‘लढवय्या’ ऋषी कपूर

30 Apr 2020 21:49:20
rishi-kapoor_1  





हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत अभिनेते ऋषी कपूर यांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ५० वर्षं गाजवली. कपूर घराण्याचा वारसा जपतानाच त्यांनी आपली स्वत:ची ओळखही निर्माण केली. त्यांच्या प्रवासाचा हा मागोवा...


कसदार अभिनयाचा वारसा लाभलेलं भारतीय सिनेसृष्टीतलं कपूर कुटुंबीय. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरु झालेला हा वारसा राज कपूर यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. पण, एक काळ असाही होता की, राज कपूर यांचे चित्रपट पडू लागले. त्यामधून बाहेर कसे पडणार, हा प्रश्न पुढे उभा असताना एक चेहरा समोर आला तो म्हणजे कपूर परिवारातला ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर.


१९७० मध्ये ‘मेरा नाम जोकर’ या राज कपूर यांच्या चित्रपटापासून ऋषी कपूर यांचा खरा प्रवास सुरु झाला. त्यानंतर १९७३ मध्ये पहिल्यांदा एक ‘चॉकलेट हिरो’ म्हणून राज कपूर यांच्याच ‘बॉबी’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. पुढे कपूर परिवाराचा हा वारसा अत्यंत हुशारीने आणि संयमाने पुढे चालवला. हा वारसा सांभाळताना त्यांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला. पण, त्यांनी चित्रपट आणि अभिनय क्षेत्रापासून कधीही फारकत घेतली नाही. त्यांचा हा हट्टी स्वभाव त्यांना अभिनय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. तेव्हा,जाणून घेऊया ऋषी कपूर यांच्या या प्रवासाबद्दल...


दि. ४ सप्टेंबर १९५२ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘दी कपूर’ परिवारात ऋषी कपूर यांचा जन्म झाला. वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्याप्रमाणेच ऋषी कपूर यांनादेखील अभिनयाची आवड होती. त्यांचे वडील अभिनेते-दिग्दर्शक, त्यांचे काका शम्मी आणि शशी कपूर हेही उत्तम अभिनेते, मामा प्रेम नाथ, राजेंद्र नाथ हेदेखील हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेले कलाकार. यामुळे कपूर घराणे म्हणजे अभिनयाचे जीवंत विद्यापीठच जणू! या सर्वांना बघून चिंटू कपूर यांनादेखील अभिनयाची गोडी निर्माण झाली. लहानपणी आरशामध्ये बघून ते कधी हसायचे तर कधी रडायचे, तेव्हापासूनच त्यांनी अभिनयाचा अभ्यास सुरू केला होता.


ही गोष्ट त्यांचे काका शशी कपूर यांनी अचूक हेरली. पुढे वडील राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’मधील एका गाण्यात ऋषी कपूर आणि त्यांच्या भावंडांची एक छोटीशी झलकही दिसली होती. पुढे राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’साठी ऋषी कपूर यांनी लहान जोकरची भूमिका निभावली होती. हा चित्रपट तसा बॉक्सऑफिसवर खास कमाल करू शकला नाही, पण चिंटू कपूर यांच्या अभिनयाची सर्वांकडून प्रशंसा झाली. पुढे ‘बॉबी’ या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधून ऋषी कपूर यांनी एक ‘चॉकलेट हिरो’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळेस त्यांच्या पिढीचे काही अभिनेते तलवारी, बंदुका घेऊन मुख्य पात्र साकारायचे. कारण, त्यावेळेस प्रेम कहाण्यांवर आधारित चित्रपट फारसे चालत नव्हते.


मात्र, ऋषी कपूर यांच्या येण्याने बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा प्रेम कहाण्यांवर आधरित चित्रपट सुरु झाले. १९७४ पासून १९९७ पर्यंत त्यांनी ‘सोलो लीड’वाले अनेक चित्रपट केले. त्यामध्ये ४० चित्रपट अपयशी ठरले, तर ११ चित्रपट ‘हिट’ ठरले. याच दरम्यान त्यांनी काही ‘मल्टी स्टार’ चित्रपट केले. यामध्ये अमिताभ बच्चन, श्रीदेवी, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘रोमॅण्टिक हिरो’ साकारताना त्यांना बरेचदा अपयशाचाही सामना करावा लागला. उत्तम अभिनयानंतरही बॉक्स ऑफिसवर त्यांचे बरेच चित्रपट आपटू लागले. अशामध्ये त्यांना पुन्हा आधार मिळाला तो नव्या पिढीचा. नव्या पिढीमध्ये नवे चेहरे असतानादेखील ऋषी कपूर यांनी त्यांना मात देत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘दामिनी’, ‘चांदणी’, ‘दिवाना’सारख्या चित्रपटांमुळे त्यांना पुन्हा एकदा स्वतःच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला.


ऋषी कपूर यांनी अनेक वर्ष एक ‘रोमॅण्टिक हिरो’ म्हणून काम केले. मात्र, वयोमानानुसार त्यांनी अभिनयाची वाट बदलली. २००० नंतर त्यांनी साहाय्यक अभिनेता म्हणूनदेखील काम केले. कधी हिरोचा बाप, कधी हिरोईनचा बाप, कधी विनोदी शेजारी, कधी एक तडफदार पोलीस अधिकारी एवढेच नव्हे, तर एखादा डॉन किंवा एक गुंड तेवढ्याच प्रभावीपणे निभावला. यादरम्यान त्यांनी अनेक अभिनयाच्या छटा प्रेक्षकांसमोर आणल्या. यामुळे नव्या पिढीमध्ये ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आदर्श आजही डोळ्यासमोर ठेवला जातो.



विशेष म्हणजे वडील राज कपूर यांनी उभे केलेले भलेमोठे ‘कपूर साम्राज्य’, भाऊ रणधीर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मोठ्या शिताफीने सांभाळले. सोबतच त्यांनी काही इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले. ऋषी कपूर एक अशा अभिनेत्यांच्या फळीमध्ये येतात, ज्यांनी भारतीय चित्रपट बदलताना, घडताना पाहिला. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये त्यांना अस्थिमज्जाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले आणि २०१९ मध्ये वर्षभरानंतर परतले. काल हा कपूर घराण्याचा राजकुमार अखेर जग सोडून निघून गेला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळला. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात ऋषी कपूर यांचे नाव नेहमीच एक बेधडक व्यक्तिमत्त्व, सदैव समाजकार्यासाठी तत्पर आणि एक लढवय्या अभिनेता म्हणून स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच इच्छा...




Powered By Sangraha 9.0