तंत्रज्ञानाची भाषा

27 Apr 2020 22:00:28
Tech _1  H x W:
 
चौथ्या औद्योगिकी क्रांतीचे समाज रचनेवर, आर्थिक रचनेवर, राजकीय रचनेवर कोणकोणते परिणाम होणार आहेत, याचा गहन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
 
 
आपल्या देशात क्रांतीची भाषा करणार्‍या काही विचारधारा आहेत. एक विचारधारा वर्ग क्रांतीची भाषा करते. त्याला ‘मार्क्ससिस्ट क्रांती’ म्हणतात. दुसरी विचारधारा जातिअंताच्या क्रांतीची भाषा करते आणि तिसरी विचारधारा जातिअंत आणि वर्ग क्रांतीच्या सामायिकीकरणाची भाषा करते. मार्क्सच्या विचारांची क्रांती प्रथम रशियात झाली. त्यानंतर चीन, क्युबा, उत्तर कोरिया, दक्षिण अमेरिकेतील काही देशांत कम्युनिस्ट क्रांती झाली. त्यांनी कामगारांच्या स्वर्गाचे चित्र रंगविले. प्रत्यक्षातील स्वर्ग कसा निर्माण झाला याचे अनेक विनोद आहेत.
 
 
 
एक फ्रेंच, एक ब्रिटिश आणि एक उत्तर कोरियाचा माणूस म्युझियम बघायला गेले. अ‍ॅडम आणि इव्हचे चित्र त्यांनी पाहिले. इंग्रज माणूस म्हणाला, ’‘अ‍ॅडम इव्हला सफरचंद देतो आहे. बायकोला संपत्तीचा वाटा देणे ही ब्रिटिशांची पद्धत आहे म्हणून हे चित्र आमचे आहे.” फ्रेंच माणूस म्हणतो, “चूक. अ‍ॅडम आणि इव्ह नग्न आहेत, ही फ्रेंच पद्धती आहे म्हणून हे चित्र आमचे आहे.” उत्तर कोरियाचा माणूस म्हणतो, ’‘तुम्ही दोघेही चुकीचे आहात. हे आमचे चित्र आहे. आम्ही वस्त्रहीन तर आहोतच. खायलाही आम्हाला मिळत नाही, तरी आम्हाला सांगितलं जातं, तुम्ही स्वर्गात आहात.” मार्क्सच्या क्रांतीने देशातील सामान्य जनता भिकेला लागते, असा हा काही देशांचा इतिहास आहे.
 
 
जातिअंताची क्रांती संविधानाने आखून दिलेली आहे. जेव्हा मूलगामी बदल आकस्मिक होतात, तेव्हा त्याला ‘क्रांती’ म्हणतात. जातिअंताची क्रांती अशा आकस्मिक मार्गाने होण्याची अजिबात शक्यता नसल्याने संविधानाच्या मार्गाने ही क्रांती घडून आणण्याचा मार्ग दाखविला गेला आहे. आपले संविधान सर्वांना संधीची समानता देते, जातिभेद, धर्मभेद करीत नाहीत आणि कायद्याच्या राज्याचा मार्ग सांगते.
 
 
 
जातिअंत आणि मार्क्सची वर्ग क्रांती यांचा समन्वय आणि सामायिकीकरण अशक्य आहे. त्याचे पहिले कारण असे की, वर्ग आणि जाती या समव्याप्त कल्पना नाहीत. एका वर्गात अनेक जाती येतात आणि या जाती जातभावनेने जाग्या असतात. मार्क्सचा मार्ग हा हिंसेचा मार्ग आहे, संविधानाचा मार्ग हा अहिंसक क्रांतीचा, कायद्याचे पालन करण्याचा आणि घटनात्मक नीतीचे पालन करण्याचा आहे. जातिअंताचा संविधान मार्ग आणि मार्क्सचा मार्ग हे दोन्ही परस्पर विरोधी मार्ग आहेत, या दोघांचा समन्वय शक्य नाही.
प्रत्येक समाजाचा एक स्वभाव असतो, आपला स्वभाव हिंसेचा मार्ग धरून परिवर्तन करण्याचा नाही. आपण स्वभावाने अहिंसावादी आहोत. भगवान गौतम बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली ती अहिंसक मार्गाने केली, महात्मा गांधींनी अहिंसक मार्गानेच लढे दिले, डॉ. बाबासाहेबांचा मार्गदेखील अहिंसकच होतो. हिंसात्मक मार्गाचा अवलंब करणार्‍यांच्या मागे समाज उभा राहत नाही. उदाहरण देऊन सांगायचे तर पालघरला जो हिंसाचार झाला, त्यामुळे सर्व देश हादरलेला आहे. कोणीही त्याचे समर्थन करीत नाही.
 
 
जगात तीन क्रांतीचे महत्त्व सांगितले जाते. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती. या तिन्ही क्रांत्यांनी त्या त्या देशांचे इतिहास बदलून टाकले. या क्रांती होण्यापूर्वी समाजाचे वैचारिक प्रबोधन आणि धार्मिक प्रबोधन विपुल प्रमाणात झालेले आहे. या तिन्ही क्रांती हिंसक क्रांती आहेत. नवीन व्यवस्था निर्माण करण्यासाठी लाखो लोकांना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले आहे. ‘रक्तरंजित क्रांती’ असे या तिन्ही क्रांतीचे स्वरूप आहे. जगात अनेक देशांत कट करून सत्ता उलथवली जाते. त्यालाही ‘क्रांती’ असे म्हणतात. समाज व्यवस्था परिवर्तनाची क्रांती आणि अशा सत्ता परिवर्तनाची क्रांती एक नव्हे. ‘क्रांती’ हा शब्द दोन्ही ठिकाणी असला तरी त्याचे अर्थ फार वेगवेगळे आहेत.
 
 
समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्रांती नेहमीच हिंसक असते असे नाही. वैज्ञानिक क्रांती या प्रकारात मोडते. पहिल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात १७६० सालापासून झाली. या क्रांतीने मनुष्यश्रमाऐवजी वाफेच्या शक्तीवर उत्पादन करणारे कारखाने काढले. उत्पादनाच्या साधनात आणि पद्धतीत मूलगामी बदल घडवून आणले. रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या घटत गेली. शहरं वाढत गेली. भांडवलाला महत्त्व आले. कोळसा, वेगवेगळ्या प्रकारचे धातू यांचे महत्त्व प्रचंड वाढले. कारखान्यात काम करण्यासाठी काही गुणवत्ता निर्माण करावी लागली. त्याप्रमाणे शिक्षणपद्धती निर्माण झाली. शहरात झोपडपट्टया वाढल्या, त्यांचे प्रश्न निर्माण झाले. अनेक कामगारांना राबवून घेण्यात आले. त्यांच्या कामगार संघटना उभ्या राहिल्या. पैसा हेच भांडवल नसून श्रम हेदेखील भांडवल आहे, हा विचार पुढे आला. भांडवलशाहीच्या विकासासाठी ‘व्यक्तिवाद’ ही कल्पना पुढे आली. खासगी संपत्तीचा अधिकार निर्माण झाला. या सर्वांचे रक्षण करणारी प्रजासत्ताक राज्यपद्धती विकसित होत गेली. समाजाच्या रचनेत आमूलाग्र बदल होत गेले.
 
 
यानंतर दुसरी औद्योगिक क्रांती विजेचा शोध लागल्यानंतर झाली. वाफेच्या शक्तीऐवजी विजेच्या शक्तीचा वापर सुरू झाला. यांत्रिकीकरणाचे युग सुरू झाले. प्रचंड कारखाने उभे राहू लागले. यंत्रावर एकाच प्रकारचे काम करणारा कामगार वर्ग उभा राहिला. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी असे दोन वर्ग निर्माण झाले. त्यांना ‘ब्ल्यू कॉलर’ आणि ‘व्हाईट कॉलर’ असे म्हटले गेले. यातील मध्यमवर्ग हा सामाजिक स्थैर्याचा आधार झाला. उत्पादित मालासाठी, बाजारपेठा मिळविण्यासाठी जागतिक संघर्ष सुरू झाले त्यातून वसाहतवादाचा जन्म झाला. ज्याच्याकडे यांत्रिकी शक्ती त्याने आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देश गुलाम करून टाकले.
 
संगणक क्रांती ही तिसरी औद्योगिक क्रांती समजण्यात येते. तिची सुरुवात १९७०च्या दशकात झाली. ऑलविन टॉफलर यांनी ’फ्युचर शॉक’ या ग्रंथात या क्रांतीचे भविष्यकालीन परिणाम काय होतील, हे सत्तरच्या दशकातच सांगितले. संगणक क्रांतीने साक्षरतेची परिभाषा बदलली. अक्षर ओळख असली म्हणजे साक्षरता नव्हे. संगणक साक्षर असणे आवश्यक झाले. या संगणक क्रांतीबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला. पारंपरिक व्यवसाय हळूहळू संपत गेले. या तंत्रज्ञानाच्या विकासाची गती इतकी जबरदस्त राहिली की, कालचे तंत्रज्ञान आज अर्थहीन ठरू लागले. कोडॅक कंपनी ही कॅमेरा आणि त्याची फिल्म बनविणारी जगातील अग्रगण्य कंपनी होती, अब्जावधींची तिची उलाढाल होती. डिजिटल कॅमेर्‍याचे युग आले आणि ही कंपनी इतिहासजमा झाली. मोठमोठे कारखाने आणि त्यांच्या उत्पादन पद्धती बदलत गेल्या. मुंबईतील सगळ्या कापड गिरण्या बंद झाल्या. कापड उत्पादन काही थांबले नाही, ते नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे होऊ लागेल. मुंबईतील दोन-अडीच लाख गिरणी कामगार बेकार झाले. त्या गिरण्यांच्या जागांवर आता माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सेवा उद्योग उभे राहिले आहेत. त्यात काम करणारा वर्ग ‘व्हाईट कॉलर’ वर्ग आहे. त्याला ‘युनियन’ वगैरेची काही गरज वाटत नाही.
 
आज आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या काळातून जात आहोत. या चौथ्या औद्योगिक क्रांतीवर The Fourth Industrial Revolution - Klaus Schwab यांचे फार महत्त्वाचे पुस्तक आहे. ही चौथी औद्योगिक क्रांती पहिल्या तीन क्रांतीपेक्षा सर्व बाबतीत वेगळी आहे. ही डिजिटल क्रांती आहे. या क्रांतीने स्वायत्तताचे युग सुरू झाले. कमीत कमी मनुष्य बाळाचा वापर करून उत्पादन पद्धतीचा विकास चाललेला आहे. वेगवेगळे नवीन शब्दप्रयोग या क्रांतीने पुढे आणलेले आहेत. रोबोटिक, थ्रीडी प्रिंटिंग, स्वयंचलित वाहने, प्लॅटफॉर्म बिझिनेस, ह्युमन जिनोमी प्रोजेक्ट, डिझायनर बेबी. नवीन नवीन प्रकारचे धातू उदारणार्थ Grathene हा धातू स्टीलपेक्षा २०० पट अधिक मजबूत आहे. मनुष्याच्या केसापेक्षा दहालाख पटीने पातळ होऊ शकतो. वीज आणि उष्णतेचा तो उत्तम वाहक आहे. हा जगातील आजचा सर्वात महागडा धातू आहे. त्याचा जसजसा उपयोग होत जाईल तसतसा पूर्वीची यंत्रे आणि उत्पादक पद्धती यात बदल होत जातील.
आणखी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स.’ याचा अर्थ असा होतो की, वस्तू, सेवा, स्थान यांची परस्पर संलग्नता. याचे उदाहरण द्यायचे तर मुंबईसारख्या शहरात आपण कोठे तरी उभे असतो. अ‍ॅप ओपन करतो. गाडी बुक करतो आणि आपण जिथे असू तिथे ही ऑनलाईन बूक केलेली टॅक्सी येऊन उभी राहाते. चौथ्या औद्योगिकी क्रांतीचे समाज रचनेवर, आर्थिक रचनेवर, राजकीय रचनेवर कोणकोणते परिणाम होणार आहेत, याचा गहन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान हे नेहमी जातिनिरपेक्ष आणि वर्गनिरपेक्ष असते. तंत्रज्ञान विशिष्ट जातीच्या विकासासाठी निर्माण होत नाही. तसेच ते विशिष्ट वर्गाच्या फायद्यासाठी निर्माण होत नाही. फक्त विज्ञानाच्या सिद्धांताचा वापर कसा करायचा हे सांगते. असे जरी असले तरी तंत्रज्ञान हे समाजातील विषमता वाढविण्यास कारणीभूत होते, असा औद्योगिक क्रांतीपासून ते चौथ्या क्रांतीपर्यंतचा अनुभव आहे. ‘दी फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्हॉलुशन’ या ग्रंथाचा लेखक म्हणतो, “The scale and breadth of the unfolding technological revolution will usher in economic, social and cultural changes of such phenomenal proportims that they are almost impossible to envisage. Nevertheless, this chapter describes and analyses the potential impact of the fourth industrial revolution on the economy, business, governments and countries, society and individuals.” म्हणजे लेखकाला हे म्हणायचे आहे की, ही क्रांती सामाजिक आणि सांस्कृतिक कशाप्रकारचे बदल घडवून आणेल, याचा अंदाज करणे फार कठीण आहे.
 
आपल्या समाजाचा विचार केला तर, आपल्या समाजात या चारही क्रांत्यांच्या काळात जगणारे समूह आहेत. मनुष्य श्रमावर, प्राणी श्रमावर चालणार्‍या गाड्या आपल्याकडे आहेत. बैलगाड्या आहेत, घोडागाडी आहेत, उसाचा रस काढणारे माणसाने चालविणारे चरखे आहेत. दुसर्‍या क्रांतीतील वीज ज्यांच्याकडे अजूनही पोहोचली नाही असे कोट्यवधी लोक आहेत. संगणकाला स्पर्शही न झालेले देखील कोट्यवधी आहे. समता आणि विषमतेच्या भाषेत सांगायचे तर पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रांतीच्या लाभापासून वंचित असलेले कोट्यवधी लोक देशात आहेत. ही औद्योगिक क्रांतीने निर्माण केलेली विषमता आहे. तिचा जातीय विषमतेशी काहीही संबंध नाही. तिचे रूप मुख्यतः आर्थिक आहे. आयटी क्षेत्रात काम करणारा वर्षाला १०-१५ लाख मिळवितो, बँकेत काम करणारा त्याच्या पाव पटही मिळवत नाही आणि असंघटित क्षेत्रात काम करणारा आर्थिक गाळात रुतलेला असतो. यात चौथ्या औद्योगिक क्रांतीचे रोजगारावर होणारे परिणाम हे अतिशय गंभीर असतील.
 
चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लेखक म्हणतो, “The reasons why the new technology revolution will provoke more upheaval than the previous industrial resolutions are those already mentioned in the introduction: speed (everything is happening at much faster pace than ever before), breadth and depth (so many radical changes are occurring simultaneously), and the complete transformation of entire systems.''
 
जातिगत विषमतेचे प्रश्न आपल्या पुढे आहेतच. यात तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या विषमतेची भर पडत चालली आहे. त्याच्याशी लढा देण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातील एक मार्ग म्हणजे, वंचित समाजाला साक्षर करण्याचा आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात जे तंत्रज्ञानज्ञानी असतील, ते पुढे जातील. पूर्वी साक्षर करण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी शाळा काढल्या. आज नव तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या शाळा, महाविद्यालये काढण्याची गरज आहे. क्रांतीची भाषा भावना भडकविण्यासाठी चांगली असते. पण, जीवनात पुढे जाण्यासाठी तंत्रज्ञानाची भाषाच उपयोगी असते, हा या युगाचा मंत्र आहे.
Powered By Sangraha 9.0