संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा-पटकथा लेखक अशा बहुविध भूमिका समर्थपणे पेलणार्या एन. चंद्रा यांच्या कारकिर्दीचा लेखातून घेतलेला हा आढावा...
नव्वदच्या दशकामध्ये कार्यरत असणार्या या मराठमोळ्या दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटांची पारंपरिक चौकट मोडत बर्याच सामाजिक विषयांना हात घालणार्या चित्रपटांची निर्मिती केली. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘तेजाब’, ‘नरसिम्हा’, ‘वजुद’ असे अनेक सुपरडुपर हिट चित्रपट एन. चंद्रा या दिग्दर्शकाने चित्रपटसृष्टीला दिले. हिंदी चित्रपटसृष्टीला नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर सारखे कलाकार मिळाले ते एन. चंद्रांमुळेच.
दि. ४ एप्रिल १९५२ रोजी एन. चंद्रा यांचा जन्म झाला. एन. चंद्रा हे मूळचे गोव्याचे. मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या चंद्रांचे पूर्ण नाव ‘चंद्रशेखर नार्वेकर’. रोजगारासाठी एन. चंद्रा यांचे वडील मुंबईत येऊन स्थायिक झाले. एन. चंद्रा यांची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क, तर वडील फिल्म सेंटर लॅबमधील ब्लॅक अॅण्ड व्हाइट डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. चंद्रांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मदतीने फिल्म सेंटर लॅबमध्ये त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले व गुरुदत्त यांचे साहाय्यक म्हणून संकलन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. १९६९ मध्ये आलेल्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटासाठी साहाय्यक संकलकाची भूमिका त्यांनी निभावली.
त्याच दरम्यान वामन भोसले ‘मेरे अपने’ या गुलजार दिग्दर्शित ‘मेरे अपने’ चित्रपटाचे संकलन करत होते. याच चित्रपटासाठी चंद्रांनी त्यांचा साहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एडिटिंगच्या काळात बरेचदा गुलजार साहेब लॅबमध्ये येत आणि कामाची देखरेख करत. गुलजार कामाच्या बाबतीत एकदम चोख होते. कामातील हयगय ते अजिबात खपवून घेत नसत. गुलजार साहेबांची ही सवय त्यांना आवडल्यामुळे त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळावे म्हणून चंद्रांनी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला त्यांनी गुलजार यांच्याकडे ‘क्लॅपर बॉय’चे काम करण्यास सुरुवात केली.
‘मेरे अपने’ नंतर गुलजार यांनी ‘परिचय’ हा चित्रपट सुरू केला. त्यात एन. चंद्रा यांनी गुलजार यांच्यासह साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. नंतर एन. चंद्रा पुढील १०-११ वर्षे गुलजार यांच्याबरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’ आदी चित्रपट केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्रपणे निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
‘अंकुश’ हा बेरोजगारी या ज्वलंत विषयावर भाष्य करणारा चित्रपट त्यावेळी तुफान चालला. ‘अंकुश’ बनवण्यासाठी एन. चंद्रांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. या चित्रपटासाठी चंद्रांनी चक्क आपले घर, बायकोचे आणि बहिणीचे दागिने गहाण ठेवले. नाना पाटेकरसारख्या नवख्या कलाकाराला संधी दिली. ‘अंकुश’ आपटला असता, तर चंद्रांचा कारभार तिथेच आटोपला असता. पण, प्रेक्षकांनी ‘अंकुश’ला तुफान प्रतिसाद दिला. अनेक बेरोजगार तरुणांना चित्रपटातल्या पात्रांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत असल्याने या चित्रपटाला तरुणाईचा विशेष प्रतिसाद लाभला. ‘अंकुश’ मुळे बॉलिवूडला चंद्रांच्या रूपाने नव्या दमाचा लेखक-दिग्दर्शक मिळाला, तर दुसरीकडे नाना पाटेकर नावाचा नवा अभिनेता उदयास आला.
नाना पाटेकर यांच्यासह त्यांनी ‘प्रतिघात’ चित्रपट केला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या ‘तेजाब’ने तर चित्रपटांच्या इतिहासात स्वतःचे भक्कम स्थानच निर्माण केले. या चित्रपटाने ‘माधुरी दीक्षित’ या नव्या चेहर्याला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर आलेल्या ‘नरसिम्हा’ने देखील प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यश मिळवले.
१९९२ नंतर मात्र त्यांच्या कारकिर्दीला घरघर लागण्यास सुरुवात झाली. ‘युगंधर’ , ‘तेजस्विनी’ , ‘हमला’, ‘बेकाबु’, ‘वजुद’ असे त्यांचे अनेक चित्रपट ओळीने बॉक्स ऑफिसवर आपटले. या अपयशानंतर त्यांनी आपली रणनीती बदलत सामाजिक चित्रपटांऐवजी विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्याचे ठरवले. यातूनच निर्मिती झाली ती ‘स्टाईल’ या चित्रपटाची! या चित्रपटाने शर्मन जोशीला ‘अभिनेता’ म्हणून ओळख मिळवून दिली. तरुणाईने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. पुढे या चित्रपटाचा सिक्वेल ‘एस्क्युज मी’देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र, या चित्रपटांनंतर ते पुन्हा सामाजिक विषयांकडे वळले. २००१ सालानंतर प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडीनिवडी लक्षात न आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पदरी अपयशच आले. २००९ साली ‘ये मेरा इंडिया’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ते चित्रपटसृष्टीतून अचानक गायब झाले.
त्याकाळी हिंदी चित्रपटात सातत्याने मराठमोळे वातावरण दाखवणारे चित्रपट बनवणारे चंद्रा हे एकमेव दिग्दर्शक होते. चंद्रांच्या चित्रपटांत मध्यवर्ती पात्र अनेकदा हमखास मराठीच असत. चंद्रांनी अनेक गुणवान मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटांतून ब्रेक दिला. हिंदी चित्रपटांमध्ये कारकिर्द करून पण आपलं मराठीपण सतत जपणार्या ‘चंद्रशेखर नार्वेकर’ म्हणजेच एन. चंद्रांच्या या कलाप्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!