इस्रायलच्या टेक्नियनयुनिव्हर्सिटी आणि रॅम्बम हेल्थ केअर कॅम्पसमधील इस्रायली संशोधकांनी कोरोनाव्हायरसचे निदान करण्यासाठी नवीन आणि अधिक कार्यक्षम पद्धतीची यशस्वी चाचणी केली.
सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देश चिंताग्रस्त आहे. कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे हा एकमेव पर्याय जगातील आरोग्य यंत्रणेकडे आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि चाचण्या करण्यासाठी लागणारा वेळ व चाचण्यासाठी लागणारे संसाधनांची कमतरता लक्षात घेता इस्रायलने कोरोनाच्या चाचण्या अधिक वेगाने करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण संशोधन केले आहे. इस्रायलच्या टेक्नियन युनिव्हर्सिटी आणि रॅम्बम हेल्थ केअर कॅम्पसमधील इस्रायली संशोधकांनी कोरोनाव्हायरसचे निदान करण्यासाठी नवीन आणि अधिक कार्यक्षम पद्धतीची यशस्वी चाचणी केली.
आतापर्यंत जगभरातील अनेक देशांत कोरोनाची लक्षणे दिसत असलेले आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीच कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र दरम्यानच्या काळात काही 'फॉल्स निगेटिव्ह' कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 'फॉल्स निगेटिव्ह' रुग्ण म्हणजे ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढू नये आणि अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी व्हावी, म्हणून इस्रायलने चाचणीची नवी पद्धत विकसित केली. यामध्ये एकाचवेळी अनेक लोकांच्या चाचण्या घेणे शक्य झाले आहे.
काय आहे चाचणी पद्धत ?
इस्रायलमध्ये सध्या सामान्यपणे म्हणजे सामान्य पीसीआर पद्धतीने (पॉलिमरेजचेन रिअॅक्शन) केल्या जाणाऱ्या चाचणीचा दर प्रतिदिन केवळ १,२०० आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्रपणे तपासणी करायची झाल्यास त्याला कित्येक तास लागतात. इस्रायलमध्ये असलेल्या प्रयोगशाळांपैकी रॅम्बम क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत दिवसाला फक्त २०० नमुने तपासले जातात. चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी इस्रायलच्या टेक्नियन विद्यापीठ आणि रॅम्बम हेल्थ केअर कॅम्पसने नवी पूलिंग पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीनुसार एकावेळी एका गटातील किंवा एका परिसरातील ३२ किंवा ६४ जणांचे नमुने एकत्रित करून त्यांची चाचणी केली जाईल. त्या ३२ किंवा ६४ जणांचा एकत्रित चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला तरच प्रत्येकाची स्वतंत्रपणे पुन्हा चाचणी केली जाईल. त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यास सर्वांचाच अहवाल निगेटीव्ह समजला जाईल. यापद्धतीचा फायदा हाच की प्रत्येक व्यक्तीच्या नमुन्यांची चाचणी करण्यापेक्षा ३२ किंवा ६४ जणांचे नमु्ने एकत्र करून त्यांचा चाचणी घेतल्यास प्रयोगशाळेचा तेवढा वेळ वाचेल आणि अधिकाधिक लोकांची चाचणी करणे शक्य होईल.
अमेरिकेने केला हा दावा
इस्रायलच्या टेक्नियन विद्यापीठ आणि रॅम्बम हेल्थ केअर कॅम्पसप्रमाणे जर्मनी, अमेरिका आणि नेब्रास्का आदी देशांनीही या प्रकारच्या पूलींग चाचणीचा वापर केला आहे. मात्र, ही पद्धत नवी नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकी जवानांमध्ये पसरलेल्या सायफिलीस आजाराच्या चाचणीसाठी याप्रकारच्या पद्धतीचा वापर झाला होता. हार्वर्ड विद्यापीठातील प्रा. रॉबर्ट डॉर्फमन यांनी त्यावेळी ही पद्धत विकसित केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताला कशी होणार मदत
भारतासारख्या अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांसाठी ही चाचणी पद्धती नवीन पर्वणीच ठरू शकते. भारतातील आरोग्यसेवा, प्रयोगशाळांची संख्या व त्यावर येणारा ताण लक्षात घेता. चाचणीची ही पद्धती अधिक फायदेशीर ठरू शकते. यातून लवकरात लवकर कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांना अलगीकरण करण्यात मोठे यश मिळू शकते.