दूरदर्शनवर रामायण सुरू झालं आणि ‘मंथरा’ साकारणार्या, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री ललिता पवार पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या निमित्ताने त्यांच्या कलाप्रवासावर टाकलेला कटाक्ष...
कोरोनामुळे देश ‘लॉकडाऊन’ झाला आणि या ‘लॉकडाऊन’मध्ये विरंगुळा म्हणून रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा पडद्यावर आली. या मालिकेमुळे मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पुन्हा एकदा पडद्यावर अनुभवता आले. ‘रामायण’ मालिकेत रामाच्या वनवासाला कारणीभूत असणार्या ‘मंथरे’चं पात्र अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलं होतं. या मालिकेच्या निमित्ताने ललिता पवार यांच्या आठवणींनी उजाळा मिळाला.
कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई, त्या जेव्हा पडद्यावर यायच्या तेव्हा अनेकांच्या तोंडून शिव्याशाप आल्याशिवाय राहायच्या नाहीत. त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणं कठीण व्हायचं की, त्या अभिनय करतात की सगळं खरंखुरं घडतं आहे. त्यांनी काही ‘सॉफ्ट रोल’ही केले, पण त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता ‘निगेटिव्ह’ भूमिकांमुळे मिळाली.
ललिता यांचा जन्म १८ एप्रिल, १९१६ रोजी येवल्याचे रेशमी आणि सुतीवस्त्रांचे सधन व्यापारी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला होता. ललिता पवार यांचे खरे नाव अंबू सगुण होते. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करायला सुरुवात केली होती. आर्यन कंपनीच्या नानासाहेब सरपोतदारांनी त्यांना या क्षेत्रात येण्याची संधी दिली होती. नानासाहेब सरपोतदार यांच्याच कंपनीत ललिता पवार यांनी १८ रुपये मासिक पगारावर काम करणे सुरू केले.
१९२८च्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. ‘गनिमी कावा’, ‘आर्य महिला’, ‘ठकसेन’, ‘पारिजातक’, ‘भीमसेन’, ‘पृथ्वीराज संयोगिता’, ‘नको गं बाई लग्न’, ‘पतितोद्धार’, ‘सुभद्रा हरण’, ‘चतुर सुंदरी’ हे त्यांचे मूकपट लोकप्रिय झाले होते. अभिनयासोबतच त्या उत्कृष्ट गायिकादेखील होत्या. १९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत-ए-मर्दा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बोलपटांच्या विश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील सर्व गाणी ललिता यांनी स्वतः गायली होती. चित्रपटातलं ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे’ हे गाणं फारच लोकप्रिय झालं होतं. तब्बल चार आठवडे चाललेल्या या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला.
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. १९३८ मध्ये टॉलस्टॉयच्या ‘रेसरेक्शन’ या कादंबरीवर आधारित ‘दुनिया क्या हैं?’ या चित्रपटासाठी निर्माती-अभिनेत्री-गायिका अशी तिहेरी भूमिका त्यांनी निभावली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनी केले होते. भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित ‘नेताजी पालकर’ या चित्रपटात ‘काशी’ या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट होता.
१९४२ मध्ये भगवानदादांबरोबर त्यांनी ‘जंग-ए-आझादी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली. चित्रपटात थंडीच्या दिवसात, तळ्यात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतात, असे एक दृश्य होते. भगवानदादा पैलवान होते आणि फिल्मी दुनियेत नवखे होते. त्यांनी चुकून ललिता यांच्या थोबाडीत एक सणसणीत ठेवून दिली. त्यामुळे ललिता यांच्या डाव्या डोळ्याची रक्तवाहिनी फुटली, चेहर्याला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार घेऊनही शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. परिणामी, त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले.
व्यंगावर मात करत त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र आणि खलनायिकी भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ‘अमृत’, ‘गोरा कुंभार’, ‘जय मल्हार’, ‘रामशास्त्री’, ‘अमर भूपाळी’, ‘मानाचं पान’, ‘चोरीचा मामला’ यांसारखे मराठी चित्रपट तर, ’श्री ४२०’, ’अनाडी’, ’हम दोनों’, ’आनंद’, ’नसीब’, ’दुसरी सीता’, ’काली घटा’ या हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत ‘मंथरा’ची भूमिका साकारली होती.
दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याबरोबर ललिता यांचा पहिला विवाह झाला आणि त्या अंबूच्या ललिता पवार झाल्या. त्यांनी एकत्र सात-आठ चित्रपटही केले होते. मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर ललिता यांनी ‘अंबिका स्टुडिओ’चे मालक आणि निर्माते रामप्रकाश गुप्ता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला होता.
ललिताबाईंना १९६० मध्ये ‘अनाडी’ चित्रपटातील ‘डिसा’ या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. १९६१ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, १९७७ साली ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. ‘गृहस्थी’, ‘सजनी’, ‘अनाडी’, ‘घर बसा के देखो’ या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले. पडद्यावर कठोर दिसणार्या ललिता पवार खर्या आयुष्यात मात्र वेगळ्या होत्या. ललिता यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ७०० चित्रपटांमध्ये काम केले.
१९९० मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कर्करोग झाला. कर्करोगाच्या उपचारांदरम्यान त्यांना स्मृतिभ्रंश झाला. २४ फेब्रुवारी, १९९८ पडद्यावरच्या या ’खाष्ट सासू’ने ’आरोही’ या आपल्या बंगल्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या कलाप्रवसाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!