राहुल गांधी यांनी जो ‘स्टंट’ केला, त्याचा ‘नाटकबाजी’ असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या चांगल्याच झोंबल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांची नाटकबाजी परिचित असलेल्या भाजपने त्या पक्षाचे पितळ उघडे पाडल्याने राहुल गांधी यांच्या स्टंटबाजीतील हवाच निघून गेली आहे.
कोरोना महासाथीवर नियंत्रण मिळविण्याचा आणि या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे प्रयत्न करीत असताना काही राजकीय पक्ष आणि नेते, आपणच देशातील जनतेचे कैवारी असल्याचा आव आणत असल्याचे दिसत आहेत. देशातील रोजगार बंद झाल्याने अक्षरश: हजारो लोकांनी आपल्या मूळ गावी, मूळ राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. वाहतुकीवर निर्बंध असल्याने हजारोंनी पायी चालत, आपले शेकडो मैल दूर असलेले गाव गाठण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, त्यातील काहींचा अपघाती मृत्यू झाला तर काही उपाशी राहिल्याने व अतिश्रमाने मरण पावले. देशातील कोणावरही अशी वेळ यायला नको होती!
पण, अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत उद्भवलेल्या या महासंकटाने देशासमोरच नव्हे, तर संपूर्ण जगासमोर एक आव्हान उभे केले आहे. भारतही या महासाथीस सर्वशक्तीनिशी तोंड देत आहे. या साथीस नियंत्रणात आणण्याबरोबरच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि त्या अर्थव्यवस्थेस गती देण्यासाठी विविध उपाययोजना घोषित केल्या जात आहेत. पण, या संकटात सरकारला साथ देण्याऐवजी आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल, असा प्रयत्न काहींनी चालविला आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी यांचे नाव घ्यावे लागेल. प्रत्यक्षात आपण विशेष काही करीत नसताना, खूप काही करीत असल्याचे दाखविणे हे काँग्रेस नेत्यांना चांगलेच अंगवळणी पडलेले आहे. एखाद्या घटनेचे राजकीय भांडवल कसे करायचे हे या नेत्यांना चांगले जमते!
गेला आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये अन्य राज्यांमध्ये पायी निघालेल्या काही लोकांची पदपथावर ठाण मांडून भेट घेतली. कोरोना संकट लक्षात आल्यानंतर बरेच दिवस उलटल्यानंतर आणि देशामध्ये तिसरा ‘लॉकडाऊन’चा कालावधी संपत आला असताना राहुल गांधी यांना या गरीब जनतेला भेटावेसे वाटावे, यामागे सवंग प्रसिद्धीशिवाय अन्य काही नसल्याची टीका कोणी केल्यास काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबाव्यात? गेल्या अनेक दिवसांपासून हे स्थलांतर सुरु आहे. पण, राहुल गांधी किंवा काँग्रेसचे नेते या गरीब जनतेची विचारपूस करण्यासाठी रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले नाही! एका राज्यातून आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या जनतेचे जे अपार हाल होत आहेत, त्याबद्दल देशातील प्रत्येकासच वाईट वाटत आहे. अनेक स्थानी या बांधवांसाठी मदत केंद्रेही कार्यरत आहेत. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता हजारो कार्यकर्ते आपल्या या गरीब बांधवांची सेवा करण्यासाठी हातभार लावीत आहेत. समाजसेवेचे बाळकडू प्यायलेल्या या सेवाव्रतींचे कार्य एकीकडे सुरु आहे, तर दुसरीकडे, केवळ प्रसिद्धीसाठी राहुल गांधी यांना या गरीब बांधवांचे जे भरते आले, त्यास एखाद्याने ‘नौटंकी’ म्हटले तर ते चुकीचे म्हणता येईल काय?
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून अनेक उपाययोजना आखत आहे. त्या उपाययोजनांचे स्वागत कोणा काँग्रेस नेत्याने केल्याचे दिसत नाही. त्याऐवजी दुसर्याच सूचना करण्यात आल्या असल्याचेच दिसून आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, राहुल गांधी हे ‘नाटकबाजी’ करीत असल्याची टीका केली. त्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांना एवढा राग यायचे कारणच काय? राहुल गांधी यांनी नाटकबाजी केल्याची उदाहरणे देशातील जनतेला माहीत नाहीत काय? हिंदू मतदारांची मते मिळविण्यासाठी विविध मंदिरांना भेटी देणारे आणि आपला ‘जनेऊधारी’ असा उल्लेख करणार्या राहुल गांधी यांच्या त्या नाटकबाजीला जनता विसरलेली नाही! त्यामुळे राहुल गांधी यांनी पायी जाणार्या गरीब जनतेची भेट घेऊन जे खोटे अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केला, त्यास निर्मला सीतारामन यांनी ‘नाटकबाजी’ म्हटले याचा काँग्रेसच्या नेत्यांना राग का यावा? निर्मला सीतारामन यांनी अशी टीका करून, देशातील गरीब जनतेचा अवमान केला असल्याने त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेची माफी मागावी, अशी अजब मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी या गरीब बांधवांची भेट घेण्याचा जो प्रकार केला तो म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा ‘स्टंट’ होता, हे राजकारणाची थोडीफार जाण असलेल्या कोणाही नागरिकाच्या सहजपणे लक्षात येईल. या घटनेचे भांडवल करून जनतेला भडकविण्याचा जो प्रयत्न काँग्रेस करू पाहत आहे, तो मात्र कधीच यशस्वी होणार नाही. देशापुढील या संकटास न डगमगता तोंड देण्याचे प्रयत्न कोण करीत आहे, जे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते जनतेला दिसत आहेत. त्या सर्व प्रयत्नांना साथ द्यायची की वेगळा काही मुद्दा उपस्थित करून त्यास फाटे फोडायचे? सर्व देश या संकटास एकदिलाने तोंड देत असल्याचे चित्र आम्हाला नाही का दाखविता येणार? देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकडे काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी लक्ष दिल्यास या राज्यातील जनता त्यांना दुवा दिल्यावाचून राहणार नाही! महाविकास आघाडी सरकारला या संकटावर मात करण्यासाठी राहुल गांधी यांनी काही ‘मोलाचे मार्गदर्शन’ करायला हरकत नाही!
राहुल गांधी यांनी जो ‘स्टंट’ केला, त्याचा ‘नाटकबाजी’ असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या चांगल्याच झोंबल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांची नाटकबाजी परिचित असलेल्या भाजपने त्या पक्षाचे पितळ उघडे पाडल्याने राहुल गांधी यांच्या स्टंटबाजीतील हवाच निघून गेली आहे. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करून देशतील जनतेला चिथविण्याचे प्रयत्नही यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे.
ममता बॅनर्जी यांची दुसरी तर्हा!
प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये आणि स्थलांतरित जनतेचे प्रश्न योग्य प्रकारे सोडविण्यात अपयशी ठरल्यावरून त्या सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची खरी माहिती दडवून ठेवली जात असल्याचे आणि ही माहिती उघड झाल्यास संबंधित नोकरशहांच्या बदल्या ममता सरकारकडून केल्या जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. प. बंगालमधील आजची परिस्थिती लक्षात घेता पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी त्या सरकारला दिला आहे. एकूणच ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा आडमुठेपणा या संकटमय परिस्थितीमध्येही दिसून येत आहे. कोरोना महासाथीस तोंड देण्याचा भरकस प्रयत्न केंद्र सरकार करीत असताना आणि त्या प्रयत्नांना हातभार लावण्याऐवजी त्यामध्ये आपण अडथळे आणता कामा नयेत, हे काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या लक्षात कधी येणार?