प्रेक्षकांना भावणारा ‘खलनायक’

22 May 2020 15:08:52
premnath_1  H x


शाळेत असताना त्यांना चित्रपट पाहणे प्रचंड आवडायचे. परंतु, पुरेसे पैसे नसल्याने ते चोरून चित्रपटगृहात जाऊन बसायचे. एकदा ते पकडले गेले आणि तिथल्या तिकीट तपासनिसाने त्यांना चापट मारली. पुढे जाऊन त्यांनी ते चित्रपटगृहच विकत घेतले! ते म्हणजे चित्रपटसृष्टीतले लाडके खलनायक ‘प्रेमनाथ!’


भारतात इंग्रजांची सत्ता असताना २१ नोव्हेंबर १९२६ रोजी पेशावरमध्ये प्रेमनाथ मल्होत्रा यांचा जन्म झाला. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पेशावरमधून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे स्थायिक झाले. शाळेत असल्यापासूनच त्यांना चित्रपटांविषयी प्रचंड आकर्षण होते. चित्रपट बघण्याची आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी मात्र पुरेसे पैसे त्यांच्याजवळ नसत. ‘एम्पायर टॉकिज’ हे त्याकाळी शहरातील सर्वात मोठे थिएटर होते. या थिएटरच्या भिंतीवरून उडी मारून चोरून प्रेमनाथ आत प्रेक्षकांमध्ये जाऊन बसत. एकदा त्यांची ही चोरी पकडली गेली. तिकीट तपासनिसाने विचारल्यावर आपल्याजवळ तिकीट नसून, भिंत ओलांडून आल्याचे प्रेमनाथ यांनी प्रामाणिकपणे सांगितले. तपासनिसाने मात्र प्रेमनाथ यांना जोराची चापट मारली. प्रेमनाथ यांना या गोष्टीचा राग आला. “एक दिवस हे थिएटरच मी विकत घेईन,” असे सांगून ते तिथून निघून गेले.


प्रेमनाथ यांचे वडील सरकारी अधिकारी होते. आपल्या मुलाने लष्करात जावे, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर ते लष्करात दाखल झाले. मात्र, अभिनयाच्या वेडाने त्यांनी लष्करातून पळ काढला आणि ते थेट मुंबईत दाखल झाले. मुंबईत येऊन त्यांनी ‘पृथ्वी थिएटर’मध्ये अभिनय शिकायला सुरुवात केली. त्या दरम्यान त्यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. १९४८ मध्ये ‘अजित’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट तितकासा जादू दाखवू शकला नाही. मात्र, त्यानंतर आलेल्या राज कपूर फिल्म्सच्या ‘आग’ आणि ‘बरसात’ या चित्रपटांनी प्रेमनाथ यांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली. १५३ साली ‘औरत’ चित्रपट करत असताना त्यांचे अभिनेत्री बीना राय यांच्यासोबत सूत जुळले. बीना राय यांच्याशी लग्न झाल्यावर प्रेमनाथ यांनी ‘पी.एन.फिल्म्स’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली. परंतु, हे चित्रपट तिकीट खिडकीवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. यामुळे ते पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळले. या दरम्यान त्यांनी काही चित्रपटातून भूमिका केल्या.


नायकाची भूमिका साकारताना त्यांना जाणवले की, आपण खलनायक अधिक प्रभावीपणे साकारू शकतो. नायिकांच्या मागे धावणारा नायक, झाडाखाली उभा राहून गाणे गाणारा नायक त्यांना कधीच आवडला नाही. त्यानंतर त्यांनी ‘खलनायक’ साकारण्यास सुरुवात केली. १९७०मध्ये आलेला ‘जॉनी मेरा नाम’ आणि १९७५ मध्ये आलेल्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटांमधली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. या चित्रपटांतून प्रेमनाथ यांच्या अभिनयाची एका वेगळी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली.


विविध भूमिका साकारत प्रेमनाथ चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाले. १९५२ला प्रेमनाथ यांनी ‘एम्पायर टॉकीज’ विकत घेत आपली शपथ पूर्ण केली. विशेष म्हणजे, चापट मारणारा तपासनीस अजून तिथेच काम करत होता. प्रेमनाथ यांनी त्या तपासनिसाला बोलावून घेतले. ज्या खुर्चीवरून प्रेमनाथ यांना लहानपणी हाकलून लावले होते, त्याच खुर्चीवर जाऊन ते बसले. इतकंच नाही तर, त्या तपासनिसाला सन्मानपूर्वक जवळ बसवून त्याला मिठी मारली. गळ्यात हार घालून त्याचं स्वागत केलं. कृतज्ञता व्यक्त करत प्रेमनाथ त्या तपासनिसाला म्हणाले, “जर तुम्ही माझ्या कानाखाली मारली नसती, तर आज मी एवढा मोठा अभिनेता झाला नसतो.” या प्रसंगावरूनच प्रेमनाथ यांच्या प्रेमळ आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची कल्पना करता येऊ शकते.


लग्नानंतर असाही एक काळ त्यांच्या आयुष्यात आला जेव्हा त्यांच्याकडे काम नव्हते. त्या दरम्यान त्यांची पत्नी अभिनेत्री बीना राय यांचे ‘अनारकली’, ‘ताजमहाल’, ‘बुरखा’ यांसारखे चित्रपट गाजत होते. निर्मात्यांची बीना राय यांच्याकडे रांग लागायची. या दरम्यान त्यांना मानसिक नैराश्याने ग्रासले. या नैराश्यापासून दूर होण्यासाठी त्यांनी थेट हिमालय गाठला. तिथे काही काळ घालवल्यानंतर ते पुन्हा परतले आणि जोमाने कामाला लागले. यानंतर त्यांनी ‘आम्रपाली’, ‘तिसरी मंजिल’, बहारों के सपने’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले.


१९७३ मध्ये ‘बॉबी’ या चित्रपटात त्यांनी डिम्पल कपाडिया यांच्या वडिलांची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी प्रेमनाथ यांना ‘सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता’ म्हणून ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणार्‍या अभिनेत्याने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने ऐंशीच्या दशकापासून चित्रपटांतून काम करणे कमी केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळजवळ ७० चित्रपटांमधून भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी हॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमधूनदेखील अभिनय केला. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम दोनो’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.


तब्बल तीन दशकं आपल्या बहारदार अभिनयाने गाजवणार्‍या प्रेमनाथ यांनी ३ नोव्हेंबर १९९२ मध्ये या जगाचा निरोप घेतला. अशा या लाडक्या खलनायकाच्या स्मृतींना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे विनम्र अभिवादन!


Powered By Sangraha 9.0