नावावर केला. पुढे २००८मध्येच त्याने पूर्व बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले.
 
 
२०१० मध्ये त्याच्या कारकिर्दीला एक मोठे वळण मिळाले. त्याचे धमाकेदार प्रदर्शन पाहता, परदेशातील मेजर लीग सॉकरमधील कंसास सिटी विझार्ड्सकडून खेळण्याची संधी मिळाली. याचसोबत भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय फुटबॉलशी जोडणारा तो तिसरा दुवा ठरला. त्याची कामगिरी पाहता, अनेक आंतरराष्ट्रीय क्लबमधून खेळण्याची संधी मिळाली. पुढे भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा मोहन बागान क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. सुमारे एक वर्ष त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले. २००७, २००९ आणि २०१२ या तिन्ही वर्षांत झालेल्या नेहरू विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, २०११मध्ये झालेल्या सेफ चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. २००७, २०११, २०१३ आणि २०१४ या चार वर्षात झालेल्या आशियाई चषक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. भारतीय फुटबॉल लीगची (आयएसएल) सुरुवात झाल्यानंतर सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा एक प्रसिद्ध ब्रॅण्डच झाला.
 
 
फुटबॉलमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला २०११ मध्ये ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. २०१३ पासून त्याने ‘बंगळुरू एफसी’ या संघाचे नेतृत्व केले. या संघाला अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला. ‘हिरो आय लीग’च्या २०१३-१४ आणि २०१५-१६चे विजेतेपद, तसेच इंडियन फेडरेशन चषक स्पर्धेच्या २०१४-१५ आणि २०१६-१७चे विजेतेपद हे बंगळुरू संघाच्या नावावर करण्यामध्ये सुनीलच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. भारतीय फुटबॉलच्या कामगिरीमध्ये सुनील छेत्रीच्या कामगिरीचा खारीचा वाटा आहे. २०१९ मध्ये त्याला ‘पद्मश्री’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. ध्येयवादी, निश्चयी तसेच संयमी आणि फुटबॉलवर जीवापाड प्रेम करणार्‍या या खेळाडूकडे पाहून अनेक नवख्या तरुणांना प्रेरणा मिळते. त्याची कामगिरी पाहता, तो खर्‍या अर्थाने फुटबॉलमधील ‘सर्वोत्तम’ खेळाडू आहे. त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...
Powered By Sangraha 9.0