‘चटनी चाची’

17 May 2020 20:49:44
Anindita Sengar _1 &



‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेशी तंतोतंत जुळणारी आणि इतर महिलांसाठी आदर्श ठरलेली ‘चटनी चाची’ या ब्रॅण्डच्या शिल्पकार अनिंदिता सेंगर यांच्याविषयी...



‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत सध्या देशातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. नवनवीन संकल्पना घेऊन प्रत्येकजण काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी ‘लॉकडाऊन’च्या या खडतर काळातही झटत आहे. देशातील युवा पिढी यात कुठे मागे राहिलेली नाही. ‘चटनी चाची’ या ब्रॅण्डच्या निमित्ताने मुंबईत राहणार्‍या अनिंदिता सेंगर यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपची संकल्पना इतर तरुणांसाठी एक आदर्श मॉडेल ठरणार आहे.


लहानपणापासूनच स्वयंपाक घरात रमणार्‍या अनिंदिता यांना पदार्थांवर प्रयोग थोडक्यात ’जुगाड’ करून काहीतरी नवीन बनवून खवय्यांची भूक भागवण्याची हौस. गेल्यावर्षी याच संकल्पनेतून त्यांनी स्वतःचा एक ‘चटनी चाची’ नावाचा स्टार्टअप सुरू केला. शेतातून येणार्‍या ताज्या भाज्यांपासून तयार केल्या जाणार्‍या चटणीची चव अनेकांची पसंद बनली. व्यवसायाच्या सुरुवातीलाच ‘चटनी चाची’च्या उत्पादनांनी खवय्यांच्या मनात जागा केली. घाऊक उत्पादन, थेट बाजारात विक्री, ग्राहकवर्ग यासाठी अजून बराच अवकाश आहे. मात्र, अनिंदिता या हजारो महिलांची प्रेरणा ठरल्या आहेत. आपल्या या लहानशा स्टार्टअपला एक मोठा ब्रॅण्ड बनवण्याचे स्वप्न त्या पाहत आहेत.


मानसशास्त्रातून शिक्षण घेणार्‍या अनिंदिता यांनी काहीकाळ याच क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरवले होते. काही दिवसांनी त्यांना एका मोठ्या कंपनीत एचआर म्हणून संधी चालून आली. मात्र, लग्नानंतर पतीच्या नोकरीमुळे त्यांना शांघाय येथे स्थायिक व्हावे लागले. तिथे गेल्यानंतर वर्क परमिटशिवाय काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी एक लहानसे ‘रोटी किचन’ सुरू केले. इथे ग्राहकांना भारतीय पद्धतीचे जेवण, भाजी-पोळी, चटणी, लोणचे अशी उत्पादने मिळत. परंतु, काही कारणास्तव 2017 मध्ये त्यांना पुन्हा भारतात स्थायिक व्हावे लागले.



भारतात येऊन पुन्हा याच संकल्पनेतून ‘रोटी’ किचनची सुरुवात केली. मात्र, इथे त्यांना अपयश आले. त्यामुळे एका कंपनीत पुन्हा मानसशास्त्रज्ञ म्हणून नोकरी सुरू केली. दिवस सरत होते पण नोकरीत मन रमेना. व्यवसायाची ओढ कायम होती. स्वतःसाठी काम करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. स्वयंपाकघरात रमणेच अधिक आवडीचे वाटू लागले होते. काही महिने नोकरी केल्यानंतर गरोदरपणासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. प्रसुतीनंतरही स्वयंपाक घरातील विविध प्रयोग सुरूच होते. यशही मिळत होते. सुरुवातीला काही दिवस घरी मग मित्रांसाठी पदार्थ पाठवून देत होत्या. अशाच एका मैत्रिणीने त्यांच्या हातची चव ओळखून चटणी, लोणचे आणि सॉस तयार करून बाजारात आणण्याचा सल्ला दिला. त्याच मैत्रिणीने पहिली ऑर्डर दिली आणि तिथूनच सुरुवात झाली ‘चटनी चाची’ या नव्या स्टार्टअपची. ग्राहकांपर्यंत चव पोहोचली होती. त्यामुळे नवनवीन ऑर्डर मिळत गेल्या. या सगळ्यात त्यांचे पती कायम सोबत राहिले. ‘चटनी चाची’ हे नावही त्यांनीच सुचवले.



हळूहळू ब्रॅण्डचा लोगो आकार घेऊ लागला. सोशल मीडियावर याची जाहिरात होऊ लागली. सुरुवात अगदी पुदिना चटणीपासून झाली. प्लास्टिकच्या डब्यात आकर्षक पॅकिंग देण्यात आले. ग्राहकही ऑर्डर देऊ लागले होते. आता बाजारात उतरण्याची वेळ आली होती. स्टॉल्स लावण्याची कल्पना त्यांना सुचली. जुहू येथील एका बाजारात त्यांनी स्टॉल्स लावण्यासाठी विचारणा केली होती. मात्र, तिथे केवळ सेंद्रीय उत्पादनांचीच विक्री केली जाऊ शकते, असे त्यांना सांगण्यात आले. अनिंदिता सेंगर यांनी उत्सुकतेपोटी सेंद्रीय शेती फळे व भाज्यांची माहिती घेण्याची सुरुवात केली. जैविक फळे आणि भाज्यांपासून बनलेले पदार्थच विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर पॅकिंगवरही काम करण्यास सुरुवात केली. प्लास्टिक न वापरता आपल्या उत्पादनांना काचेचे पॅकिंग दिले. एकदम मोठे पाऊल टाकण्यापेक्षा हळूहळू मिळणार्‍या पैशांतून एक एक निर्णय घेत पुढे गेल्या. चुकांमधून शिकत आता स्वतःच्या व्यवसायाला उभारी देण्याची धडपड सुरू आहे.



पुदिना, टोमॅटो, लसूण, कोथिंबिर, मिरची, कैरी अशा विविध प्रकारची चटणी बनवण्याचे काम ‘चटनी चाची’तर्फे केले जाते. सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत एकूण ४५० ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. ग्राहकांची यादी वाढत चालली आहे. ‘व्हाईट ऑर्गेनिक’, ‘वी वर्क’, ‘शरण मार्केट’ आदी रिटेल्स शॉपमध्येही त्यांची उत्पादने पोहोचली आहेत. कसलीही साठवणूक न करता मागणी येईल त्यानुसार तितकेच उत्पादन तयार करतात. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या सर्वच ठिकाणचे व्यवसाय ठप्प आहेत. परंतु, या वेळेचाही सदुपयोग त्या स्वतःच्या व्यवसायाला नवी उभारी देण्याच्या योजना आखण्यात करत आहेत. ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर पुढे काय करायचे याची तयारी सध्या सुरु आहे. ‘चटनी चाची’चे काम व्यापक स्तरावर सुरु करता येईल का, याचा विचार त्या करत आहे. केवळ पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता देशातील महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला आहे.



सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या मालाला योग्य भावात खरेदी करण्याचाही त्यांचा विचार आहे. याशिवाय त्यांच्याकडून अन्य कुठल्या पीक उत्पादनाद्वारे नवीन संकल्पना राबवण्याचा विचारही त्या करत आहेत. भारतातील स्त्रीयांकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मबळ असते. कुठलेही काम करण्यासाठी त्या दबावामुळे कचरतात परंतु त्यांना पाठबळाची गरज आहे, याच उद्देशाने सदैव कार्यरत असणार्‍या अनिंदिता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!






Powered By Sangraha 9.0