आपले काम पराक्रम करण्याचे आहे. राज्य चालविण्याचे आहे. राज्य चालविण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य लागतं ते संपादन करण्याचे आहे. कुशल पराक्रमी, ज्ञानी आणि न्याय देणार्या दूरदृष्टीच्या राज्यकर्त्याच्या आश्रयाखाली व्यापारी, उद्योजक, कलाकार, अशी सर्व मंडळी राहत असतात, हाच जगाचा इतिहास आहे. महाराष्ट्राचा एकेकाळचा इतिहासदेखील हाच आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती भाषिक राज्य म्हणून दि. १ मे १९६० रोजी झाली. याचा अर्थ त्यापूर्वी ‘महाराष्ट्र’ नावाचा ओळख असलेला भूप्रदेश भारतात नव्हता किंवा इतिहासातच नव्हता, असा याचा अर्थ नाही. महाराष्ट्र अतिशय प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो. तिथे अनेक राजवटी निर्माण झाल्या. साधुसंत निर्माण झाले. महानुभाव पंथ आणि वारकरी पंथाने मराठी भाषा घडविली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ साली राज्यपुनर्रचना मंडळाची नेमणूक करण्यात आली. या मंडळाने मद्रास, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली. विदर्भ स्वतंत्र राज्य करावे, अशी शिफारस केली आणि गुजरात आणि उर्वरित महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य करावे, अशी शिफारस केली.
१ मे, १९६० पर्यंत गुजरात आणि महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य होते. मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात स्वतंत्र गुजरातसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी जबरदस्त आंदोलने झाली. गुजरातच्या आंदोलकांवर मोरारजी देसाई यांच्या आज्ञेने गोळीबार झाला आणि त्यात पाच गुजराती विद्यार्थी ठार झाले. आंदोलनाच्या शास्त्राप्रमाणे आंदोलनात कोणी हुतात्मा झाल्यास ते आंदोलन पेटत जाते. गोळीबार म्हणजे आंदोलन वाढविण्यासाठी दिलेले टॉनिक असे. मुंबईसह महाराष्ट्रातही जबरदस्त आंदोलन झाले. या आंदोलनात १०६ हुतात्मे झाले. प्रचंड जनसमर्थनाचे असे आंदोलन महाराष्ट्राने त्यानंतर अपवादानेच पाहिले असेल. लोकमताचा रेटा बघून गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र भाषिक राज्ये करण्याचा निर्णय झाला. गुजरातच्या आंदोलकांची मागणी मुंबई त्यांची राजधानी असावी, अशी होती. महाराष्ट्राचे आंदोलन ‘मुंबई आमचीच,’ असा आग्रही प्रचार करीत होते. शेवटी मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आज ती महाराष्ट्राची राजधानी आहे. भाषिक राज्याच्या कल्पनेला त्याकाळात काही जणांचा तात्त्विक विरोध होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. अशा वेळी भारतीय अस्मिता बळकट करणे आवश्यक होते. भाषिक अस्मिता या लहान अस्मिता असतात. राष्ट्रीय अस्मितांना त्या मारक असतात. म्हणून भाषिक राज्ये निर्माण करू नयेत. दोन भाषिक राज्यांमध्ये सीमेवरून भांडणे होत राहतील. नद्यांच्या पाण्याचे वाद निर्माण होतील. स्थलांतरित मजुरांचे प्रश्न निर्माण होतील इत्यादी विषय होते.
भाषिक राज्यांचा आग्रह धरणार्यांचा युक्तिवाद वेगळा होता. एक भाषेचे राज्य निर्माण झाले तर, राष्ट्रीय एकात्मता बळकट होईल. एक भाषा बोलणारे लोक साधारणतः समान रितीरीवाज, समानसण-उत्सव, समान आहार पद्धती, समान पोशाख, समान सांस्कृतिक विषय यांनी बांधलेले असतात. मराठी माणूस नाटकवेडा आहे, गाणे, नाच, संगीत याची त्याला आवड आहे. गणेशोत्सव, होळी इत्यादी सण तो वेगळ्याप्रकारे साजरे करतो. पुरणपोळी, मोदक, सोलकढी हे त्याले आवडीचे खाद्य-पेय पदार्थ आहेत. गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू यांचीदेखील अशी वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांनी राहणारे लोकं एका राज्यात एकत्र आले तर, त्यांच्यात भांडणे कमी होतील. हा दुसरा विचारप्रवाह अधिक सशक्त झालेला दिसतो. वेगळी भाषिक राज्ये झाल्यामुळे, राजकीय नेतृत्व उभे राहत गेले. समर्थ राजकीय नेतृत्वाशिवाय राज्य कोणत्याच क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. ’राजा कालस्य कारणम’ असे उगाच म्हटले जात नाही. दोन-तीन भाषिकांचे मिळून राज्य निर्माण झाले असते तर मुख्यमंत्री कोणत्या भाषेचा यावरून मारामार्या झाल्या असत्या. राज्यावर एखादी आपत्ती आल्यास तिचे खापर ज्या भाषेचा मुख्यमंत्री असेल त्याच्यावर दुसर्या भाषेचे लोक फोडणार, पण एकाच भाषेच्या राज्यात अशा आरोपांना काही अर्थ राहत नाही, असे आरोप नंतर पक्ष पातळीवर व्हायला लागतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्याला आता ६० वर्ष होत आली. या ६० वर्षांत भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत देशात अग्रक्रमाने स्थान मिळविले आहे. मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळे, केंद्र शासनाकडे सर्वाधिक कर मुंबईतून जातो. व्यापार आणि उद्योगाचे मुंबई देशातील क्रमांक एकचे केंद्र आहे. म्हणून मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी, मुंबईच्या आर्थिक जीवनात मराठी माणसाचा टक्का दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे. मराठी भाषिकांची संख्यादेखील ३५ ते ४० टक्क्यांवर आलेली आहे. १०० कोटी, हजार कोटी, ५ हजार कोटीचे उद्योग करणारी मराठी माणसे नगण्य आहेत. गेल्या ६० वर्षांत मराठी तरुण उद्योजक व्हावे म्हणून, कौटुंबिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत प्रयत्न व्हायला पाहिजे होते, त्यात आपण खूप मागे पडलो आहोत. नोकरी करण्यात मराठी माणूस धन्यता मानतो. नोकर्या जर मिळाल्या नाहीत, तर तो आरक्षणाची मागणी करीत राहतो. नोकरी नसेल तर कष्टाचे काम करण्यात बरीच जण स्वारस्य दाखवत नाहीत. प्लमबर, सुतार काम, इलेक्ट्रिशियन, भाजी, फळे विकणारे, अशा सर्व क्षेत्रात परप्रांतीय लोक म्हणून महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसतात. मग एखादा राजकीय नेता मराठी माणसाच्या वाईट स्थितीला परप्रांतीयांना जबाबदार धरतो.
एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल ती म्हणजे, व्यापार, उद्योग करणे हा मराठी माणसाचा स्वभाव नाही. जे त्याच्या रक्तात नाही, ते रक्तात पोहोचण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतील आणि त्याची सुरुवातही झालेली आपल्याला दिसून येते. मराठी माणसाच्या रक्तात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड पराक्रम करण्याची बीजे असतात. रानडे, गोखले-टिळक यांच्यासारखे पहिल्या प्रतीचे राजकीय नेते महाराष्ट्राने दिले. सामाजिक सुधारणेचे नेते जोतिराव फुले, राजश्री शाहू महाराज महाराष्ट्राचे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे. देशात चित्रपट कला मराठी माणसाने आणली. खेळाच्या क्षेत्रात विशेषतः क्रिकेटमध्ये मराठी माणसाने विक्रम केले. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात हिमालयाची शिखरे ठरावीत, असे गायक झाले, आणि सिने-संगीताच्या क्षेत्रातही लता आणि आशा यांची बरोबरी करणारे असे कोणी नाहीत . इतिहास संशोधन असो, वैज्ञानिक संशोधन असो, नाट्य असो किंवा कविता असो, मराठी माणूस ‘टॉप’लाच आहे.
इतिहासकाळात मराठी घोड्यांच्या टापांखाली तामिळनाडू, बंगाल आणि अटक नदीच्यापार प्रदेश आला. म्हणजे त्या ठिकाणी मराठी माणसाने राज्य उभे केले. असे म्हणतात की, जेथे मराठी माणूस, मराठ्यांचा घोडा पोहोचला, तो प्रदेश भारतातच राहिला. ढाक्यापर्यंत मराठी घोडे पोहोचले नाही, तो मुलुख भारतापासून दूर झाला. राज्य करणे ही मराठी माणसाच्या पराक्रमाची भूक आहे. गेल्या ६० वर्षांत ज्याला पहिल्या प्रतीचा राजनेता म्हणता येईल, असे राजकीय नेतृत्व महाराष्ट्राने निर्माण केले नाही. बहुतेक मराठी नेते नेहरू-गांधी घराण्याची चाकरी करण्यात धन्यता मानणारे निघाले. शिवाजी महाराजांचा पराक्रम, संताजी-धनाजी सारखे शौर्य, महादजी शिंद्यांसारखी झेप असणारा मराठी नेता निर्माण झाला नाही. जे मराठी नेते आहे ते जातींच्या डबक्याचे राजकारण करतात, एकमेकांचे पाय खेचण्याचे राजकारण करतात. भाषिक राज्य निर्माण झाले, मराठी मुख्यमंत्री होत गेले. पण, त्यापैकी एकाचीही झेप मी उद्याच्या भारताचा पंतप्रधान होईल, अशी राहिली नाही.
मला कोणावरही टीका करायची नाही , कोणाच्या उणिवा दाखवायच्या नाहीत, केवळ वस्तुस्थिती दाखवायची आहे. आपण छत्रपती शिवाजींचे वारसदार आहोत, कोणाला कुर्निसात करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. भाजी विकणे, केळी विकणे, बटाटेवडे विकणे हे आपले काम नाही. आपले काम पराक्रम करण्याचे आहे. राज्य चालविण्याचे आहे. राज्य चालविण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य लागतं ते संपादन करण्याचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जगातील सर्वात अवघड काम राज्य संपादन करणे आणि ते कुशलतेने चालविणे हे आहे. कुशल पराक्रमी, ज्ञानी आणि न्याय देणार्या दूरदृष्टीच्या राज्यकर्त्याच्या आश्रयाखाली व्यापारी, उद्योजक, कलाकार, अशी सर्व मंडळी राहत असतात, हाच जगाचा इतिहास आहे. महाराष्ट्राचा एकेकाळचा इतिहासदेखील हाच आहे. त्याचे प्रशिक्षण सर्व पातळीवर करीत राहिले पाहिजे. जातीच्या अस्मिता जागविण्याचे राजकारण बाजूला ठेवून आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, केवळ महाराष्ट्राचा म्हणून विचार करण्याचे जे अनेक विषय आहेत, त्यातील हा एक विषय आहे. त्याचा जाणत्यांनी विचार करावा ही विनंती. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.