कोरोना’ कहर आणि आंदोलन

27 May 2020 20:47:33

white house_1  


मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मी व्हाईट हाऊसचा झेंडा अर्ध्यावर खाली उतरवला होता. विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी हा डाव साधला असून आमच्या चांगल्या कामांकडे लक्ष दिले जात नाही,” असे म्हणत या प्रकारावर पडदा टाकण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केला. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा करत सारवासारवही केली.



जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना, पण तेथील राष्ट्राध्यक्ष याची चिंता करण्याऐवजी सलग दोन दिवस गोल्फ खेळत आहेत. साहजिकच जनतेने याविरोधात जाब विचारला की, “तुम्हाला लोकांची जराही चिंता नाही. जाहीरपणे गोल्फ खेळण्यात तुम्हाला धन्यता वाटते? एक लाख नागरिक मृत झाले, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? आम्हाला वाटते... जनतेचा रोष आता उफाळून येत आहे. राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणा सोडून दिला आहे का? जनतेची परवा मुळीच नाही का,” असा प्रश्न आंदोलनाच्या रुपात जनतेने उपस्थित केला. ट्रम्प यांच्या गोल्फ क्लब बाहेर काही लोकांनी एकत्र येत हे आंदोलन केले. ट्रम्प यांनीही या प्रकाराला योग्य उत्तर दिले. “मला चिंता आहे. मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मी व्हाईट हाऊसचा झेंडा अर्ध्यावर खाली उतरवला होता. विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी हा डाव साधला असून आमच्या चांगल्या कामांकडे लक्ष दिले जात नाही,” असे म्हणत या प्रकारावर पडदा टाकण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केला. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा करत सारवासारवही केली.



पण, लोकांवर आंदोलन करण्याची ही वेळ का आली? अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटन सर्वात जास्त कोरोना प्रभावित देश मानले जातात. या देशात मृत्यूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा वाढता आलेख आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे लोक प्रचंड तणावाखाली आहेत. सरकारवर नाराजही तितकेच आहेत. ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. सोशल मीडियावरही सरकारविरोधात एल्गार पुकारला गेला. देशांतील ढासळती आरोग्य व्यवस्था आणि एकूणच सरकारची कामगिरी याबद्दल सर्वांच्या मनात रोष आहे.


दुसरी एक घटना पाहू, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो एका पार्टीतून परतत होते. नाराज लोकांनी त्यांना रस्त्यातच घेरले. “तुम्हीच जनतेचे हत्यारे आहात. इथल्या मृत्यूंना तुम्हीच कारणीभूत आहात,” अशा आवेशात त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. “कोरोना हा साधा ताप आहे, त्याचा इतका धोका नाही!” अशी टीपण्णी करणार्‍या राष्ट्राध्यक्षाला जाब विचारला. या झटापटीतून त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना सुखरुप स्थळी पोहोचवले. ‘’कोरोना केवळ एक कल्पना आहे, लोकांनी चिंता करण्याची गरज नाही, कडेकोट ‘लॉकडाऊन’ पाळण्याचीही गरज राहिलेली नाही, लोकांनी याची चिंता करू नये,” असे म्हणणार्‍या बोल्सोनारो यांचा ‘लॉकडाऊन’चा विरोध करणार्‍यांना कायम पाठिंबा राहिला. ठोस निर्णय न घेतल्याने आतापर्यंत एकट्या ब्राझीलमध्ये 3 लाख, 65 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २२ हजार,७४६ मृत्यमुखी पडले आहेत.


आता तिसरे प्रकरण पाहू, ब्रिटनमध्ये ‘लॉकडाऊन’च्या मुद्द्यावरून बोरिस जॉन्सन वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. त्यांचे सल्लागार डोमिनिक कमिंग्स कोरोनाबाधित असतानाही पत्नी आणि आई-वडिलांसोबत लंडनहून ४२० किमी दूर डरहम येथे पोहोचले होते. सरकार, पोलीस आणि प्रशासन सर्वांना घरी राहण्याचाच सल्ला देत आहे. मात्र, एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा न्याय देत असल्याने पोलिसांत यासंबंधी तक्रार दाखल केली गेली. डोमिनिक यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात आहे. चर्चचे बिशपही सरकारवर टीका करत आहेत. ब्रिटनमध्ये २ लाख ५९हजार ५५९ कोरोना रुग्ण आहेत. ३६ हजार ७९३मृत्यू झाले आहेत. ऑस्ट्रियामध्ये ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅलेक्झान्डर बेलेन यांनी जनतेची माफी मागितली आहे. कॅनडात टोरंटो शहराचे महापौर जॉन टोरी यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन केले नसल्याने माफी मागितली. टोरंटो शहरातील ट्रिनिटी बेलवुड्स पार्क येथे हजारो लोक फेरफटका मारण्यासाठी पोहोचले आणि ‘लॉकडाऊन’चा एकच फज्जा उडाला.




‘लॉकडाऊन’च्या गोंधळात प्रगत देशही सुटले नाहीत. तिथल्या जनतेला आपल्या सरकारविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तुलनेने भारतासारखा विकसनशील देश सरकारवर विसंबून आहेच. इथली नेतेमंडळींची सद्भावना जनतेसोबत आहे. भारताइतके व्यापक स्वरुपातील ‘लॉकडाऊन’ अद्याप कुठल्याही सरकारला जमलेले नाही. मजुरांचा प्रश्न आहेच. परंतु, देशभरातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. विरोध आहेच, परंतु आंदोलन करण्याची वेळ किंवा अविश्वास दर्शवण्याची वेळ भारतीयांवर आली नाही, किंबहुना ती येऊ दिली नाही. भारतीय संस्कृतीची मूल्ये या महामारीच्या काळात जगासाठी पथदर्शी ठरली आहेत. कोरोनाच्या सावटात पश्चिम बंगालवर आलेले ‘अम्फान’ वादळ आणि त्याची पाहणी करण्यासाठी पंतपधान नरेंद्र मोदींचा दौरा असो किंवा जागतिक आरोग्य संघटनेत भारताचे उंचावलेले स्थान, सारं काही विश्वासार्ह म्हणता येईल. याउलट परिस्थिती सध्या अमेरिकेत आहे. ‘लॉकडाऊन’बद्दल ठोस अंमलबजावणी नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनचा सातत्याने विरोध, त्यातच कोरोनाच्या औषधांवरून असलेले दुमत या प्रश्नांमागे सध्या जगभरातील देश धावत आहेत. भारताने संयम दाखवत या गोष्टींशी दोन हात करण्यास सुरुवात केली हे कौतुकास्पद!
Powered By Sangraha 9.0