लढा आत्मसंयमाचा!

06 Apr 2020 21:05:36
PM Modi _1  H x





अशी लढाई यापूर्वी या देशात कधी लढली गेलेली नाही. या लढाईत शस्त्रे काही कामाची नाहीत. शस्त्रे याचा अर्थ बंदुका, तोफा आणि बॉम्ब आहे, पण दुसर्‍या प्रकारची शस्त्रे मात्र वापरावी लागतील. ही शस्त्रे आहेत आत्मसंयमाची.



देश कोरोना व्हायरसच्या संकटातून जात आहे
. याबाबतीत वाचकांच्या माहितीत नवीन भर घालावी, असे माझ्याजवळ काही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १५ दिवसांत देशवासीयांशी वेळोवेळी संवाद साधून या संकटावर विजय मिळविण्यासाठी आपण सर्वांनी काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेदेखील कोरोना संकटाशी झुंजण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कडकपणे चालू आहे.


हे जैविक युद्ध आहे का, असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला आहे. विविध वाहिन्यांवरही त्याची चर्चा चालू असते. चीन आणि अमेरिका यांच्यात जागतिक प्रभुत्व मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी अशा प्रकारचा विषाणू चीनने प्रयोगशाळेत निर्माण केला, असेही बोलले जाते. काही जण हाच आरोप अमेरिकेवर करतात. जैविक युद्ध अमेरिकेला नवीन नाही. १६, १७ आणि १८व्या शतकात युरोपातील लोक अमेरिकेत गेले. अमेरिकेतील मूलनिवासींच्या त्यांनी कत्तली केल्या. देवीच्या रोगाचे जंतू, टायफॉईडच्या रोगांचे जंतू असलेली ब्लँकेट्स मूलनिवासींना देऊन या रोगराईत त्यांना ठार केले. संपूर्ण अमेरिका खंडात या काळात किमान दोन कोटी मूलनिवासी ठार मारले गेले असावेत. त्यावेळी आजच्यासारखे जग एक मोठे खेडे झालेले नव्हते, यामुळे त्यांच्याविरुद्ध फारसा जागतिक आवाज उठविला गेला नाही. 'मनुष्य जीवनाविषयी शून्य आस्था' हे चिनी संस्कृतीचे स्वरूप आहे. माओने किती लाख माणसे मारली असतील, याचा नेम नाही. कोरियन युद्धात चीनने मुंग्यांसारखे सैन्य घातले, मरणार्‍यांविषयी काही चिंता केली नाही.

 

असे असले तरी हे जैविक युद्ध आहे, याबद्दल ठामपणे विधान करणे अत्यंत धाडसाचे आहे. यथावकाश सत्य आपल्याला समजेल. बातम्या देणार्‍या वाहिन्यांना सणसणीत आणि चटपटीत विषय सातत्याने लागतात आणि अशा विषयावर बोलण्यासाठी उदंड (तज्ज्ञ ?) देखील सापडतात. आपण ते ऐकावे आणि शक्यतो विसरून जावे, हेच चांगले. कोरोनाचे संकट अत्यंत काळजी करण्याचे आहे की भीती करण्याचे आहे, या प्रश्नाचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे. बातम्या देणार्‍या वाहिन्यांवरील अँकर अत्यंत चढ्या आवाजात सांगतो, रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला, उस्मानाबादमध्ये २ रुग्ण सापडले. अनेक जिल्ह्यांची नावे घेऊन बातमी संपते. हीच बातमी मधुर आवाजात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, अशीही देता येऊ शकते. पण, त्याने सनसनाटी निर्माण होत नाही आणि भयाचे वातावरण निर्माण होत नाही, ते झाले नाही तर ती बातमी कसली? अशी कोरोना बातम्यांची चढाओढ सध्या चालू आहे. या आजारामुळे भारतात काही लोकांचा मृत्यू झाला आहे, या मृत्यूच्या बातम्यादेखील सनसनाटी असतात. भारतात दरहजारी सामान्य स्थितीतील मृत्यूचे प्रमाण ७.२५ टक्के आहे.

 

म्हणजे साधारणतः दर हजारी ७० लोक दरवर्षी मृत्यू पावतात. दरमहा देशभरात ४० लाख लोक मृत्यू पावतात. इतकी वर्षे आपण दूरदर्शन पाहत असतो, तेव्हा यावर्षी इतके लाख लोक मेले, अशी सनसनाटी बातमी कोणी दिली नाही. या मृत्यूची वेगवेगळी कारणे असतात. अपघाती कारणे, साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती, अपराध आणि नैसर्गिक मृत्यू. अशी विविध कारणे असतात. साथीच्या रोगाने मरणार्‍यांची संख्यादेखील मोठी असते, जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ असतो, हे सत्य सर्व लोक जाणतात. त्यामुळे मृत्यूचा विचार न करता माणसं जीवन जगत राहतात. जेव्हा मरण यायचं, तेव्हा येईल त्याची चिंता आता कशाला करा, असा विचार माणूस करत राहतो. कोरोनाचे संकट नवीन आहे, त्यावर लस निघालेली नाही, तत्काळ परिणाम होईल, अशी औषधं नाहीत, उद्या यातील काहीच होणार नाही, असे नाही. मानवजातीचा इतिहास असा आहे की, जे रोग असाध्य होते, त्यावरदेखील माणसाने औषधे शोधून काढली आहेत, १९व्या शातकाच्या अखेरपर्यंत 'प्लेग' नावाच्या रोगाने जगात धुमाकूळ घातलेला होता. या रोगाने एकेका शहरातील अर्धी लोकसंख्या मरत असे. हा युरोपातील देशांचा इतिहास आहे, भारतातही प्लेग येत असे, त्यात लोक मरत. १८९६ साली पुण्यात प्लेग आला, या प्लेगमुळे पुण्यातील शेकडो लोक मेले, पण युरोपातील देशांप्रमाणे अर्धे पुणे काही गारद झाले नाही, ही आपली प्रतिकारशक्ती आहे.

 
 

कवी इकबाल सांगून गेले की, 'कुछ बात ऐसी है की हस्ती मिटती नही हमारी.' कवी इकबालचे संदर्भ आहेत विदेशी आक्रमणांचे. आठव्या शतकापासून भारतात मुस्लीम आक्रमणाच्या लाटामागून लाटा आल्या. त्यांनी अफाट कत्तली केल्या. त्यानंतर इंग्रज आले, त्यांनीदेखील वेगवेगळ्या मार्गांनी हिंदुस्थानातील माणसे मारली. बंगालच्या दुष्काळात ४० लाखांहून अधिक लोकांना अन्नावाचून मारले, पण हिंदुस्थान संपला नाही. आपण आपल्या संस्कृतीला घेऊन आजही अभिमानाने जगत आहोत. आक्रमणाशी लढा शस्त्राने द्यावा लागतो, कोरोनाशी लढा आत्मबलाने द्यायचा आहे. तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आणि केंद्र व महाराष्ट्र शासन ज्या सूचना देत आहेत, त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. यावेळी अनेकांच्या प्रतिभांना नवनवीन पंख फुटत असतात, सोशल मीडियावर कोरोनापासून बचाव करणारे हे करा, ते करा असे सांगणारे संदेश, व्हिडिओ फिरत असतात. एकतर असे संदेश वाचू नयेत, व्हिडिओ पाहू नयेत आणि पाहिले तर ते फॉरवर्ड करू नयेत. कोरोना व्हायरस हा तज्ज्ञ लोकांचा विषय आहे, त्यांचेच म्हणणे आपण ऐकले पाहिजे. ज्याप्रमाणे अवकाशात 'चांद्रयान' सोडायचे असेल तर ते कसे सोडले पाहिले, हे नेटकर्‍यांनी सांगण्याचा विषय नाही, हा तज्ज्ञ लोकांचा विषय आहे.

 

एका अर्धाने आज सर्व भारताचे कोरोनाविरुद्ध युद्ध चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचे तर १३० कोटी भारतीय विरुद्ध कोरोनाचे व्हायरस हे या युद्धाचे स्वरूप आहे, हे युद्धच आपल्याला जिंकायचे आहे, युद्ध जिंकायचे म्हणजे कोरोनावर मात करायची आहे. कोरोनाला रोखायचे आहे, त्याचा फैलाव होऊ द्यायचा नाही. या लढाईत प्रत्येक भारतीय हाच सैनिक आहे, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना लढायचे आहे, अशी ही सर्वंकष लढाई आहे.

 

अशी लढाई यापूर्वी या देशात कधी लढली गेलेली नाही. या लढाईत शस्त्रे काही कामाची नाहीत. शस्त्रे याचा अर्थ बंदुका, तोफा आणि बॉम्ब आहे, पण दुसर्‍या प्रकारची शस्त्रे मात्र वापरावी लागतील. ही शस्त्रे आहेत आत्मसंयमाची. या शस्त्रात संयमाबरोबर आत्मनिग्रह, धैर्य, चिकाटी, सहृदयता, बंधुभावना असे सर्व मनोभाव लागणार आहेत आणि या बाबतीत आपली बरोबरी करू शकेल, असा मानवसमूह जगात नाही. आपल्या सर्व धार्मिक संस्कारांतून या गुणांची शिकवणूक आपल्या सर्वांना दिली जाते. संयम हा आपल्या संस्कृतीचा पाया असेल, तर त्यागमय भोग हा तिचा कळस आहे, या सर्वांच्या कसोटीचा हा कालखंड आहे. दूरदर्शनवर सध्या रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुनःप्रसारित केली जात आहे. ही कथा राजा दशरथ, त्याच्या तीन राण्या, चार मुले यांच्याभोवती गुंफलेली आहे. पण, ती जर तेवढीच असती तर काळाच्या ओघात लुप्त झाली असती. रामायणातील प्रत्येक पात्र मूल्य जगणारे आहे. हे मूल्य आत्मसंयमाचे आहे, कर्तव्यकठोरतेचे आहे, परस्पर स्नेहाचे आहे आणि परस्पर बांधिलकीचे आहे. रामयणाचीच उपमा पुढे चालवायची तर असे म्हणावे लागेल की, रावणरूपातील कोरोना व्हायरस हा आजचा खलनायक आहे, रामाला आपल्या आत्मबलावर त्याच्याशी लढायचे आहे, ही लढण्याची जिद्द घेऊनच आपण लढले पाहिजे.




Powered By Sangraha 9.0