‘अनंत’ इच्छाशक्तींचा उद्योजक

28 May 2020 21:46:31

 

Anant_1  H x W:



सध्या कोरोनामुळे सगळीकडेच टाळेबंदीची परिस्थिती आहे. या कोरोनाच्या संकटामुळे एकूणच आर्थिक व्यवस्था डबघाईस आली आहे. ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांच्या आयुष्यालासुद्धा अशाच एका कोरोनाचा संसर्ग झाला होता. हा कोरोना होता संपाचा. त्यावेळेस सगळ्या गिरण्या ‘लॉकडाऊन’ झाल्या आणि गिरणी कामगार आर्थिक, सामाजिकदृष्ट्या शब्दश: ‘क्वारंटाईन्ड’ झाला. नोकर्‍या गेल्या, कुटुंबं देशोधडीला लागली. या परिस्थितीमुळे मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढली. मात्र, काही गिरणी कामगार मुळातच कष्टाळू होते, मेहनती होते. ते गिरणीमधल्या नोकरीवर अवलंबून न राहता इतर छोटे-मोठे व्यवसाय करत होते. गिरण्या बंद झाल्या आणि याच व्यवसायांनी त्यांना हात दिला. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या मुलांनी परिस्थिती पाहिली होती. ती जाणीव त्यांनी कायम जोपासली. त्यांनी पण मेहनत घेऊन स्वत:चा व्यवसाय प्रस्थापित केला. अशाच लढवय्या गिरणी कामगाराच्या मुलाची ही कथा. शून्यातून सुरुवात करुन आज काही कोटींच्या उद्योगाची उलाढाल करणार्‍या या जिगरबाज लढवय्याचे नाव आहे नागेश वंजारे, विवाह व्यवस्थापन उद्योगात अग्रेसर असणार्‍या ‘अनंत केटरर्स’चे संचालक.


नागेशचे वडील अनंत वंजारे भायखळ्याच्या सीताराम गिरणीमध्ये कामाला होते. आई शुभांगी आणि दोन भाऊ असं हे पाच जणांचं कुटुंब. अनंत वंजारे जरी गिरणीत काम करत असले तरी त्या तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबाचं पालनपोषण होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. मेहनती असलेल्या अनंतरावांनी अगरबत्ती विकण्याचा जोडधंदा सुरु केला. आपल्या या कष्टाची सवय त्यांनी आपल्या मुलांमध्ये पण रुजवली. तीनही मुले सकाळी घरोघरी जाऊन पेपर टाकायचे आणि मगच शाळेत जायचे. शाळेतून घरी आले की अगरबत्ती विकायचे. दिवाळीच्या काळात फटाके विकायचे. आपल्या बाबांनी दिलेलं उद्योगाचं बाळकडू या मुलांनी चांगलंच आत्मसात केलं होतं.

नागेश भावंडात सर्वांत लहान. मालाडच्या कुरार व्हिलेजमधील मंगेश विद्यालयात नागेश दहावीपर्यंत शिकला. त्यानंतर मालाडच्याच नानदास खांडवाला महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण झालं. अनंतरावांनी आपल्या मुलांना स्पष्ट सांगितले होते की, हवं तेवढं शिका मात्र नोकर्‍या न करता उद्योग-व्यवसाय करा. नागेशने ते डोक्यात पक्कं केलं होतं. त्याने कुठेच नोकरी केली नाही. अनंत पावसकर या मित्रासोबत त्याने खासगी शिकवणीचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. दोन विद्यार्थ्यांनिशी सुरु झालेले हे वर्ग सातशेच्या वर विद्यार्थी पटसंख्या कशी करुन गेले कळलंच नाही. १९९५च्या दरम्यान अनंत क्लासेस हे नाव विद्यार्थी आणि पालकांमध्ये लोकप्रिय झाले. दरम्यान, नागेश लोणचं बनवून विकण्याचासुद्धा व्यवसाय करत होता. त्यामध्येसुद्धा त्यास चांगली भरभराट होती. क्लासेस सुरु करण्याअगोदर नागेश स्पंज बॉल बनविण्याचा व्यवसायसुद्धा करत होता. त्याचा छोटासा कारखाना होता. कॉलेज करुन तो व्यवसायाकडे लक्ष देत होता. कालांतराने यामध्ये स्पर्धक आले. नफ्याचं गणित काही जुळत नव्हतं. नागेशने आपल्या एका स्पर्धकाला बोलावून तो व्यवसाय त्यास हस्तांतरित केला.


आता शिकवणीचं काम जोरात सुरु असतानाच वंजारे कुटुंबावर एक मोठं संकट आलं. नागेशचा मोठा भाऊ प्रमोद याचा अपघात झाला. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. मात्र, कोणीतरी एकाने त्याची पूर्ण काळजी घेणं आवश्यक होतं. नागेश प्रमोदची काळजी घेऊ लागला. परिणामी, व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. लोणच्याचा व्यवसाय तर बंदच करावा लागला. जवळपास दीड वर्षांच्या सुश्रूषेनंतर प्रमोदची तब्बेत ठीक झाली. याच कालावधीत नागेशच्या दुसर्‍या भावाचं, तुषारचं लग्न ठरलं. या लग्नाच्या भोजनाची व्यवस्था दोघा भावांनी पाहिली. येथेच खर्‍या अर्थाने ‘अनंत केटरर्स’चा जन्म झाला. हळूहळू अनेक ठिकाणाहून लग्नसमारंभ, साखरपुडा, नामकरण समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमांसाठी ऑर्डर्स येऊ लागल्या.


याचवेळी नागेशने एका उद्योजकीय प्रशिक्षण संस्थेत उद्योजकतेचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. उद्योग-व्यवसायातील अनेक बारकावे शिकायला मिळाले. क्लासेसचा व्यवसाय पुढे चालवायचा की केटरिंग व्यवसायात पुढे जायचं, ही विवंचना नागेशच्या मनात होती. संस्थेचे संचालक समीर सुर्वेंनी नागेशला मार्गदर्शन केले. त्यानुसार नागेशने ‘अनंत क्लासेस’चा व्यवसाय आपल्या मित्राकडेच सुपूर्द केला आणि तुषार सोबत ‘अनंत केटरर्स’च्या व्यवसायात स्वत:ला पूर्ण झोकून दिले.


हळूहळू एक एक लग्नाचे हॉल्स भाड्याने घेण्यास सुरुवात केली. आज नागेश वंजारे यांच्याकडे चार हॉल्स आहेत. चारकोप येथील ‘अनंत रॉयल बॅक्वेट हॉल’ हा लोकप्रिय हॉल त्यापैकी एक आहे, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर असणार्‍या महानंद डेअरीजवळील एक लॉनसुद्धा त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला. तब्बल वीस हजार लोकांची भोजन व्यवस्था करण्याची ‘अनंत केटरर्स’ची क्षमता आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ते ५०० हून अधिक लोकांना रोजगार देतात. सध्या या व्यवसायाची उलाढाल ही काही कोटी रुपयांच्या घरात आहे. यासोबत ते मिठाई विक्रीचा व्यवसायदेखील करतात. दिवाळी आणि सणासुदीला या मिठाईला विशेष मागणी असते.


तुषार या आपल्या भावाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना नागेश वंजारे म्हणतात की, “अगरबत्तीचा व्यवसाय असो वा फटाक्यांचा, क्लासेसचा वा आता केटरिंगचा या प्रत्येक व्यवसायात माझा भाऊ तुषार सावलीसारखा सोबत आहे. त्याच्याशिवाय मी व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्याचा विचारच करु शकत नाही. बाबांनी आम्हांला सांगितलेलं, ‘उद्योजक बना.’ बाबांचा शब्द शिरसावंद्य मानून आम्ही तिघे भाऊ आज उद्योगात स्थिर आहोत. आमचा मोठा भाऊ प्रमोद ‘अनंत पर्यटन’ ही पर्यटन संस्था चालवितो.” तुषार आणि नागेश वंजारेंना त्यांच्या उद्योजकीय वाटचालीसाठी ‘उद्योगतारा’ हा पुरस्कार मिळाला होता.


कोकणाकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहिलं गेलं आहे. मात्र, कृषी उद्योग म्हणून तितकंसं पाहिलं जात नाही, नेमकं हेच लक्षात घेऊन नागेश आणि तुषार यांनी काजुच्या झाडांची लागवड केलेली आहे. यापुढे जमीन विकत घेऊन त्यावर विविध प्रकारची उत्पादने घेऊन कोकणात कृषी उद्योग उभारुन रोजगार निर्मितीचा त्यांचा मानस आहे.


गिरणी कामगारांचा संप असो की आताचं कोरोनाचं संसर्गजन्य संकट, माणसाची प्रबळ इच्छाशक्तीच त्यास यातून बाहेर काढणार आहे. शिवाय या कसोटीच्या काळात जे उद्योग- व्यवसाय करतील ते अधिक नेटाने परिस्थितीशी लढा देतील हे स्पष्ट आहे. अनंत केटरर्सचे नागेश वंजारे याचं उत्तम उदाहरण आहेत.


Powered By Sangraha 9.0