जगत्जेता भाईचुंग भुतिया

24 Apr 2020 20:24:42


bhaichyung bhutia_1 

पेले, मॅरेडोना, मेस्सी, रोनाल्डो या जगातील महान फुटबॉलपटूंच्या यादीत समाविष्ट असलेला भारतीय फुटबॉलपटू भाईचुंग भुतिया. जाणून घेऊया त्याचा हा अविस्मरणीय प्रवास...


भारतीय क्रिकेट संघाने १९८३चा चषक जिंकल्यापासून आपल्या देशातील जवळपास प्रत्येक तरुण हा क्रिकेटकडे वळू लागला. पण, क्रिकेटनंतर फुटबॉलही तसा भारतात आवडीने खेळला जातो. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला फुटबॉलमध्ये नावलौकिक मिळवून दिले ते, भारतीय फुटबॉलपटू भाईचुंग भुतिया या दिग्गज खेळाडूने. अगदी लहान वयातच त्याच्या कामगिरीमुळे त्याची तुलना ही महान फुटबॉलपटू पेले, मॅरेडोना, मेस्सी यांच्याशी होऊ लागली होती. भाईचुंग भुतियामुळे फुटबॉलमध्ये भारताला एक नवा चेहरा मिळाला होता. एकीकडे भारतामध्ये क्रिकेटशिवाय दुसर्‍या खेळाकडे लोकांचे फारसे लक्षही नसायचे. अशा काळात भाईचुंग भुतियाने सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष फुटबॉलकडे पुन्हा वळले. परंतु, त्याचा आजवरचा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. तेव्हा, जाणून घेऊया त्याच्या या अविस्मरणीय प्रवासाबद्दल...
 

सिक्कीममधील टीनकीटम या छोट्याशा गावामध्ये भाईचुंग भुतियाचा जन्म झाला. त्याचे आई-वडील हे शेतकरी. त्यांच्या घरी तसा फुटबॉलचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. भाईचुंगच्या लहानपणीच त्याचे वडील वारले. त्यावेळी त्याचे त्याचे काका कर्मा भुतिया यांनी त्याला शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्याने सेंट झेव्हियर्समध्ये शालेय शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच तो फुटबॉलदेखील खेळत असे. एवढेच नव्हे, तर फुटबॉलव्यतिरिक्त त्याने बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि अ‍ॅथलेटिक्समधून शाळेचे नेतृत्व केले होते. त्याचे शिक्षण चालू असतानाच भारतीय खेळ प्राधिकरणाकडून (साई) त्याला फुटबॉलची शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून तो गंगटोकमधील ताशी नामग्याल अकादमी येथे फुटबॉल प्रशिक्षणासाठी गेला. १९९३ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला फुटबॉलसाठी शिक्षणावर पाणी सोडावे लागले. त्यानंतरही तो अनेक क्लबकडून मात्र फुटबॉल खेळत होता. त्याने १९९३मध्येच कोलकता येथे आयोजित स्पर्धेमध्ये पूर्व बंगालकडून क्लबमध्ये व्यावसायिक पदार्पण केले. पहिल्याच स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी करून चार गोल केले. इथून त्याच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. १९९५ मध्ये तो ‘जेसीटी मिल्स’कडून खेळू लागला. त्याने ‘मिल्स’कडून खेळताना क्लबला भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्या स्पर्धेमध्ये त्याने सर्वात जास्त गोल केले होते. एकोणिसाव्या वर्षी म्हणजे दि. १० मार्च १९९५ रोजी भुतियाने नेहरू चषकात थायलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. याच स्पर्धेमध्ये त्याने उझबेकिस्तानविरुद्ध सर्वाधिक गोल केले. एखाद्या स्पर्धेमध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सर्वाधिक गोल करणारा तो सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला. त्याच्या या खेळाची दखल जगातील मोठमोठ्या आणि नावाजलेल्या क्लबने घेतली. त्याने देशातील क्लब तसेच इतर देशातील अनेक क्लब्सचे नेतृत्व करून चांगली कामगिरी केली. जागतिक फुटबॉलच्या नकाशामध्ये भारताचे नाव एका नव्या उंचीवर त्याने नेवून ठेवले. त्यानंतर मात्र त्याला कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. १९९६ मध्ये त्याला सर्वोत्तम भारतीय खेळाडूचा पुरस्कार मिळाला. १९९७ मध्ये तो पुन्हा पूर्व बंगाल क्लबमध्ये दाखल झाला. १९९८-९९ मध्ये तो पूर्व बंगाल क्लबचा कर्णधार झाला. पुढे काहीकाळ त्याने ‘इंग्लिश फुटबॉल स्पर्धे’मध्ये एका क्लबचे नेतृत्व केले. १५ एप्रिल २००० मध्ये ‘इंग्लिश प्रोफेशनल गेम’मध्ये सर्वाधिक गोल करणार तो पहिला आशियाई खेळाडू ठरला.
 
२००२ मध्ये मोहन बागान क्लबचे नेतृत्व त्याने हाती घेतले. या क्लबला ‘आशियाई करंडक’ जिंकून देण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे अनेक स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली. २००२ मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या ‘एलजी चषक’ स्पर्धेमध्ये भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली आणि त्याच्याच नेतृत्वात पुढे भारतीय संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेमध्ये तीनदा, २००७ आणि २००९ मध्ये ‘नेहरू चषक’ स्पर्धेमध्ये दोनदा आणि २००८च्या ‘एएफसी चॅलेंज चषक’ स्पर्धेमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आणि आपले स्थान आंतरराष्ट्रीय क्रमवारीत निश्चित केले. या कामगिरीमुळे कतारमध्ये होणार्‍या ‘आशियाई चषक’ स्पर्धेत भारताचे स्थान निश्चित झाले.
 
अखेर २०११ साली भाईचुंग त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अखेरचा निरोप देत सन्मानाने निवृत्त झाला. त्याने केलेल्या कामगिरीने भारतीय फुटबॉलचा स्तर वाढवलाच आणि तो अधिकाधिक युवा फुटबॉलपटूंचा आदर्शही ठरला. १९९८ मध्ये भाईचुंगला फुटबॉलसाठी ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला, तर २००८ मध्ये त्याला ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सिक्कीममध्ये त्याच्या नावाने ‘भाऊचुंग स्टेडियम’देखील उभारण्यात आले आहे. निवृत्तीनंतरही त्याने फुटबॉलशी नाळ तोडली नाही. त्याच्या खेळाप्रमाणे तो त्याच्या फिटनेससाठीही तेवढाच प्रसिद्ध आहे. तसेच त्याला समाजकार्यातही रस आहे. भारतीय फुटबॉल संघाला एक आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणार्‍या या जगत्जेत्या फुटबॉलपटूला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!
 
 

Powered By Sangraha 9.0