भारतमातेच्या पुतळ्याची भारतातच अवहेलना!

25 May 2020 22:13:16
Bharat-Mata-Statue _1&nbs



तामिळनाडू राज्यामध्ये भारतमातेच्या पुतळ्याची अवहेलना करण्याचा प्रकार आणि पूर्वांचलातील आसाममध्ये एका हिंदू भाजीविक्रेत्याची हत्या होण्याची घटना देशाच्या विविध भागात कसे वातावरण आहे त्याची कल्पना देणारे आहे.


आपल्याच देशामध्ये भारतमातेचा पुतळा बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याची वेळ आल्याचे कोणी सांगितल्यास त्यावर आपला विश्वास बसणार नाही. पण, ही वस्तुस्थिती असून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. आपल्याच देशात राहून भारतमातेच्या पुतळ्यास विरोध करणारे कृतघ्न देशात उजळ माथ्याने मिरवत आहेत, हे आणखी संतापजनक. कन्याकुमारी जिल्ह्यातील एका लहान गावातील एका मंदिरात भारतमातेचा हा पुतळा विद्यमान आहे. त्या पुतळ्यास स्थानिक ख्रिस्ती समाजाने आक्षेप घेतल्याने प्रशासनाने त्यांच्यापुढे लोटांगण घालून भारतमातेस कापडाच्या आच्छादनात गुंडाळून ठेवले. अल्पसंख्याक समाजाचे लांगुलचालन करताना आपण काय करीत आहोत, याचे भानही तेथील प्रशासनास राहिले नसल्याचेच या घटनेवरून दिसून आले.

‘ऑर्गनायझर’ने हे वृत्त देऊन, तामिळनाडू राज्यातील प्रशासन अल्पसंख्याकांच्या दबावाला बळी पडून कोणती टोकाची कृती करू शकते, यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यातील अगतीस्वरम तालुक्यातील पुलीयुर या लहानशा गावात इसाकी अम्मान मंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरात अलीकडेच तिरंगी साडीतील भारतमातेचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्यास गावकरी नित्यनेमाने अभिवादन करीत असत. पण त्या भागातील ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ख्रिस्ती समाजास चिथविल्याने त्यांच्याकडून या पुतळ्यास आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर भारतमातेचा पुतळा झाकण्यात यावा, असे आदेश पोलिसांना देण्यात आले. 21 मे रोजी सदर पुतळा झाकण्यात आल्याचे कळताच भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू मुन्ननी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भारतमातेच्या पुतळ्यावरील आच्छादन दूर केले आणि पुन्हा त्या पुतळ्यास हार अर्पण करून पूजाअर्चा केली. पोलिसांनी आगाऊपणा करून जी कृती केली त्यास इसाकी अम्मान मंदिराच्या मालकांनी लेखी तक्रार करून आक्षेप घेतला आहे. मंदिरालगतच्या खासगी जागेवर हा पुतळा उभारण्यात आला असून, त्यामुळे सार्वजनिक शांतता किंवा कायदा व्यवस्थेत कसलीही बाधा येत नसताना प्रशासनाने ही कृती का केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भारतमातेचा अवमान केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात येणार असल्याचे हिंदू मुन्ननीच्या एका नेत्याने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडूमधील एका खेड्यात घडलेली ही घटना नक्कीच दुर्लक्ष करण्याजोगी नाही. आपल्याच भूमीत देशविरोधी तत्वे कशाप्रकारे कार्य करीत आहेत, हे या घटनेवरून लक्षात येते. तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये धर्मांतर झालेला ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने आहे. त्या खालोखाल मुस्लीम समाज आहे. याच कन्याकुमारी जिल्ह्यात, समुद्रकिनारी आज जे भव्य विवेकानंद स्मारक उभे आहे. त्यास प्रारंभीच्या काळी तेथील ख्रिस्ती समाजाने विरोध केला होता. एवढेच नव्हे तर स्मारक शिलेवर क्रूस उभारून ती जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. पण, ख्रिस्ती समाजकंटकांचा विरोध मोडून काढण्यात आला आणि तेथे भव्य विवेकानंद शीला स्मारक उभारले गेले. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण एवढी वर्षे होऊन गेली तरी त्या भागातील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कुटील कारवाया थांबलेल्या नाहीत, हेच भारतमातेच्या पुतळ्याच्या अवमान करण्याच्या घटनेवरून दिसून येते.

तामिळनाडूमध्ये अघोषित आणीबाणी असून त्या राज्यामध्ये संघ आणि भाजप नेत्यांच्या भाषण स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्यात आले असल्याचा आरोप हिंदू मुन्ननी संघटनेच्या नेत्याने केला आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजाचे धार्मिक कार्यक्रम विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, पण हिंदू मंदिरांमध्ये पूजाअर्चा करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचा आरोपही त्या संघटनेने केला आहे. तामिळनाडू राज्यातील प्रशासन भेदभावपूर्ण व्यवहार करून मुस्लीम व ख्रिस्ती समाजास झुकते माप देत असल्याचा आरोप हिंदू मुन्ननीने केला आहे. भारतमातेच्या पुतळ्यास या भारतभूमीतच आक्षेप घेतला जावा आणि तामिळनाडू प्रशासनाशी त्याबद्दल काही वाटू नये, हे पाहून कोणाही देशभक्तास संताप आल्यावाचून नाही! पण, सातत्याने अल्पसंख्याक समाजाचे लांगुलचालन करण्यात गर्क असलेल्या राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या हे कधी लक्षात येणार?




Hajo-sanatan-das-murder-f


आसाममध्ये हिंदू भाजी विक्रेत्याची हत्या



तामिळनाडू राज्यात घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशाच संतापजनक घटना देशाच्या काही भागामध्ये अल्पसंख्याक समाजाकडून घडत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडे कर्नाटकात काही ठिकाणी हिंदू व्यापार्‍यांच्या दुकानातून खरेदी करण्यास आक्षेप घेण्यात आल्याच्या आणि ज्यांनी तो माल खरेदी केला तो फेकून देण्यात आल्याच्या घटना आढळून आल्या. पण, आसाममध्ये याहीपेक्षा एक अत्यंत भयानक घटना अलीकडेच घडली. मुस्लीम वस्तीमध्ये भाजी विकत असल्याबद्दल एका गरीब हिंदू भाजी विक्रेत्यास मुस्लीम जमावाने ठार केल्याचा प्रकार आसाममधील हाजोलगत मनाहकुची परिसरात घडला. ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, सायकलवरून भाजी विकण्याचा धंदा करीत असलेल्या सनातन डेकी याच्या सायकलचा धक्का एका मोटारीस लागण्याचे निमित्त झाले आणि त्यावरून या सनातनला मुस्लीम जमावाकडून मारहाण करण्यात आली. “मुस्लीम वस्तीमध्ये तू भाजी विकण्यास कसा काय येतो,” असा आक्षेप घेऊन त्यास अमानुष मारहाण करून ठार करण्यात आले. मारहाणीच्या या घटनेनंतर मारहाणीत सहभागी असलेले पाच मुस्लीम फरार आहेत. भारतामध्ये एका हिंदू गरीब भाजी विक्रेत्यास मारहाण करून त्याची हत्या करण्यापर्यंत एखाद्याची मजल कशी काय जाऊ शकते? कायद्याचा धाक आहे की नाही असे वाटावे, अशी ही घटना आहे.

तामिळनाडू राज्यामध्ये भारतमातेच्या पुतळ्याची अवहेलना करण्याचा प्रकार आणि पूर्वांचलातील आसाममध्ये एका हिंदू भाजीविक्रेत्याची हत्या होण्याची घटना देशाच्या विविध भागात कसे वातावरण आहे त्याची कल्पना देणारे आहे. तथाकथित पुरोगाम्यांना या घटनांमध्ये तसे काहीच विशेष वाटणार नाही. देशाचे ऐक्य कायम राहावे, ते अधिक भक्कम व्हावे असे त्यांना कधी वाटलेच नसल्याने त्यांच्याकडून अशा गोष्टी गांभीर्याने घेतल्या जाण्याची अपेक्षाही करता येणार नाही. पण, एखादी अल्पसंख्याक व्यक्ती जमावाच्या हल्ल्यामध्ये बळी पडल्याच्या घटनेवरून ‘झुंडबळी, झुंडबळी’ अशी आवई उठवून गळा काढणारे कथित पुरोगामी हिंदू व्यक्तीची, हिंदू साधूंची हत्या झाल्यावर मूग गिळून गप्प कसे काय बसतात, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही! हिंदू व्यक्तीच्या अशा प्रकारे झालेल्या हत्येबद्दल त्यांना काहीच कळवळा येत नाही?

तसेच धर्मांध नेत्यांकडून चिथविल्यामुळे अल्पसंख्याक समाजही आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय समाजामध्ये फूट पाडण्याचे मनसुबे जागरूक जनतेने वेळीच ओळखून त्याविरुद्ध आपली समर्थ शक्ती उभी करायला हवी. जेथे अशी शक्ती उभी राहिली तेथील देशविरोधी तत्वांच्या कारवायांना पायबंद बसल्याचे दिसून आले. पण, दुर्दैवाने देशातील काही भागात तसे वातावरण नाही. त्यामुळेच भारतमातेच्या अवमानाच्या घटना घडताना दिसत आहेत. अशा असामाजिक तत्त्वांना लगाम घालायचा असेल, त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर राष्ट्रहितास प्राधान्य देणारा समाज पूर्ण शक्तीनिशी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसे घडले तर तामिळनाडू वा आसाममध्ये घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळली जाईल!




Powered By Sangraha 9.0