‘खो-खो’चा सांख्यिकीकार

10 May 2020 19:39:38


ramesh worlikar_1 &n



‘खो-खो’ खेळासाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ सांख्यिकी (statistics) तज्ज्ञ आणि यशस्वी खो-खो प्रशिक्षक रमेश वरळीकर यांना नुकतीच देवाज्ञा झाली. जाणून घेऊया त्यांच्या खेळाडू ते सांख्यिकीकार प्रवासाबद्दल...



जगामध्ये बहुतांश खेळाचे जय-पराजय हे संख्येवर अवलंबून असतात. यासाठी काम करणे म्हणजे प्रकाशझोतात न येता फक्त त्या खेळासाठी असलेल्या आस्थेपोटी काम करत राहणे. या क्षेत्रात काहीजण हे काम याच आस्थेने करतात. पण या सांख्यिकीमुळेच प्रत्येक खेळ बहरतो. खो-खो हा महाराष्ट्राच्या मातीतला एक पारंपरिक खेळ. शारीरिक तंदुरुस्ती, बुद्धी चातुर्य, चपळता आणि सहनशक्ती या सगळ्यांचा मेळ या खेळामध्ये लागतो. तसेच इतर खेळांप्रमाणे या खेळामध्येही आकडेवारी तेवढीच महत्त्वाची असते. जसे क्रिकेटमध्ये समालोचन करताना खेळाडूंच्या नोंदींचे वर्णन केल्याने अधिक प्रभावी होते. या नोंदी जतन करण्यासाठीही सांख्यिकीचे ज्ञान असणे आवश्यक असते. यामुळे खेळाडूंचे कौशल्य आणखीन फुलून लोकांपर्यंत पोहोचते. पण या कार्याला कधीच प्रकाशझोतात ठेवले जात नाही. त्यामुळे सध्याची तरुण मंडळी या विषयाकडे जास्त आकर्षित होत नाहीत. यासाठी मुळातच खेळासाठी ध्येयवेडी माणसे लागतात. तसेच काही जण असेही असतात जे एका खेळासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘रमेश वरळीकर.’खेळामध्ये सांख्यिकीचे महत्त्व त्यांना चांगलेच कळले होते. एखाद्या खेळाडूचे कौशल्य सांगण्यासाठी सांख्यिकी किती महत्त्वाची असते ही जाणीव त्यांना होती. आज आपण जाणून घेऊया या ध्येयवेड्या सांख्यिकीकाराचा खेळाडू ते सांख्यिकीतज्ज्ञ असा प्रवास...


रमेश वरळीकर यांचे बालपण हे दादरमध्ये गेले. दादरच्या नाबर गुरुजी विद्यालयमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या वरळीकर यांच्या घरी तशी क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांच्यासह त्यांचे मोठे भाऊ प्रभाकर, विजयकुमार आणि नंदकुमार यांचीदेखील खो-खो खेळामध्ये साथ लाभली. १९५० ते १९६० या दशकामध्ये त्यांनी खेळाशी प्रामाणिक राहत अनेक सामने खेळले. पुढे त्यांनी प्रशिक्षक म्हणूनदेखील काम पाहिले. त्यांचे थोरले बंधू प्रभाकर यांच्यासोबत लोकसेना संघाचा दर्जा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली डॉ. हेमा नरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय, दिनेश परब यांसारखे उत्तम खेळाडू त्यांनी घडवले. याव्यतिरिक्त मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी म्हणूनहीदेखील त्यांनी काम पाहिले. त्यानंतर खो-खोचे पंच म्हणूनदेखील त्यांनी काम केले. एकदा क्रिकेट समालोचक विजय मर्चंट यांचे समालोचन आणि माहिती उपलब्ध करुन देणार्‍या आनंदजी डोसा यांच्या पद्धतीमुळे वरळीकर सांख्यिकीकडे आकर्षित झाले होते. दरम्यान, १९६५-१९६६ आणि १९६६-१९६७ या अखिल भारतीय भाई नेरुरकर स्मृती चषकाच्या खो-खो स्पर्धेमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातून पंचगिरी केल्यानंतर राज्य खो-खो संघटनेच्या तत्कालीन ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांना खो-खो पंचगिरीबद्दल स्टेट ऑनर’ देण्याचे ठरवले. परंतु, त्याकरिता वरळीकरांनी राज्यस्तरीय पंचपरीक्षा द्यावी, अशी अट घातली होती. ही अट त्यांनी मान्य न करता ते पंचगिरीतून मुक्त झाले. यातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी ‘सांख्यिकी’ला वाहून घेतले. सांख्यिकीमुळे लोकांसमोर उभे राहणारे खेळाडूंचे कौशल्य पाहता त्यांनी याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.


‘सांख्यिकी’साठी त्यांनी स्वतःच्या खेळाडू ते पंचापर्यंतचा अनुभव एकत्र केला. १९७० पासूनची आकडेवारी त्यांनी गोळा करण्यास सुरुवात केली. प्रत्येक सामन्यात एखादा खेळाडू किती मिनिटे धावला अथवा एखाद्या खेळाडूने किती गडी बाद केले, या सर्व माहितीची ते नोंद करून ठेवायचे. रमेश वरळीकरांमुळेच महाराष्ट्रातील खो-खो मध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू झाला. तसेच भारतभर त्यांच्या या कल्पनेचे स्वागत झाले. सांख्यिकीसंबंधी व्याख्यान देणे, मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रम तयार करून सांख्यिकी परीक्षा घेणे या बाबींबाबत मोठ्या आवडीने आणि क्षमतेने ते काम करू लागले. यामध्ये त्यांना अनेक खो-खो कार्यकर्त्यांची साथ मिळाली. जिल्हा आणि राज्यपातळीवरील स्पर्धांना संघाबरोबर किमान एक सांख्यिकीतज्ज्ञ जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कालांतराने महाराष्ट्र खो-खो संघटनेनेसुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धांना १२ खेळाडू आणि २ सांख्यिकीतज्ज्ञ असा संच पाठवण्यास परवानगी दिली. पुढे त्यांनी खो-खो आणि सांख्यिकीबद्दल लेख आणि पुस्तकांतून माहिती प्रसारित केली. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, खो-खोच्या नोंदणीपासून इतर बाबींशी निगडित त्यांनी १४ पुस्तके लिहिली आहेत. तसेच फक्त खो-खोच नव्हे तर कबड्डीसारख्या खेळालाही सांख्यिकीची जोड देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एवढेच नव्हे तर वृद्धापकाळातही त्यांनी खो-खो पाहणे सोडले नाही. विशेष म्हणजे त्यांच्याकडे खो-खोची मार्च २०१५ पर्यंत माहिती उपलब्ध आहे, जी त्यांनी पद्धतशीर जतन केलेली होती. महाराष्ट्रासह देशामध्ये खो-खोच्या इतिहासात रमेश वरळीकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. त्यांचे एक ब्रीद होते, ‘खो-खो हा फक्त खेळ नाही तर एक कला आहे. त्या कलेशी प्रामाणिक राहून ती कला प्रत्येक खेळाडूने जोपासली पाहिजे.याचप्रमाणे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही कला जोपासली. ८३ वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी ७० वर्षं ही खो-खो या खेळासाठी वाहिली. अशा या खेळप्रेमी एकनिष्ठ खो-खोच्या कार्यकर्त्याला आमच्याकडून आदरांजली...

 
 
Powered By Sangraha 9.0