गोष्ट एका मराठमोळ्या विमानमालकाची...

30 Apr 2020 21:38:59
Mandar Bharade, Mab Aviat


‘राईट ब्रदर्स’च्या आठ वर्षे अगोदर म्हणजे १८९५ मध्ये शिवकर बापूजी तळपदे या मराठमोळ्या तरुणाने विमानाचा शोध लावला होता. त्यांचीच परंपरा मंदार भारदे आज हवाई सेवेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. महाराष्ट्र आज ६० वर्षांचा तरुण झाला. मंदार भारदेंसारखे मराठमोळे तरुण या महाराष्ट्राचं नाव अटकेपार नेत आहेत.
 
 
 
“किधर जाना है...? किससे मिलना है...?” जुहू विमानतळावरचा सुरक्षारक्षक त्या तरुणाला विचारत होता. त्या तरुणाकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्याला एकच माहीत होते की, आत जायचंय. एक-दोनदा नव्हे, तर तब्बल आठवेळा त्याला आत जाण्यास नकार मिळाला. मग हाच नकार त्याची इच्छाशक्ती प्रबळ करत गेला. त्या बिचार्‍या सुरक्षारक्षकांना हे ठाऊक नव्हतं की, ज्याला आपण अडवतोय तो एक दिवस येथे फिरणार्‍या विमानांचा मालक असेल म्हणून. विमानकंपनीचा मालक होईन ही धग उरात घेऊन स्वप्न सत्यात उतरविणारा हा तरुण म्हणजे ‘मॅब एव्हिएशन’चे संचालक मंदार अनंत भारदे.
 
 
 
मंदारचे आजोबा बाळासाहेब भारदे हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते. गांधीवादी विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते. असं म्हणतात की, हा माणूस एवढा साधा होता की, सहकारमंत्री झाल्याची बातमी रेडिओवर ऐकल्यानंतर ते एसटीने मुंबईला आले होते, सहकारमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष ते होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जात. एवढं असूनही आपल्या पदाचा लाभ त्यांनी आपल्या कुटुंबासाठी दुरान्वयानेसुद्धा घेतला नाही. त्यांचा पुतण्या अनंत भारदे हे महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात कार्यरत राहिले. पुतण्याला राजकारणात आणून त्यांचे भाग्य उजळविणार्‍या काकांची एक समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आपल्या पुतण्यालाही राजकारणात आणून आमदार म्हणून निवडून आणणं सहज शक्य असतानासुद्धा त्यांच्या मनाला हा विचार कधी शिवला नाही. अनंत भारदेंची पत्नी मुक्ता या नाशिकच्या शाळेत अकाऊंटन्ट म्हणूनच कार्यरत होत्या. अनंत आणि मुक्ता या दाम्पत्याचा मंदार मुलगा. अनंतरावांची सरकारी नोकरी. त्यामुळे विंचवाच्या बिर्‍हाडासारखं प्रपंच घेऊन बदलीच्या ठिकाणी जावं लागत असे. त्यामुळे मंदारचं शालेय शिक्षण पाच वेगवेगळ्या शाळांमध्ये झालं. पुढे त्याने नाशिकच्या महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आणि राज्यशास्त्र विषयातून एम.ए केलं.
 
 
 
 
तसा मंदार सर्जनशील. याच स्वभावामुळे जाहिरात तयार करण्याची एजन्सीच त्याने सुरु केली होती. नाशिकच्या वृत्तवाहिन्यांसाठी त्याने अ‍ॅकरिंग केलं. वेगवेगळ्या टीव्ही जाहिराती केल्या. रेडिओसाठी जिंगल्स बनवले. दूरदर्शनसाठी मालिकासुद्धा तयार केल्या. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यांसाठी, वेगवेगळ्या भाषेतील लघुपटसुद्धा मंदारच्या ‘मॅब एंटरटेन्मेंट’ने तयार केले होते. अशाच एका लघुपटासाठी हेलिकॉप्टर शॉट घ्यायचा होता. हेलिकॉप्टरसुद्धा मिळालं. पण, चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली नाही. ते ‘शूट’ घेताच आलं नाही. पण, हेच न झालेलं ‘शूट’ मंदारच्या करिअरचं ‘रुट’ मात्र बदलवून गेलं.
 
 

Mandar Bharade, Mab Aviat 
 
 
आपण थेट विमानच घ्यायचं, हे त्यानं मनाशी पक्कं केलं. मग विमान कुठे मिळणार याची माहिती विमानतळावरच मिळणार म्हणून मंदार थेट जुहूच्या विमानतळावर थेट नाशिकवरुन गेला. तिथल्या सुरक्षारक्षकांनी कुणाला भेटायचं, काय काम आहे असे प्रश्न विचारले. यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. तब्बल आठ वेळा त्याला प्रवेश नाकारला गेला. मात्र, इंग्रजांना पळवून लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकाचं अंगातलं रक्त सहज हार कसं मानेल म्हणा! मंदारने एक निरीक्षण केलं की, मंत्र्याच्या ताफ्याला आत प्रवेश सहज मिळतो. अशाच एका ताफ्यावर लक्ष ठेवून त्याने आपली कार ताफ्यात घुसवली आणि तो जुहू विमानतळावर पोहोचला. समोर विस्तीर्ण अशी कर्मभूमी दोन्ही हातांनी त्याचं स्वागतंच करायला जणू उभी होती. तिथे गेल्यावर त्याला उमजलं की, इथे फक्त उड्डाणाचीच कामे चालतात. मार्केटिंग वगैरे येथे होत. दरम्यान, मंदारला एकाने कॅप्टनला भेटायला सांगितले जे उड्डाणाकरिता गेले होते. सुमारे तासभर वाट पाहिल्यानंतर ते मंदारला भेटले. मंदारने त्यांना थेट न डगमगता विमानसेवा कंपनी सुरू करायची आहे, असे सांगितले. मंदारच्या डोळ्यातली आत्मविश्वासाची चमक पाहून कॅप्टनने सहकार्य करण्याचे निश्चित केले.
 
 
खिशात एक रुपयाचं भांडवल नव्हतं, पण गगनाला गवसणी घालण्याची प्रचंड जिद्द होती. कॅप्टनने मंदारला व्यावसायिक मार्गदर्शन केले. त्याचवेळी नेमक्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मंदार भेटला. आपण विमानसेवा पुरवितो हे सांगितले. मंदारचा आत्मविश्वास पाहून मुख्यमंत्र्यांनीही ‘ग्रीन सिग्नल’ दिला. त्यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांना विमानसेवा देण्याचे काम मंदारच्या ‘मॅब एव्हिएशन’ला मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आज ते १० विविध राजकीय पक्षांसाठी विमानसेवा पुरविण्याचे काम करतात.
 
 
२००९ मध्ये अशाप्रकारे ‘मॅब एव्हिएशन’ सुरु झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमान सेवा ते देऊ लागले. २०१२ साली ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ झाली. २०१४ साली भारतात सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी त्यांनी पहिल्यांदा ‘एव्हिएशन वॉर रुम’ ही संकल्पना आणली. जी राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली. २०१२ साली उत्तराखंड जलप्रलयावेळी मंदार भारदेंच्या मनात ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’ची संकल्पना डोक्यात आली. २०१३ मध्ये त्यांनी ‘नॉन शेड्युल ऑपरेट परमिट’साठी अर्ज केला होता, जी विमान उड्डाणासाठी आवश्यक असते. २०१६ मध्ये ही परवानगी मिळाली. आता ते भारतातील विमानसेवा म्हणून जगभर उड्डाण करु शकणार होते. याच दरम्यान ‘मॅब एव्हिएशन’च्या ताफ्यात पहिलं स्वत:च्या मालकीचं विमान आलं. २०१६ च्या दरम्यान मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हवाई रुग्णवाहिका प्रकल्पाची घोषणा केली. भारतातल्या ५०० किमीच्या परिघातील रुग्णास तत्काळ हवाई रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हावी, असा भारदेंचा मानस आहे. ‘मॅब’ने २०१७ साली पहिल्यांदा हवाईमार्गे अवयव रोपण वाहतूक केली होती.
 
 
सध्या ‘मॅब एव्हिएशन’च्या ताफ्यात दोन विमाने असून सध्याच्या टाळेबंदीनंतर आणखी दोन विमाने समाविष्ट होतील. येत्या काही वर्षांत दहा विमानांपर्यंत हा आकडा जाईल. भारतातील आठ राज्ये आणि जगातील सहा देशांत ‘मॅब’चा व्यवसाय विस्तारलेला आहे. यामध्ये नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, इराण आणि कतार या देशांचा समावेश आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशातसुद्धा हा व्यवसाय विस्तारलेला असेल. विशेष अतिथी हवाई सेवा, वैद्यकीय हवाई सेवा आणि भौगोलिक सर्वेक्षण या तीन पातळ्यांवर ‘मॅब’ कार्यरत आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ‘मॅब’ १०० हून अधिक लोकांना रोजगार देते.
 
 
‘राईट ब्रदर्स’च्या आठ वर्षे अगोदर म्हणजे १८९५ मध्ये शिवकर बापूजी तळपदे या मराठमोळ्या तरुणाने विमानाचा शोध लावला होता. त्यांचीच परंपरा मंदार भारदे आज हवाई सेवेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. महाराष्ट्र आज ६० वर्षांचा तरुण झाला. मंदार भारदेंसारखे मराठमोळे तरुण या महाराष्ट्राचं नाव अटकेपार नेत आहेत. जेव्हा महाराष्ट्र आपलं शतक साजरं करत असेल त्यावेळेस मंदार भारदेंसारखे १०० मराठी उद्योजक आंतरराष्ट्रीय उद्योगविश्वाच्या नभांगणांमध्ये मोठ्या दिमाखाने तळपत असतील यांत तीळमात्र शंका नाही.
 
 

Mandar Bharade, Mab Aviat 
Powered By Sangraha 9.0