बर्याचदा म्हटलं जातं, ‘मराठी माणूस कधी बिझनेस करू शकत नाही. तो नोकरीतचं शोभून दिसतो.’ पण हे विधान खोटे ठरवून आज एक ‘उद्योजक’ म्हणून मुकुट परिधान करणारा मराठी माणूस म्हणजे सुधाकर खोत.
आज उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले सुधाकर खोत एक ‘सिव्हील इंजिनिअर’ देखील आहेत. ‘सिव्हील इंजिनिअर’ ते एक ‘नामांकित उद्योजक’ होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवासही तितकाच खडतर आणि रंजक आहे. कोल्हापूरजवळ असलेल्या हणबरवाडी गावात १९७३ साली एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात सुधाकर खोत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृषी क्षेत्रात सरकारी नोकरीत कार्यरत होते, तर आई एक सामान्य गृहिणी होती. सुधाकर यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ. असे एकूण सहा जणांचे त्यांचे गोंडस कुटुंब. वडील सरकारी नोकरीत रुजू असले तरी शेतीच्या कामाचेही त्यांना अफाट वेड होते.
इंजिनिअर असलेल्या व्यक्तींचा एक वेगळाच रुबाब असतो. त्यांना समाजात एक विशिष्ट स्थान असते. त्यामुळे आपल्या मुलांनी अभियंताची पदवी प्राप्त करावी, असा त्यांच्या वडिलांचा आग्रह. त्यानंतर सुधाकर यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यातील कारवे या गावात झाले. पुढील शिक्षणासाठी ते गारगोटी या गावी आले. तेथे त्यांनी ‘सिव्हील इंजिनिअरिंग’ डिप्लोमाचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मिळालेल्या उन्हाळी सुट्टीमध्ये सुधाकर आपल्या एका मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आपल्या बहिणीकडे कांजूरमार्ग येथे आले. एकेदिवशी असेच मित्रासोबत फिरत असताना त्यांना डिप्लोमाला त्यांच्या सोबत शिकलेला आणखी एक मित्र भेटला. त्याने विरल बिल्डर्स कंपनीत दोन जागा शिल्लक असल्याचे सुधाकर यांना सांगितले.
मुलाखत कशी द्यायची, याचा अनुभव घेण्यासाठी गेलेल्या सुधाकर यांना मिळालेली त्यांच्या आयुष्यातील पहिली नोकरी ठरली. घरात काहीही न सांगता ते त्यादिवशी घराबाहेर पडले. नोकरीसाठीची मुलाखत देऊन त्याच दिवशी ते तेथे रुजू झाले. घाटकोपरमधील ‘विरल बिल्डर्स’कडे त्यांनी अडीच वर्षे ‘साईट इंजिनिअर’ म्हणून काम केले. लहानपणापासूनच कोणतेही काम मेहनत आणि जिद्दीने करण्याची त्यांची सवयच त्यांची एक ओळख बनली होती. परंतु, ही नोकरी करतानाच त्यांना मनोमन वाटू लागले की आपण स्वतःचे काहीतरी निर्माण करावे. यासाठी त्यांनी १९९६ ला किरण शहा या आर्किटेक्टच्या हाताखाली नोकरी मिळवली. तेथे त्यांनी पाच वर्षे ती नोकरी केली. तेथील नवीन कामं त्यांनी हिरीरीनं शिकून घेतलं. १९९७ साली अनुराधा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अनुराधासारखी पेशाने शिक्षिका असलेली सहचारिणी त्यांना लाभली. ते करत असलेल्या कार्यामध्ये अनुराधा यांनी देखील सुधाकर यांना प्रत्येक वेळी साथ दिली.
नोकरीद्वारे त्यावेळी केवळ २५०० रुपये पगारच त्यांना मिळत असे. लग्नानंतर जबाबदार्या वाढल्याने आता नोकरी करत बसण्यात अर्थ नाही, हे सुधाकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे नोकरी करतानाच इतर अर्धवेळची कामं ते बाहेरून मिळवू लागले. म्हाडासारख्या प्रसिद्ध संस्थेच्या प्रकल्पांची कामे त्यांना मिळू लागली. मग तेथे वॉटर प्रूफिंग, लिकेज, प्लास्टर यांसारखी कामे करण्यात ते तरबेज झाले. त्यामुळे मुंबईतील हाजी अली येथे असलेल्या हिरापन्ना शॉपिंग सेंटरचे वॉटर प्रूफिंगचे काम त्यांना मिळाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. कारण, कोणालाही न जमलेले तेथील वॉटर प्रूफिंगचे काम सुधाकर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे त्या दुकानाच्या मालकाने सुधाकर यांच्या कामावर खुश होऊन त्यांना १९९९ साली एक मोबाईल फोन भेट म्हणून दिला.
त्याकाळी मोबाईल फोन केवळ उच्च वर्गातील लोकांकडेच दिसून येई. त्यानंतर सुधाकर यांच्या कामाची किर्ती सर्वदूर पसरली. सुधाकर खोत यांना नेहमी वाटायचे की, आपल्या कामात वेगळेपणा हवाय. जी कामे करण्यासाठी जोखीम जास्त व स्पर्धा कमी असेल, तर अशावेळी आपल्याला आपल्या कामाची योग्य किंमत मिळेल. वॉटर प्रूफिंगचे काम करण्यात तरबेज झाल्यामुळे त्यांची कल्पना सत्यात उतरली. त्यामुळे अशाच छोट्या-मोठ्या व्यवसायांच्या कामातून २००२ साली सुधाकर यांनी अंधेरी येथे स्वतःचे घर विकत घेतले. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय विकास यांसारखे कोर्सेस पूर्ण करून केले. २००९ साली ‘ब्रेनस्ट्रॉर्म शेअर सक्सीड’ अर्थात ‘बीएसएस फाऊंडेशन’ या नामांकित उद्योजकांच्या संस्थेचे ते एक अविभाज्य घटक झाले.
केवळ एक हजार रुपये पगारावर काम करणारे सुधाकर खोत आज सहा कोटी रुपये उलाढाल असणार्या कंपनीचे मालक आहेत. ते केवळ त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच. ‘सिव्हील इंजिनिअर’ आणि उद्योजकाखेरीज सुधाकर एक उत्कृष्ट चित्रकार देखील आहेत. इयत्ता दहावीमध्ये असताना एका स्पर्धेसाठी त्यांनी काढलेल्या एका चित्राची निवड होऊन ते जपानला पाठविण्यात आले होते. त्याबद्दल जपानमधील संस्थेने त्यांचा गौरव करुन पारितोषिक देखील दिले होते. तसेच कॉलेजमध्ये असताना देखील गणेशोत्सवानिमित्त सजावटीसाठी चित्रे काढणे, दुकानांच्या नावाच्या पाट्या बनविणे, गाड्यांच्या क्रमांकाच्या पाट्या बनविणे अशी कामे ते करत. त्यातून मिळणारे पैसे ते आपल्या शिक्षणासाठी वापरत. आजही फावल्या वेळात ते चित्र काढत असतात. त्यांना शाळेमध्ये शिकविण्यासाठी असलेले बोकडे गुरुजी आणि दुसरी नोकरी करीत असताना भेटलेले अनिल गोवर्धन यांना ते आपले आदर्श मानतात.
२०१२ साली सुधाकर यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, वडिलांनी जपलेला शेतीचा वारसा आपणही जपावा आणि त्याचा उद्योग म्हणून वापर करावा, यासाठी त्यांनी ‘पंचगव्य’ नावाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. ज्याद्वारे देशी गायींशी सबंधित संपूर्ण अभ्यास करून शेण, तूप, दूध इ. गोष्टींद्वारे औषधे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. याकरिता कोल्हापूरमध्ये बाळीक्रे येथे ३४ एकर जागा त्यांनी विकत घेतली आहे. तेथे कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती आणि गोशाळा उभारण्याचे त्यांचे स्वप्न असून आपल्या कुटुंबाच्या सोबतीने त्यांचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. उद्योगजगतात आपला दरारा निर्माण करणारे असे हे सुधाकर खोत. माणसाने आपल्या प्रत्येक कामात मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणा जपला तर यश फार दूर नाही, हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र! सुधाकर यांनी ‘इंजिनिअरिंग’ विषयात पदवी देखील मिळवावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण, सुधाकर यांनी त्याहून पुढील पातळी गाठत एक उद्योजक बनून जो मानाचा तुरा रोवला, तो त्यांच्या आईवडील आणि संपूर्ण खोत परिवारासाठी डोळ्यांचे पारणे फेडणाराच ठरला.
सुधाकर खोत यांना दोन मुलं आहेत, तर त्यांची पत्नी जोगेश्वरीतील एका नामांकित शाळेत मराठी विषयाची शिक्षिका आहे. उद्योजकांच्या पंगतीत आज मानाचे स्थान पटकाविणारा हा अवलिया यापुढील यशाची शिखरेही अशीच गाठत जाईल अशी आशा.