डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत 'नरेंद्र मोदी ग्रेट!'

08 Apr 2020 14:05:59
trump modi_1  H

भारताने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ निर्यातबंदी उठवताच डोनाल्ड ट्रम्पकडून मोदींचे कौतुक


वॉशिंग्टन : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ औषधाच्या पुरवठ्यावरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अवघ्या २४ तासात बदलली. मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत ‘नरेंद्र मोदी ग्रेट’ असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे.


‘मी लाखो डोस विकत घेतले. जवळपास तीन कोटी. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो, बर्‍याच गोष्टी भारतातूनच येतात. मी त्यांना विचारले की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवाल का? ते महान आहेत. खरोखर चांगले आहेत. तुम्हाला माहित असेल, भारताला आवश्यकता असल्यामुळे त्यांनी निर्यंत थांबवली होती. पण त्यातून बर्‍याच चांगल्या गोष्टी घडत आहेत. आम्ही लस तयार करत आहोत. ‘जॉन्सन एंड जॉन्सन’ला याची चाचणी घेण्याची गरज आहे. असं वाटतं, मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांना कमी फटका बसला आहे’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.


‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही, तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिला होता. गेल्याच महिन्यात भारत भेटीवर आलेली ट्रम्प यांनी सूडाची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.


‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर तुम्ही म्हणताय तसे प्रत्युत्तर द्यावे लागेल. आणि प्रत्युत्तर तरी का देऊ नये?’ असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचे भारताने मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले.
Powered By Sangraha 9.0