नवा सामरिक मार्ग

11 May 2020 20:46:42


china_1  H x W:

१९६२च्या युद्धापासूनच इथे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) गस्त घालत आहे. तसेच चीनने फार पूर्वीच आपल्या सीमेपर्यंत रस्ता बांधून तयार केलेला आहे. हिमालयाला तोडून सीमेपर्यंत मूलभूत सोयी-सुविधा विकसित करण्यावर चीनने सातत्याने पुष्कळ पैसा खर्च केला आहे. दुसरीकडे लिपुलेख ला या ठिकाणाला मानससरोवरला जाणार्‍या मार्गाशी जोडल्याने नेपाळने नाराजी व्यक्त करत लिपुलेखवर पुन्हा एकदा आपला हक्क असल्याचे सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या आणि दुसर्‍या कार्यकाळात जगभरातील अनेक देशांबरोबरच शेजारी देशांशीही सौहार्दाचे, मित्रत्वाचे संबंध स्थापन करतानाच, सीमासंरक्षणासाठीही सातत्याने आश्वासक पावले उचलली. परिणामी, चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांबरोबर सामरिक संतुलन स्थापन करण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. नुकतेच भारताने धारचूला या उत्तराखंडमधील गावाला लिपुलेख ला’शी जोडून आणखी एक मोठे सामरिक यश मिळवले आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘बीआरओ’ने बांधलेल्या नव्या मार्गामुळे भारतीय लष्कराला चिनी सीमेपर्यंत सुलभतेने पोहोचता येईलच, तसेच कैलास-मानससरोवर या तीर्थयात्रेचा रस्तादेखील सुगम झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, या प्रदेशात भारत, नेपाळ आणि चीन या तिन्ही देशांच्या सीमा एकमेकांना भिडतात. शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रिमोटच्या माध्यमातून धारचूला (उत्तराखंड) आणि ‘लिपुलेख ला’(चीन सीमा)पर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन केले. राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, “नवा रस्ता पूर्ण झाल्याने स्थानिक लोक आणि तीर्थयात्रेसाठी जाणार्‍या भाविकांचे दशकानुदशकांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.” राजनाथ सिंह यांनी यावेळी ‘बीआरओ’ आणि अभियंत्यांचे, कामगारांचे अभिनंदनही केले. विशेष म्हणजे, कोरोनासारख्या कठीण काळात हिमालयातील दुर्गम प्रदेशात, आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहून हा रस्ता बांधणार्‍या ‘बीआरओ’ कर्मचार्‍यांच्या योगदानाचे राजनाथ सिंह यांनी कौतुकही केले.
 

धारचूला ते लिपुलेख ला रस्तानिर्मिती केवळ कैलास मानससरोवर तीर्थयात्रेपुरतीच महत्त्वाची नाही, तर सामरिकदृष्ट्याही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रथमतः अध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्यास मानसरोवर लिपुलेख लापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर आहे. आताच्या रस्तानिर्मितीआधी तिथे पोहोचण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागत असे. यापुढे मात्र नव्या रस्त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी केवळ सातच दिवस लागतील. दरम्यान, बुंदीपासून पुढे ५१ किलोमीटर अंतराचा आणि तवाघाटापासून लखनपूरपर्यंतचा २३ किलोमीटरचा रस्ता फार पूर्वीच बांधून तयार करण्यात आला होता. परंतु, लखनपूर आणि बुंदीदरम्यानचा परिसर हिमालयाच्या दुर्गम भागात असल्याने रस्ताबांधणीसाठी कठीण होता आणि त्यामुळेच हे आव्हान पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागला. आता मात्र ‘बीआरओ’ने रस्ता पूर्ण केल्याने श्रद्धाळूंना इच्छितस्थळी जाण्यासाठी अधिकचा वेळ लागणार नाही.
 
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धारचूला आणि लिपुलेख ला या दोन्ही ठिकाणांना एकमेकांशी जोडल्याने आता भारतीय लष्कराच्या जवानांना भारतीय चौक्यांपर्यंत पोहोचणे फारच सुलभ झाले आहे. ८० किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून त्याची उंची ६ हजार ते १७ हजार ६० फूट इतकी आहे. परिणामी, १७ हजार फूट उंचीवरील लिपुलेख लापर्यंत भारतीय लष्करासाठी रसद आणि युद्ध साहित्य या मार्गाने सुलभतेने पोहोचवता येईल. घुसखोरी वा युद्धासारख्या आणीबाणीच्या प्रसंगात अशा रस्तेमार्गांची उपयुक्तता अधिक असते. लडाखजवळील अक्साई चीनला लागून असलेल्या सीमेवर चिनी जवानांनी याआधी अनेकदा घुसखोरी केलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहू गेल्यास धारचूला-लिपुलेख ला हा लिंक रोड तयार झाल्याने आता मात्र भारत लिपुलेख आणि कालापानी या परिसरात सामरिकदृष्ट्या चीनपेक्षा वरचढ ठरू शकतो. दोन वर्षांपूर्वी चिनी लष्कराने पिथौरागढच्या बाराहोतीमध्ये घुसखोरीचा एक प्रयत्न केला होता. परंतु, नव्या लिंक रोडच्या बांधणीनंतर चिनी लष्कर असा प्रकार करणार नाही, असे वाटते. दरम्यान, भारतीय लष्कराला चीनसारख्या कुरापतखोर शेजार्‍यावर नजर ठेवणेही नेहमीच आवश्यक असते. त्यामुळेही कालापानी हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे आहे. १९६२च्या युद्धापासूनच इथे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) गस्त घालत आहे. तसेच चीनने फार पूर्वीच आपल्या सीमेपर्यंत रस्ता बांधून तयार केलेला आहे. हिमालयाला तोडून सीमेपर्यंत मूलभूत सोयी-सुविधा विकसित करण्यावर चीनने सातत्याने पुष्कळ पैसा खर्च केला आहे. दुसरीकडे लिपुलेख ला या ठिकाणाला मानससरोवरला जाणार्‍या मार्गाशी जोडल्याने नेपाळने नाराजी व्यक्त करत लिपुलेखवर पुन्हा एकदा आपला हक्क असल्याचे सांगितले. तथापि, भारताने नेपाळचा दावा फेटाळला असून हा भाग उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्याचा भाग आहे, असे सांगितले. भारताबरोबर मित्रत्वाचे संबंध असूनही गेल्या काही काळापासून नेपाळ आणि चीन दोघेही परस्परांच्या जवळ आल्याचे आपण पाहिले. त्यामुळेच कदाचित नेपाळने लिपुलेखवर आपला हक्क पुन्हा एकदा सांगितला असावा. अशा परिस्थितीत कालापानीवर मजबूत पकड असणे भारतासाठी आवश्यक आहे आणि धारचूला ते लिपुलेख लापर्यंतचा मार्ग ते काम नक्कीच करेल.

 
 
Powered By Sangraha 9.0