शिखर नंदा देवी आणि हेरगिरी

01 May 2020 20:11:48


Nanda Devi_1  H



गेल्या आठवड्यातल्या ‘विश्वसंचार’मध्ये एव्हरेस्ट शिखर मोहीम आणि एकंदरीतच गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार याबद्दल माहिती दिली होती. त्यावर अनेक वाचक आणि ट्रेकिंगवाले मित्र यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्ती केली की, नंदा देवी शिखरावरची मोहीम आणि अमेरिकन गुप्तहेर खात्याची खूप काहीतरी भानगड आहे. ते प्रकरण नक्की आहे तरी काय, याबद्दल माहिती द्यावी. म्हणून हा लेखप्रपंच...


आपल्या सह्याद्री पर्वताच्या ज्याप्रमाणे सातमाळा, शंभूमहादेव, सिलीबारी अशा वेगवेगळ्या रांगा आहेत, तशाच हिमालयाच्याही आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर (८,८४८ मीटर्स किंवा २९,०२९ फूट) ज्या रांगेत आहे, तिला म्हणतात महालंगूर रांग. राजकीयदृष्ट्या एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आणि तिबेटमध्ये म्हणजेच आता चीनमध्ये आहे. भारताच्या हद्दीतलं हिमालयाचं सर्वोच्च शिखर म्हणजे नंदा देवी (७८१६ मीटर्स किंवा २५,६४३ फूट). ही स्थिती १९७५ पर्यंत होती. त्या वर्षी म्हणजे १९७५ साली भारताने सिक्कीम हे पर्वतीय राज्य आपल्यात विलीन करून घेतलं. त्यामुळे सिक्कीमच्या भूभागात असलेलं कांचनगंगा (८,५८६ मीटर्स किंवा २८,१६९ फूट) हे शिखर भारताचं झालं. अर्थातच ते भारतातलं सर्वोच्च शिखर ठरलं आणि नंदा देवी दुसर्‍या क्रमांकावर गेली. पण, आता मी तुम्हाला जी हकिकत सांगतोय, ती १९६५ साली घडलेली आहे. त्यावेळी नंदा देवी हेच भारताच्या हद्दीतलं हिमालयाचं सर्वोच्च शिखर होतं.
 
शिखर नंदा देवी हे हिमालयाच्या गढवाल रांगेतलं तत्कालीन उत्तर प्रदेशच्या, आता उत्तराखंड राज्याच्या चामोली जिल्ह्यात येतं. प्रत्यक्षात ती दोन शिखरं आहेत. स्थानिक समजुतीनुसार पूर्वेकडचं शिखर म्हणजे सुनंदा देवी नि पश्चिमेकडचं शिखर म्हणजे नंदा देवी. स्थानिक लोक म्हणतात की, या दोघी बहिणी आपल्या संरक्षक देवता आहेत. कुमाऊँ आणि गढवाली जमातींमध्ये या देवतांची पूजा केली जाते. नंदा देवी शिखराच्या चारही बाजूंनी असंख्य उत्तुंग शिखरांचा जणू वेढाच पडलेला आहे. यातली किमान बारा तरी शिखरं ही ६,४०० मीटर्स म्हणजे २१ हजार फुटांपेक्षाही उंच आहेत आणि त्यामुळे नंदा देवीवर गिर्यारोहण करण्यासाठी त्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं हेच महामुश्किल काम आहे. १९३० साली ‘ह्यू रुटलेज’ या ब्रिटिश गिर्यारोहकाने लागोपाठ तीनवेळा नंदा देवीच्या पायथ्याकडे पोहोचायचे प्रयत्न केले, ते असफल ठरले. रुटलेज लंडनच्या ‘टाईम्स’ला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, “यापेक्षा उत्तर ध्रुवावर पोहोचणं सुद्धा कदाचित सोपं असेल.” नंदा देवी शिखराच्या पूर्वेकडून गोरीगंगा नदी वाहते, तर पश्चिमेकडून ऋषिगंगा नदी वाहते. १९३४ साली ब्रिटिश गिर्यारोहक एरिक शिफ्टन आणि मेजर हेरॉल्ड टिलमन यांनी ऋषिगंगा नदीच्या खोर्‍यातून पुढे जात नंदा देवीचा पायथा गाठला. अखेर १९३६ साली मेजर हेरॉल्ड टिलमन आणि नोएल ओडेल या दोन ब्रिटिश गिर्यारोहकांनी नंदा देवी शिखरावर पाय ठेवला. संपूर्ण मानव जातीच्या आधुनिक इतिहासात २५ हजार फुटांपेक्षाही जास्त उंचीच्या शिखरावर आरोहण करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले. याला अर्थात अपवाद जॉर्ज मेलरी आणि अ‍ॅन्ड्र्यू आयर्विन यांच्या १९२४ सालच्या एव्हरेस्ट मोहिमेचा. त्यांनी बहुधा एव्हरेस्ट पादाक्रांत केलं असावं. पण, ते दोघेही परतीच्या वाटेवर हिमवादळात बेपत्ता झाल्यामुळे अधिकृतपणे काहीच सांगता येत नाही. हा तपशील आपण गेल्या लेखात पाहिलाच आहे. अशा रीतीने इंग्रजी राजवटीच्या त्या कालखंडात हिमालयातील विविध शिखरांवर चढाई करण्यासाठी अनेक ब्रिटिश, अमेरिकन मोहिमा होत होत्या. पुढे एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याची एक स्पर्धाच जगभरच्या गिर्यारोहकांमध्ये लागली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. १९४९ साली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. तिबेट हे भारत आणि चीन दरम्यानचं हिमालयातलं एक स्वायत्त राज्य होतं. एव्हरेस्ट हे शिखर तिबेटच्या प्रदेशात होतं. १९५० मध्ये चीनने एकाएकी तिबेटचं राज्य आपल्यात विलीन करून टाकलं. म्हणजे आता एव्हरेस्ट गिर्यारोहण मोहिमांचं नियंत्रण चीनच्या हातात आलं.
 
१९५३ साली एडमंड हिलरी या न्यूझीलंडनिवासी गिर्यारोहकाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ब्रिटिश पथकाने एव्हरेस्टवर पाय ठेवला. एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट जिंकणारा वीर होता शेर्पा तेनसिंग नोर्गे. हे शेर्पा जमातीचे लोक भारत, नेपाळ आणि तिबेटच्या पर्वतीय प्रदेशात राहतात. परदेशी गिर्यारोहकांसोबत ते हमाल आणि वाटाडे म्हणून जाऊ लागले, आजही जातात. एव्हरेस्ट जिंकणारा एडमंड हिलरी हा न्यूझीलंडर म्हणजे ब्रिटिश नागरिक, तर शेर्पा तेनसिंग हा नेपाळी नागरिक. त्यामुळे भारतीय गिर्यारोहक मंडळींच्या मनामध्ये एक इर्ष्या निर्माण झाली की, आपणही एव्हरेस्ट जिंकायचं. १९५७ साली ‘चो ओयू’ या शिखरावर चढाई करण्यासाठी ‘स्पॉन्सरिंग कमिटी ऑफ द चो ओयू एक्सपिडिशन’ या नावाने एक संस्था स्थापन झाली. तीच पुढे १९६१ साली ‘इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन’ या नावाने महत्पदाला चढली. आज ‘आयएमएम’ ही जगद्विख्यात गिर्यारोहण संस्था आहे. १९६० आणि १९६२ या वर्षी भारतीय भूसेनेने आयोजित केलेल्या एव्हरेस्ट मोहिमा अपयशी ठरल्या. १९६५च्या मे महिन्यात मात्र कॅप्टन मोहनसिंग कोहली यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेला भरभरून यश मिळालं. तब्बल नऊ गिर्यारोहक एव्हरेस्टवर पोहोचले. संपूर्ण देशभर उत्साहाची एक प्रचंड लाट उसळली. हे एव्हरेस्टवीर जेव्हा परत राजधानी दिल्लीत आले, तेव्हा त्यांच्या स्वागताला खुद्द पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जातीने पालम विमानतळावर उपस्थित होते आणि त्यांनी सगळे राजशिष्टाचार वगैरे बाजूला ठेवून या वीरांना तिथल्या तिथे ‘पद्मभूषण’ व ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केले.


पण, त्याच वेळी कॅप्टन कोहलींना भारत सरकारचा आणखी एक फारच बडा अधिकारी भेटला. त्याचं नाव होतं रामेश्वरनाथ काव. ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’ या नावाने चालणार्‍या भारत सरकारच्या गुप्तचर खात्याचा प्रमुख. त्याने कॅप्टन कोहलींना सांगितले, “तुम्हा लोकांना आता नंदा देवी शिखरावर मोहीम करायचीय. ही भारत-अमेरिका संयुक्त मोहीम असेल. तिच्या सरावासाठी तुम्हाला अमेरिकेत अलास्का प्रांतात माऊंट मॅक्किनले परिसरात जायचंय.” घडलं होतं असं की, १९५० साली तिबेट गिळंकृत करून चीन गप्प बसलेला नव्हता. तो अधिकाधिक बलवान होत होता. १९५८ साली त्याने अणुविकास कार्यक्रम सुरू केला. १९६० साली त्याने तिबेटच्या पलिकडे शिजियांग प्रांतात लॉपनूर या ठिकाणी चाचणी अणुस्फोटाची तयारी सुरू केली. १९६२च्या ऑक्टोबर महिन्यात त्याने भारतावर आकस्मिक आक्रमण करून फक्त एका महिन्याच्या अवधीत भारताचा दारुण पराभव केला. या कठीण काळात भारताच्या मदतीला सोव्हिएत रशियापेक्षाही अमेरिकाच धावून आली. गंमत म्हणजे, अगदी याच काळात क्युबा देशात अण्वस्त्र ठेवण्याच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियात युद्ध जुंपणार असं वाटत होतं, पण ते टळलं. पुढे नोव्हेंबर १९६३ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा खून होऊन लिंडन जॉन्सन हे राष्ट्राध्यक्ष झाले, तर चीनने केेलेल्या पराभवाने खचलेले भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे मे १९६४ मध्ये मरण पावून त्यांच्या जागी लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. इकडे चीनचा अणुविकास कार्यक्रम जोरात चालू होताच. ऑक्टोबर १९६४ मध्ये चीनने त्याचा पहिला चाचणी अणुस्फोट यशस्वी केला. आता तो आण्विक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या मागे लागला. या घटनांमुळे अमेरिकेला चिंता वाटू लागली. म्हणजे, अमेरिकेला भारताची चिंता नव्हती, तर चीन अण्वस्त्रसज्ज झाल्यामुळे आशियातला सत्ता समतोल बिघडून, परिणामी आपले व्यापारी हितसंबंध धोक्यात तर येणार नाहीत ना, ही अमेरिकेला काळजी होती. तिकडे पाकिस्तानात वेगळंच नाटक सुरू होतं. चीनने भारताचा दारुण पराभव केल्यामुळे भारतीय सैन्य अगदीच दुर्बल आहे, असा समज आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरला होता. पंडित नेहरूंसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नेता पडद्याआड झाला होता नि त्यांच्या जागी लालबहादूर शास्त्री नावाचा एक अगदीच ‘गायछाप’ भासणारा नेता मंचावर आला होता. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही भारत कमकुवत झालासा वाटत होता आणि त्याच वेळी अमेरिकेने दिलेली भरघोस आर्थिक मदत नि अत्याधुनिक शस्त्रास्त्रं यांनी पाकिस्तानी बेडूक एकदम बैल झाला होता. दुबळ्या भारताला हां-हां म्हणता साफ चीत करून रावळपिंडी ते रामेश्वर असा अखंड पाकिस्तान निर्माण करण्याचं भव्य स्वप्न जनरल अयुबखान आणि झुल्फिकारअली भुत्तो पाहू लागले. जून १९६५मध्ये जेव्हा गुप्तचर अधिकारी रामेश्वरनाथ काव हे कॅप्टन मोहनसिंग कोहलींना भेटले आणि त्यांनी नंदा देवी शिखर मोहिमेचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला, तेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानचं कच्छमधलं ‘ऑपरेशन डेसर्ट हॉक’ पार उधळून लावून फक्त महिनाच उलटला होता. युद्ध जवळ आलं होतं. (क्रमश:)

 
 
Powered By Sangraha 9.0