स्त्रीवर्गाचा सन्मान

13 May 2020 22:17:46

ramdas swami_1  


 



रामदासांनी स्त्रियांविषयी आदर दाखवून स्त्रीत्वाचा सन्मान केलेला आहे. असेच त्यांच्या चरित्रावरून व दासबोधातील वेच्यांवरून दिसून येते. दासबोधातील स्त्री-पुरुष भेदासंबंधी विवरण महत्त्वपूर्ण आहे.




वाग्दत्त वधूला अंतरपाटापलीकडे सोडून लग्नसमारंभातून नारायण पळाला, या घटनेवर अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत. हा नारायण पुढे स्वकर्तृत्वाने ‘समर्थ’ पदवीला पोहोचला व लोक त्याला ‘समर्थ रामदास स्वामी’ या नावाने ओळखू लागले. स्वामींनी समर्थ संप्रदाय स्थापन करून अनेक जीवांचा उद्धार केला. शक्तीची उपासना सांगून अलौकिक कार्य करून कीर्ती मिळवली, तरी ‘ते लग्नातून पळाले’ हा ठपका त्यांच्यावर राहिला.

या घटनेवर स्त्रीमुक्तीवाद्यांनी त्या वाग्दत्त वधूचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे मत मांडून त्याला सर्वस्वी रामदास जबाबदार आहेत, असा दोषारोप रामदासांवर ठेवला. नवराच पळाला म्हणजे ती स्त्री परित्यक्ता झाली व समाजात तिला काही किंमत राहिली नाही. तिचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यामुळे अनेकांना तिचा कळवळा आला. त्यावर छोटी पुस्तके लिहिली गेली. कथा रचल्या गेल्या. पण, कच्च्या पायावर उभारलेल्या इमारती फार काळ टिकत नाहीत. यातील घटनांचा विचार करता मुळात असे काही घडलेच नाही, असे इतिहास सांगतो. नारायण लग्नमंडपातून पळाला, ही घटना सत्य आहे. पण, तेथील वाग्दत्त वधू परित्यक्ता झाली, हे मात्र खरे नाही. त्याच मंडपात दुसरा वर नेमस्त करून वधूच्या वडिलांनी तिचे कन्यादान केले, असे इतिहास सांगतो. आत्मारामस्वामींनी लिहिलेल्या ‘दास विश्रामधाम’ या प्रचंड ग्रंथात रामदासांचे चरित्र व संप्रदाय यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यात ते लिहितात, “नारायण पळाल्यावर वधुपिता म्हणाले की, “या मंडपात दुसरा मुलगा पाहून त्याच्याशी माझ्या कन्येचा विवाह लावतो आणि नारोबा परतून आले, तर मी माझी दुसरी कन्या त्याला देईन.”

पुन्हा नारोबा येईल जरी । कन्या अर्पिन माझी दुसरी ।
मग त्याच मंडपी दुजा शोधून । नेमून केले कन्यार्पण ॥
(दास विश्रामधाम)


हनुमंत स्वामींनी लिहिलेल्या बखरीतही असाच उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्या वाग्दत्त वधूचे पुढे काय झाले, याची काळजी स्त्रीमुक्तीवाद्यांनी सोडून द्यावी. आई, भाऊ, घरदार, मित्र हे सारे मायेचे पाश सोडून आपल्या संकल्पित कार्यासाठी रामदास घराबाहेर पडले, हे सत्य आहे. त्यांच्या ठिकाणी निजज्ञानाची पहाट उगवण्याची ती वेळ होती. सारे मायापाश, बंधने तोडून बाहेर पडायचे, हे केव्हा ना केव्हा तरी व्हायचे होते, तसे विधिलिखित होते. पण, त्याला मुहूर्त त्यांच्या लग्नमंडपात मिळाला, इतकाच या घटनेचा अर्थ आहे.

या प्रसंगावरून रामदासांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन उदारमतवादी नव्हता, असा जर कोणी समज करून घेतला, तर तो सर्वस्वी चुकीचा आहे, असे म्हणावे लागेल. रामदासांनी स्त्रियांविषयी आदर दाखवून स्त्रीत्वाचा सन्मान केलेला आहे. असेच त्यांच्या चरित्रावरून व दासबोधातील वेच्यांवरून दिसून येते. दासबोधातील स्त्री-पुरुष भेदासंबंधी विवरण महत्त्वपूर्ण आहे. मूळ परब्रह्म हे शाश्वत, निर्विकार, निश्चल आहे, हे जरी खरे असले तरी पिंडात नर-नारी भेद मुळात आहे म्हणून ते पुढे प्रगट होतो. सृष्टीतील पिंडब्रह्मांडाना सिद्धांत समजून घेतला तर पिंडाची रचना समजते. फळामध्ये बी असते, पण बीमध्ये फळ गुप्तरुपाने असते.




फळ फोडिता बीज दिसे । बीज फोडिता फळ नसे ।
तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडी ॥ (१७.२.१४)





मुळातच पिंडामध्ये नर-नारी हा भेद दिसतो. त्यामुळे स्त्रियांचा व पुरुषांचा देहस्वभाव वेगळा असतो. पण, सर्वांचा जीव एकच असतो. देहाशी संबंध आल्याने हा भेद वर वर दिसतो. देहसंबंध सुटला तर नर-नारी हा भेद नाहीसा होतो. सृष्टीत ईश्वराने मोठे सूत्र तयार करून स्त्री-पुरुष यांना वासनेने बांधून टाकले आहे.

ईश्वरे मोठे सूत्र केले । परस्परे वासनेस । बांधोनि टाकले ॥




या ईश्वरी सूत्राचा उद्देश एवढाच की, त्या योगे विश्वातील जीवाच्या उत्पत्तीचे कार्य सुकर व्हावे. या विश्वात वासना गूढरुपाने वावरत असते. तिच्या बंधनाने कुटुंबसंस्था निर्माण होऊन स्त्री-पुरुष एकमेकांत गुंतून राहतात. देहसंबंध पलीकडे नर-नारी हा भेद राहत नाही. ईश्वरभावाने जेव्हा आत्म्याची ओळख होते, त्यानंतर स्त्री-पुरुष भेदाची दृष्टी मावळते. या संदर्भात संत मीराबाईचे उदाहरण मोठे उद्बोधक आहे. मीरा बालपणापासून कृष्णभक्त होती. ती कृष्णभक्तीशी समर्पित झाली होती. ऐन तारुण्यात ती विधवा झाली. तिची विरक्ती वाढत गेली. तीर्थयात्रा करीत ती वृंदावनला आली. त्यावेळी तेथे चैतन्य संप्रदायी जीवगोस्वामी हे महान कृष्णभक्त राहत होते.

तेथील साधूवृंदात ते प्रसिद्ध होते. मीरा त्यांना भेटायला गेली. परंतु, त्यांनी भेट नाकारली. त्यांनी निरोप पाठवला, “मी स्त्रियांना भेटत नाही.” ते ऐकल्यावर मीराने त्यांना उलट निरोप पाठवला की, “आपण महान कृष्णभक्त म्हणून मी दर्शनास आले होते. मी असे समजत होते की, या वृंदावनात भगवान श्रीकृष्ण हा एकच पुरुष आहे आणि बाकी सारे गोपी किंवा स्त्रीरुपे आहेत. पण, आज मला समजले की, येथे स्वतःला पुरुष मानणारा आणखीही कुणीतरी आहे.” तो निरोप ऐकल्यावर जीवगोस्वामी उघड्या पायांनी बाहेर आले व त्यांनी मीरेची क्षमा मागितली.

पिंडात सूप्तरुपात असलेला नर-नारी भेद पुढे प्रगट होतो. असे असले तरी स्त्री-पुरुषांच्या भावनिक अवस्थेत स्वामींनी स्त्रीमनाची प्रतिष्ठा मान्य करून स्त्रीधर्माला एकप्रकारे मानवंदना दिलेली आहे.




बाळकास वाढवी जननी । हे तो नव्हे पुरुषाचेनी ।
उपाधी वाढे जयेचेनी । ते हे वनिता ॥ (१७.२.२६)
वीट नाही कंटाळा नाही । आलस्य नाही त्रास नाही ।
इतुकी माया कोठोचि नाही । मातेवेगळी ॥ (२७)




कंटाळा, आळस, त्रासा न करता मोठ्या मायेने आई होऊन फक्त स्त्रीच आपल्या लहान बाळाला वाढवीत असते. ते पुरुषाचेनी शक्य नाही, असा निर्वाळा देऊन रामदासांनी स्त्रीत्वाचा महान गौरव केलेला आहे. स्वामींच्या समकालीन कोणाही ग्रंथकाराने स्त्रीचा असा विवेकपूर्ण गौरव केलेला दिसून येत नाही. स्वामी नुसता स्त्रीत्वाचा गौरव करून थांबले नाहीत, तर गुणवान स्त्रियांना त्यांनी आपल्या संप्रदायात सामील करून घेतले. ज्या काळात संत म्हणवणारे विचारवंतसुद्धा बायका-पोरांचा दुस्वास करीत असत. बायका-पोरे परमार्थ मार्गातील धोंड समजत, त्या काळात स्त्रियांच्या अपेक्षित अंतःकरणातील पारमार्थिक शक्ती स्वामींनी ओळखली. स्त्री म्हणून त्यांनी कधीही कुणाचा दुस्वास केला नाही.



ज्यांच्यात त्यांना गुणवत्ता दिसली, त्या सार्‍यांना स्त्री-पुरुष असा भेद न करता संप्रदायात समाविष्ट करून घेतले. स्त्रियांच्या अंगची सूप्त शक्ती ओळखून त्यांना योग्यतेनुसार संप्रदायात काम देण्याचे औदार्य व चातुर्य स्वामींनी दाखवले. स्वामींच्या अंगची ही गुणग्राहकता विशेष आहे. स्वामींचा अनुग्रह घेऊन त्यांच्या संप्रदायात काम करणार्‍या अनेक स्त्रिया होत्या. साडेतीनशे वर्षांपूर्वी वाया जाणारी ही स्त्रीशक्ती स्वामींनी परमार्थ व समाजकार्यासाठी मार्गी लावली. संप्रदायात अनेक स्त्रिया समाविष्ट झाल्या. उद्धवस्वामींच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई, आपाबाई, सखाबाई, गंगाबाई, गोदाबाई, सरलाबाई, कृष्णाबाई अशा कितीतरी स्त्री शिष्यांची नावे सांगता येतील. या सर्व शिष्यांमध्ये चिमणाबाई ऊर्फ आक्का आणि वेणाबाई यांना अग्रपूजेचा मान असे.

वेणाबाईंचा जन्म सुशिक्षित घरात झाला. त्यांचे वडील गोपाजीपंत देशपांडे कोल्हापुरातील चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व होते. वेणाबाई बालविधवा होत्या. वडिलांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले व आध्यात्मग्रंथ वाचनाची आवड लावली. वेणाबाई मूळात हुशार. त्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित होत. ‘एकनाथी भागवत’ त्यांचा आवडता ग्रंथ होता. त्याच सुमारात कोल्हापुरात समर्थ रामदासांची कीर्तने ऐकण्याचा योग वेणाबाईंना आला. कीर्तन संपल्यावर त्या रामदासांना आपल्या शंका विचारून त्यांची उत्तरे मिळवत. एक तरुण बालविधवा या गोसाव्याशी रोज बोलत बसते, याने अनेक संशयित नजरा आपापसात बोलू लागल्या. लोकनिंदेच्या अग्निदिव्यातून त्या निष्कलंक होऊन बाहेर पडल्या. रामदासांना गुरु मानून, त्यांचा अनुग्रह घेऊन वेणाबाईने स्वतःला समर्थचरणी वाहून घेतले. त्या म्हणतात-

हृदयीं धरिले सद्गुरुचरण । प्राणांतीही विसंबेना ॥




दरवर्षी रामनवमीच्या उत्सवासाठी त्या चाफळला जात. त्यांच्यातील गुण ओळखून रामदासांनी त्यांना वेणास्वामी पदवी देऊन मिरजला मठाधिपती म्हणून नेमले. सर्व स्त्रीशिष्यांत उभे राहून कीर्तन करण्याची परवानगी फक्त वेणास्वामींना होती. शिष्यांत त्यांचे स्थान असामान्य होते. समर्थशिष्या आक्काबाईसुद्धा बालविधवा असून अतिशय हुशार व धोरणी होत्या. सज्जनगडाची सर्व व्यवस्था त्या पाहत. रामदास असताना व त्यांच्या नंतरही सदतीस वर्षे त्यांनी सज्जनगड मठाची व्यवस्था समर्थपणे सांभाळली. आपणामागे आक्काबाईंनी संप्रदाय चालवावा, अशी स्वामींची इच्छा होती. आक्काने एकदा स्वामींना विनंती केली की, “सर्वांनी कोणा एकाच्या आज्ञेत वागावे, असा नियम घालून द्यावा.” तेव्हा स्वामी म्हणाले, “हे काम तू कर.” त्यावर आक्का म्हणाल्या, “मी अनधिकारी स्त्री आहे आणि पुढे वंश नाही.” मग रामदासांनी ते काम उद्धवला सांगितले. संप्रदायात आक्काचे स्थान वरचे होते हे नक्की. स्वामींना जेथे गुण दिसले, त्याचा त्यांनी आदर केला, मग ती गुणवान व्यक्ती स्त्री का असेना.
- सुरेश जाखडी





Powered By Sangraha 9.0