बुलढाण्याच्या शहीद वीरपुत्राला अखेरचा निरोप

    20-Apr-2020
Total Views |
buldhana_1  H x

अंत्यविधीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन



बुलढाणा : एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूंशी लढा देत आहे. तर दुसरीकडे सीमापलीकडे होणाऱ्या आतंकवादी कारवाई काही केल्या कमी होत नाहीत. जम्मू काश्मीरमधील सोपोर भागात १८ एप्रिलला अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्याचा सुपुत्र चंद्रकांत भगवंतराव भाकरे यांचा समावेश आहे. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे या अंत्यविधीच्या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.


जम्मू काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे आतांकवाद्यांशी लढताना सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. यातील चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावचे जवान आहेत. शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांचे पार्थिव मुळगाव असलेल्या पातुर्डा येथे आणण्यात आले. त्यावेळी गावकर्‍यांनी अमर रहे अमर रहे चंद्रकांत भाकरे अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा यावेळी दिल्या.


बुलडाण्यात आज गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंतयात्रेमध्ये पातुर्डा येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनीही शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन शासनाच्यावतीने आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, आमदार संजय कुटे यांनी ही पुष्पचक्र वाहिले. त्यांनतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


शहीद चंद्रकांत भाकरे यांना पाच वर्षाची मुलगी दिव्या आणि तीन वर्षाचा मुलगा कुश, पत्नी, आई-वडील आणि भावंड असा आप्त परिवार आहे. चंद्रकांत यांच्या जाण्याने गावात सर्वत्र शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.