२२ एप्रिल रोजी सर्व डॉक्टरांचा 'व्हाईट अलर्ट'
पुणे (तेजस परब) : कोरोनारुपी महामारीला हरवण्यासाठी देवदूत म्हणून दिवसरात्र युद्ध लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्राला आता गांभीर्यपणाने घेणे गरजेचे असून केंद्र-राज्य आणि स्थानिक प्रशासन पातळीवरही विशेष महत्व घेणे गरजेचे आहे, असे मत 'इंडियन मेडिकल असोसिएशन'चे (आयएमए) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी 'आयएमए'तर्फे पाळण्यात येणाऱ्या देशव्यापी 'व्हाईट अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधला.
'आजमितीला देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. मात्र, अपुऱ्या संसाधनांची चणचण देशाला हतबल बनवत आहेत. या संकटापासून धडा घेत आगामी काळात आरोग्य क्षेत्राला केंद्र आणि राज्य सरकारने विशेष महत्व देऊन अर्थसंकल्पातील ३.५ ते ४ टक्के निधी देऊन संसाधनांची निर्मिती करावी', अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना रुपी महामारीशी लढताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव ओतून सेवा दिली आहे. मात्र, सरकारी रुग्णालयांची कमतरता, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा, अद्यावत तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि औषधांचा पुरवठा या गोष्टींकडे व्यापक दृष्टीने पाहणे यापुढे गरजेचे असल्याचे मत त्यांनी केले आहे. आरोग्य क्षेत्र अधिभार किंवा अन्य कररूपात निधीची उपलब्धता करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
विम्याची रक्कम अपूरी
कोरोनाशी लढताना आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढण्यात येणारी विम्याची ५० लाखांची रक्कम अपूरी असून हा विमा दुप्पट करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विम्याचा लाभ हा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
२२ एप्रिल 'व्हाईट अलर्ट'
आयएमए सदस्य डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी, डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू व स्थानिक जमावाकडून त्यांच्या मृतदेहाची विटंबना, कुटूंबियांना मिळालेली अमानूष वागणूक, अंत्यसंस्काराला विरोध, तबलिघींकडून डॉक्टरांना मिळणारी वागणूक, कोरोना सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे अ्मानूष हल्ले, आरोग्य सेविकांचा छळ याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयएमएने २२ एप्रिल रोजी व्हाईट अलर्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
२३ एप्रिल काळा दिवस
'व्हाईट अलर्ट'नंतरही डॉक्टरांवरील हल्ले थांबले नाहीत किंवा सरकारतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही तर २३ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत.