आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल, याची ‘चिंता’ आपल्याला असते. ‘चिता’ आणि ‘चिंता’ यात अनुस्वाराचा फरक आहे. पण, दुसरा मोठा फरक असा की, ‘चिता’ एकदाच जाळून भस्म करते आणि ‘चिंता’ रोजच जाळते.
लोककथा आणि तशाच प्रकारच्या अन्य कथांचे वाचन करणे, हा माझा आवडता छंद आहे. अशा कथा, अनेकवेळा विचारप्रवृत्त करतात. समजायला कठीण असलेला एखादा मुद्दा या कथा अधिक स्पष्ट करतात. अनेक गहन विचारसुद्धा कथांतून सोपे होतात. तसे पाहू जाता विचार अमूर्त असतात, बोजड असतात, समजायलादेखील अनेकवेळा कठीण जातात. पण, तोच विचार एखादी कथा इतका सोपा करते की, आपल्यालाच वाटू लागतं की ही केवढी सोपी गोष्ट आहे.
कथांचे दुसरे सामर्थ्य म्हणजे, त्या व्यक्तीला तणावमुक्त करतात. सध्याच्येच उदाहरण घेऊया, कोरोना व्हायरसमुळे आपण विलक्षण तणावाखाली जगत आहोत. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल, याची ‘चिंता’ आपल्याला असते. ‘चिता’ आणि ‘चिंता’ यात अनुस्वाराचा फरक आहे. पण, दुसरा मोठा फरक असा की, ‘चिता’ एकदाच जाळून भस्म करते आणि ‘चिंता’ रोजच जाळते. ही ‘चिंता’ जशी कोरोना व्हायरसने निर्माण केली, तशी रोज बदलणार्या सरकारी नियमांमुळे आणि शासनाच्या दृष्टिहीन धोरणात्मक निर्णयामुळे ही चिंता वाढत जाते. आज ही दुकानं उघडी करायला परवानगी द्यायची, उद्या ती बंद करायची, एसटीची वाहतूक चालू करण्याची घोषणा करायची आणि दुसर्या दिवशी मग ती मागे घ्यायची. ज्यांनी जनतेला चिंतामुक्त करायचे आहे, तेच इतके गोंधळलेले आहेत की, स्वतःच्या अस्तित्वाच्या चिंतेपलीकडे त्यांना दुसरी चिंता राहिलेली दिसत नाही.
असे काही असले तरी, आपल्याला रोजचे जीवन जगायचे आहे. सकारात्मक विचाराने जगायचे आहे. त्यासाठी पहिली गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे, दिवसातून एक किंवा दोन वेळा बातम्या बघाव्यात. उठसूट बातम्यांकडे डोळे लावून कदापि बसू नये. नकारात्मक बातम्यांचा सध्या पाऊस पडत असतो. ‘चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, चिंतेत भर पडली आहे, गंभीर चिंतेचा विषय आहे,’ अशी वाक्ये दिवसातून १०० वेळा तरी उच्चारली जात आहेत. ती ऐकून चिंता दूर होत नाही, तर मानसिक तणाव वाढतात. म्हणून सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे. या काही कथा आहेत, ज्या मला सकारात्मक विचार करायला शिकवितात.
एक म्हातारे गाढव विहिरीत पडतं. मालकासमोर प्रश्न पडतो की याला विहिरीतून बाहेर कसे काढायचे? बाहेर काढून याचा काही उपयोग नाही, ते आता म्हातारं झालं आहे आणि विहीरही पडकी झाली आहे, तिच्यात पाणी राहत नाही. कचरा आणि माती टाकून बुजवावी, त्यात गाढवही गाडले जाईल. आपला प्रश्न संपेल. त्याने आपल्या नोकरांना बोलावून विहिरीत कचरा आणि माती टाकायला सुरुवात केली. अंगावर माती पडल्यामुळे गाढव आणखीन थोडं घाबरत. ते माती आणि कचर्यात रुतत जातं. तो पाठीवरील माती आणि कचरा हलवून त्यावर उभा राहतो, वरून कचरा आणि माती येतच राहते, गाढव ते ढकलून ढकलून त्यावर उभा राहतो.
शेवटी मातीने विहीर भरते आणि गाढव बाहेर येतं. या गाढवाने मला शिकवलं की संकटे येत राहतील, ती झेलायची, पायाखाली टाकायची आणि त्यावर उभं राहायचं. म्हणजे संकटावर मात करायची. सर्व जीवांची जगण्याची प्रेरणा ही मूलगामी असते. तो विचार सतत मनात जागा ठेवला पाहिजे. दुसरी कथा एका उद्योजकाची आहे, उद्योगात तो कर्जबाजारी होतो. त्यातून कसे बाहेर पडायचे त्याला सुचत नाही. देणेकरी त्याच्या मागे लागलेले असतात. अतिशय चिंतातुर होऊन तो एका बागेत एका बाकड्यावर बसलेला असतो.
योगायोगाने तिथे एक प्रौढ गृहस्थ येतो. तो उद्योजकाकडे पाहतो, त्याचा चिंतातुर चेहरा पाहतो आणि विचारतो, ‘’तू फार अडचणीत आहेस, असं दिसतं, मी तुझी चिंता दूर करू शकतो.” अडचणीत असा कोणी सहानुभूतदार भेटला की बरं वाटतं. उद्योजक त्याला आपली कहाणी सांगतो. तो वयस्कर गृहस्थ खिशातून चेकबुक काढतो. त्यावर ५० लाख डॉलर लिहितो आणि खाली ‘जॉन. डी. रॉकफेलर’ अशी सही करतो. जॉन. डी. रॉकफेलर तेव्हाचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस. वयस्कर माणूस त्याला म्हणतो, एक वर्षानंतर याच ठिकाणी, याच वेळी आपण पुन्हा भेटू आणि तो निघून जातो.
चेक हातात पडल्यानंतर उद्योजक त्याक्षणीच चिंतामुक्त होतो. माझ्याजवळ ५० लाखांचा चेक आहे, ही जाणीव त्याला जबरदस्त आत्मविश्वास देते. तो घरी येतो, पण चेक वठवत नाही. तिजोरीत सुरक्षित ठेऊन देतो. त्याला वेगवेगळ्या कल्पना सुचू लागतात. त्यांची तो अंमलबजावणी करतो, त्यात त्याला यश येतं आणि तो वर्षभरात कर्जमुक्त होऊन चांगल्या प्रकारे पैसे कमावू लागतो.
ठरल्याप्रमाणे वर्षाच्या त्याच दिवशी बागेतील त्याच बाकड्यावर जाऊन तो बसतो. त्याच्या हातात ५० लाखांचा तोच चेक असतो. थोड्या वेळाने तो वयस्कर गृहस्थ तिथे येतो. उद्योजक कृतज्ञतेने तोच चेक त्याच्या हातात देतो आणि तो काही बोलणार इतक्यात एक परिचारिका तिथे धावत धावत येते आणि म्हणते, ‘’तुम्ही येथे सापडला बरे झाले.” उद्योजकाकडे वळून ती म्हणते, ’‘हे वयस्कर गृहस्थ स्वतःला जॉन. डी. रॉकफेलर समजतात, मी त्यांची परिचारिका आहे. त्यांना घेऊन जायला आले आहे.”
कुठल्याही बँकेत न वठणारा ५० लाखांचा चेक एका उद्योजकाला किती जबरदस्त आत्मबळ देतो. हा श्रद्धेचा परिणाम आहे! ज्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल, त्या ठिकाणावर पूर्ण विश्वास ठेऊन आपण वाट काढली पाहिजे. त्यातून मिळणारे जे आत्मबळ आहे, ते चिंतामुक्त करते, मग प्रयत्नवादी बनविते, आणि जो प्रयत्नवादी त्याला यश मिळतं. बेडकांची एक टोळी दुसरीकडे जात असते. जाता जाता त्यातील दोन बुडून एका खोल खड्ड्यात पडतात. उडी मारून वर येण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु त्यात त्यांना यश येत नाही. खड्ड्याच्या काठावर असलेले बेडूक म्हणतात, ‘’खड्डा इतका खोल आहे की, तुम्हाला वर येणं शक्य नाही, तेव्हा आता इथेच राहा.” एका बेडकाने जीवाचा आकांत करून मोठी उडी मारली, पण तो काठावर येऊ शकला नाही, खाली पडला आणि मेला.
दुसरा प्रयत्न करीत राहिला. काठावरील बेडूक त्याला सांगत राहिले, “अरे आहे तिथेच राहा, वर येणं शक्य नाही.” परंतु, दुसरा बेडूक खड्ड्यातील खाचखळगे धरत, उड्या मारत वर आला. काठावरील बेडूक त्याला म्हणाले, ’‘तुझ्या हिमतीला प्रणाम. आम्ही तुला सांगत होतो, की तू वर येऊ नकोस, ते शक्य नाही. तरीही तू प्रयत्न सोडला नाहीस आणि वर आलास.” बेडूक म्हणाला, ’‘मी एका कानाने बहिरा आहे. मला असे वाटले की, तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात, अरे वा प्रयत्न चालू ठेव आणि मी वर आलो.”
ही कथा मला शिकवणूक देते की, चिंतेचा राग आळविणारे जे आहेत, त्यांच्यासाठी एक कान बंद ठेवा आणि दुसर्या कानाने जीवनात प्रयत्नवाद शिकविणारे, आशावाद शिकविणारे शब्द ऐकत जा. संकटात जगण्याचे बळ त्यातूनच सिद्ध होतं. चिंतेप्रमाणे भीती हीदेखील व्यक्तीला बुजविणारी असते. एका साधूच्या कुटीत एक उंदीर होता. मांजर बघितली की तो पळून जात असे. साधूला त्याची दया आली आणि त्याने त्याला मांजर केले. उंदराचा मांजर झाला, तर मूळ भीती मांजरातदेखील आली. मांजर कुत्र्याला बघून पळू लागले. साधूला तिची दया आली, त्याने तिला कुत्रा केले, मांजरीचा कुत्रा झाला, मांजरीची भीती कुत्र्यात आली. वाघाची डरकाळी ऐकून कुत्रा पळू लागला. साधूने त्याला वाघ केले.
परंतु, वाघ झाल्याने भीती संपली का? तर भीती संपली नाही. वाघाला शिकार्याची भीती असते. शिकारी बघितला की वाघ पळून जाई. शेवटी साधूने विचार केला की, उंदराचा वाघ झाला, पण भीती काही संपली नाही. दोष उंदीर, मांजर, कुत्रा यांच्यात नसून भीतीत आहे. या भीतीवर मात करता आली पाहिजे. अकारण भीती बाळगू नये, याचा अर्थ निष्काळजी राहावे, असाही नाही. पोकळ घमेंडीत राहावे, असेही नाही. आत्मविश्वासाने निर्भय बनून जीवन जगायचे आहे.
सभोवताली घडणार्या अनेक गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. वारा कसा वाहवा, पाऊस किती पडावा, सूर्याचे तापमान किती आणि कसे असावे, यापैकी आपण काहीही ठरवू शकत नाही. संसर्गजन्य रोगराई उत्पन्न करणे आपल्या नियंत्रणात नसते. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याची चिंता कशाला करायची? आणि चिंतातूर होऊन हताश कशाला व्हायचे? जे आपल्या नियंत्रणात आहे, त्याच्याविषयी विचार करीत राहिले पाहिजे. परिस्थिती बदलविण्याचे सामर्थ्य आपल्यात असते, त्याचा शोध घेतला पाहिजे. मला कोणालाही कसलाही उपदेश करायचा नाही. म्हणून ज्याला जे पटेल, ते त्याने ग्रहण करावे, नाही तर व्यर्थची बडबड म्हणून सोडून द्यावे.