कांदळवन संरक्षण विभागाची (मॅंग्रोव्ह सेल) कारवाई
मुंबई (प्रतिनिधी) - भिवंडीमधील कांदळवनक्षेत्रात अतिक्रमण करुन कांदळवनांची तोड करणाऱ्या व्यक्तींना 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. हे व्यक्ती पोकलेनच्या आधारे राखीव दर्जाच्या कांदळवनक्षेत्रात खोदकाम करत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लाॅकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई महानगर परिक्षेत्रामधून कांदळवनांची तोड आणि वनजमिनींवर अतिक्रमण सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. राज्यात कांदळवन जमिनींना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या कांदळवनांची कत्तल करणे वा येथील जमिनींवर अतिक्रमण करणे कायद्याने गुन्हा आहे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या परिस्थितीचाफ़ायदा उचलून भिवंडीतील खारबाव येथील राखीव कांदळवन वनक्षेत्रात काही इसम अतिक्रमण करत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जागेवर पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना तीन इसम येथील कांदळवन जमिनीची साफसफाई करुन, पोकलेनच्या मदतीने खोदकाम करुन कांदळवनांची तोड करत असल्याचे दिसले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आणि भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ चे उल्लंघन केल्यामुळे आम्ही या तिन्ही इसमांना ताब्यात घेतल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चेतना शिंदे यांनी दिली. यावेळी खोदकामासाठी वापरण्यात आलेला पोकलेनजप्त करण्यात आला असून आरोपी रविकांत काठे (वय ४५), विश्वनाथपाटील (वय ४२) आणि करण जिरे (वय २४) यांच्या विरुद्ध गुन्हानोंद करुन चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना न्यायालयात हजर करण्यातयेणार आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी डी.आर. पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक गीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चेतना शिंदे आणि वनपाल रविंद्र शिंदे यांनी केली.