अन्न हे पूर्णब्रह्म...(भाग-४)

11 May 2020 20:10:44


grains_1  H x W


उन्हाळा म्हटला की अन्नधान्याची वाळवण-साठवण ही ओघाने आलीच. तेव्हा, नेमकी ही साठवण कशी करावी आणि हे करणे आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरु शकते, याचा आढावा घेणारा हा लेख...
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बर्‍याच सवयी बदलाव्या लागल्या आहेत. अन्नधान्य, भाजीपाला उद्या मिळेल का नाही, या भीतीने अन्नधान्याची साठवणूक सुरू आहे. डाळी, साखर, चहा-कॉफी, मॅगी, पास्ता, सुक्या पुर्‍या इत्यादी... मागील आठवड्यात आमच्या येथील वाण्याकडे किराणा आणायला गेले होते. तेव्हा तो वाणी सांगत होता. पाणीपुरीसाठी लागणार्‍या पुर्‍या ‘लॉकडाऊन’च्या आधी पाच ते सहा पाकिटे शनिवार-रविवार विकत असे. आता आठवड्याभरात ५० ते ६० पाकिटे विकली जात आहेत! ‘लॉकडाऊन’मध्ये पूर्ण परिवार घरी. मग कधी बटाटावडा, तर कधी चाट, तर कधी पावाचे पदार्थ! या सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ होतो. पूर्वीसारखे ‘लॉकडाऊन’मध्येही लोक साठवण करू लागले आहेत, पण चुकीच्या जिन्नसांची!

 
हल्ली दवाखान्यात जे रुग्ण येतात, त्यातील निम्म्यांना पचनशक्तीच्या विविध तक्रारी आहेत. कुणास पोट साफ होत नाही, कुणास अजीर्ण होते, ढेकर येतात, प्रचंड आळस जाणवतो, पोट फुगल्यासारखे वाटते इ. हे लक्षात घ्यायला हवे की, ‘लॉकडाऊन’मुळे शारीरिक हालचाल निम्म्याहून कमी झाली आहे. घरातील चार भिंतीमध्येच जो वावर करता येतो, तेवढाच केला जातो. झोपायच्या आणि उठायच्या वेळा बदलल्याने, ‘बॉडी क्लॉक’ तसंही विस्कळीत झालं आहे. बहुतांशी घरातून दुपारी नाश्ता होतो आणि चार वाजता जेवण! या सगळ्यामुळे पचनशक्ती मंदावलेली दिसते. त्यात मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ इ. पचायला जड अन्न खाल्ल्यास त्याचा त्रास होतो. उन्हाळ्यात तशी भूक कमी आणि तहान जास्त लागते. पण, आवडीचे पदार्थ, जिन्नस असल्यास दोन घास जास्तच खाल्ले जातात. थोडक्यात काय, तर व्यय, वापर कमी आणि साठवण जास्त! या अर्धवट पचलेल्या अन्नाचा शरीराला फारसा फायदा होत नाही. पण, त्याचा अपाय मात्र होतो. असेच खूप दिवस चालू राहिले तर वजन वाढणे, मधुमेह-उच्च रक्तदाब असलेल्यांचे ते त्रास बळावणे, सर्दी-पडसे होणे इ. उद्भवू शकते. म्हणून ‘रेडी टू इट फूड’ थोड्या मात्रेत खावे. उन्हाळ्यात तशीही भूक कमी असते. तेव्हा पचायला हलके, शरीरास पोषक आणि आरोग्यास हितकर असेच अन्न खावे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी इ.चा वापर सांगितला आहे. पण, हे पदार्थही वर्षभर जुने असावे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.


 
नवधान्यामध्ये ओलावा (आर्द्रता) अधिक असतो. हे नवधान्न पचायला जड आणि कफाचे-मेदाचे व क्लेदाचे प्रमाण शरीरात वाढविणारे असते. प्रमेह, मधुमेह, स्थैल्य, कफाचे विकार, विविध त्वक्र्ोग इ.मध्ये नवीन धान्य सेवन करणे, हे एक मुख्य कारण सांगितले आहे. आपल्या आहारात जर असे नवधान्य असेल, तर वरील आजार होण्याची शक्यता वाढते. पण, हीच धान्ये जर उन्हात वाळवली किंवा भाजली, तर त्या अग्निसंस्कारामुळे त्यातील ओलावा कमी होतो. तसेच जुन्या (एक वर्ष जुने) धान्यातही ओलावा कमी असतो आणि ते कोरडे व रुक्ष होते आणि पचायला हलके होण्यास सुरुवात होते. असे धान्य जर वापरले तर ते कफकारक, मेदकारक व क्लेदकारक ठरत नाही. शरीरात, आतड्यांत अधिक काळ चिकटून राहात नाही आणि वजनही आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तर अशा उपयोगी धान्याची साठवण कशी करावी, ते बघूया. भारतामध्ये (महाराष्ट्रात व जवळच्या अन्य प्रांतांत) उन्हाळ्यात (म्हणजे एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर) कडक ऊन असते. पातळ, सुती कपड्यावर उन्हात गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी, नाचणी इ. वाळत घालावे. दोन-तीन तासांनी त्यावरून हात फिरवावा. (खालचे वर व वरचे खाली करावे.) एक ते तीन दिवस, असे उन्हात ठेवावे. कडकडीत वाळले की, ते उन्हातून काढावे. रुम ट्रेम्पेचरला आले की, भरून ठेवावे. असे केल्याने धान्य टिकविण्यासाठी अन्य काही वेगळा उपाय लागत नाही.

 
 
रासायनिक भुकट्या, गोळ्या इ. वापरू नये. कारण, ही रसायने धान्यामध्ये शोषली जातात. धुतल्यावरही ती निघत नाही आणि धान्य अधिक धुतल्यास धान्यातील पोषकांश निघून जातो. त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीचा वापर करावा. हल्ली गच्चीवर छत असल्याने आणि अंगण, पडवीचा अभाव असल्यामुळे वाळवणं शहरात शक्य होत नाहीत. अशा वेळेस खालील पद्धतीने साठवण करावी. कडुनिंबाची पाने ताजी घेऊन, धुवून सावलीत सुकवावीत. हा सुकलेला पाला धान्यात मिसळावा. धान्य ज्या पेटीत (डब्यात) ठेवणार आहात, त्याच्या तळाशी पानांचा जाडसर थर घालावा. (वाळलेल्या पानांचा) मग धान्य घालावे व सर्वात वर पुन्हा वाळलेला पाला घालावा. यामुळे कीड, कीटक लागत नाही. त्यांची वाढ होत नाही. हा डबा मात्र हवाबंद झाकणाचा हवा. या घट्ट बसणार्‍या झाकणांमुळे त्यात कीडे, मुंग्या आत प्रवेशित होऊ शकणार नाहीत आणि वातावरणातील आर्द्रतेशी त्या धान्याचा संपर्कही होणार नाही. जेव्हा जेव्हा त्यातून धान्य उपसायचे असेल, काढायचे असेल, तेव्हा हात आणि भांडे स्वच्छ आणि कोरडे असावे.
 
 
या पद्धतीने साठविल्यास त्यातील आर्द्रता कमी राहते. किडे होत नाहीत आणि झाल्यास प्रजनन क्षमता कमी (नाहीशी) होते. विशेषतः उन्हात वाळविल्याने पण. यामुळे धान्याची गुणवत्ता व पौष्टिकता अबाधित राखली जाते. त्यात कीटक व सूक्ष्म जैविक घटकांचे मलमूत्र इ. विषसमान पदार्थ पडत नाही व आपले आरोग्य टिकण्यास मदत होते. याबरोबर अजूनही पर्याय आहे. गहू, तांदूळ, कडधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी इ.ला एरंडेल चोळावे. याचे प्रमाण- एक किलो धान्यासाठी १० मिली तेल इतके असावे. तेल हाताला चोळून घ्यावे आणि तो हात धान्याला लावावा, धान्य चोळावे. धान्यात एरंडेल हळूहळू शोषले जाते. धान्य चिकट राहत नाही आणि पोटासही हे हितकर आहे. काही वेळेस एरंडेलप्रमाणे निंब तेलाचाही वापर होतो. पण, ते थोडे कडवट असते. जसे कडुनिंबाची पाने वापरली जातात, तसेच बिब्बा, करंज झाडाची सुकी फळे, मीठ, तांदळामध्ये (विशेषतः) लसूण असे घालण्याची पद्धत आहे. पण, यापेक्षा उन्हात वाळवणे, कडुनिंबाचा पाला घालणे आणि एरंडेल चोळणे हे अधिक परिणामकारक आणि प्रभावी आहे. तेव्हा ‘लॉकडाऊन’चा असाही उपयोग आपण करून घेऊया. वर्षभराचे भारतीय धान्य आपण, मिळेल तेवढे, त्या प्रमाणात साठवूया. अतिमात्रेत नव्हे. (क्रमशः)
 

- वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

 
 
Powered By Sangraha 9.0