तालीम ‘अभि’नयाची!

02 Apr 2020 18:58:01
abhijeet_1  H x

आपल्या अनोख्या भाषाशैलीने आणि हटके नावाने ‘तो’ नेहमीच चर्चेत राहिला. रंगभूमी ते चित्रपट असा प्रवास करणार्‍या अभिजीत श्वेतचंद्रच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...


अभिजीतला पडद्यावर बघताच क्षणी समोर एखादा अस्सल पहिलवान अथवा कुस्तीपटू उभा असल्याचा भास होतो. अभिजीतचा जन्म अलिबागचा. मात्र, तो लहानाचा मोठा डोंबिवलीमध्ये झाला. अभिनयाची आवड असणार्‍या अभिजीतने बालवर्गात असताना एका नाटुकलीत गणपतीची भूमिका साकारली होती. अगदी बालपणापासूनच त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झालेली. शाळेत आयोजित होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात तो नेहमी सहभागी व्हायचा. अभिनयासोबतच त्याला नृत्याचीदेखील आवड होती. नृत्यस्पर्धांमधूनही त्याने अनेक पारितोषिके पटकावली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पेंढरकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यावर मात्र त्याच्या अभिनय प्रवासात खंड पडला. पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यास एके अभ्यास हा एकच नियम त्याने काटेकोरपणे पाळला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली. नोकरी करत असताना रोज तीच तीच कामे करून त्याला कंटाळा यायला लागला. अशावेळी त्याचे मन पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळू लागले. इतक्या वर्षांत अभिनयापासून दूर असूनही त्याला ते कायमच खुणावत होते. नोकरी सोडून त्याने पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.


अभिनयाचा ध्यास लागला होता. अभिनयातच करिअर करायचे निश्चित केल्यावर त्याने पहिल्यांदा आईला,“मी अभिनेता होऊ का?” असा प्रश्न केला. त्यावर मिळालेल्या उत्तराने त्याचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला. आई म्हणाली, “तुला जर त्यातून आनंद मिळणार आहे, तुला ते आवडतंय तर अगदी खुशाल कर.” नोकरी करावी असा त्याच्या आईवडिलांचा अजिबात अट्टाहास नव्हता. घरात अभिनयाची काहीच पार्श्वभूमी नव्हती. बाबांचं वर्कशॉप होतं. बाबांनी त्याला या क्षेत्रातल्या संघर्षाची कल्पना दिली. परंतु, दोघांचाही त्याला खंबीर पाठिंबा होता.


नोकरी सोडून पूर्णपणे या क्षेत्राकडे वळायचे ठरवल्यावर त्याने सर्वप्रथम शिवदास घोडके यांच्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला. तिथून त्याला अभिनयाची गोडी लागली. पुढे अभिनयाचे बारकावे समजून घेता यावेत म्हणून त्याने अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचे ठरवले आणि मुंबई विद्यापीठाच्या ‘मास्टर्स इन थिएटर आर्ट’मध्ये प्रवेश घेतला. मास्टर्स करत असताना संस्थेचे संचालक वामन केंद्रेंनी ‘मोहे पिया’ या त्यांच्या नाटकाच्या मुख्य भूमिकेसाठी म्हणजेच ‘घटोत्कच’ या पात्रासाठी अभिजीतची निवड केली. ‘मोहे पिया’ हे त्याचे पहिलेवहिले नाटक. हे नाटक करताना त्याला एका दिग्दर्शकाने चित्रपटाबद्दल विचारणा केली. त्यावेळेस फक्त नाटकांकडेच लक्ष केंद्रित करायचे, असे त्याने ठरवलेले म्हणून त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. परंतु, भूमिका वाचून बघावी, असे त्याच्या मनात आले आणि भूमिका वाचताक्षणी त्याने चित्रपटासाठी होकार कळवला. तो चित्रपट होता ‘चापेकर ब्रदर्स.’ या चित्रपटानंतर त्याने ‘तालीम’ आणि ‘वा पहिलवान’ या चित्रपटांत कुस्तीवीराची भूमिका साकारली.


‘तालीम’ चित्रपटानंतर त्याला ‘झी युवा’च्या ‘बापमाणूस’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका सुरू असतानाच त्याला ‘झी मराठी’वरील ‘बाजी’ मालिकेतील मुख्य पात्रासाठी म्हणजे ‘बाजी’ साकारण्याची संधी चालून आली. रांगडा योद्धा ‘बाजी’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात घर करून गेला. या मालिकेनंतर अभिजीत ‘साजणा’ या मालिकेतून रोमॅण्टिक भूमिका साकारताना दिसला.


अभिनय क्षेत्रातील संघर्षाबद्दल सांगताना अभिजीत म्हणतो, “प्रत्येक क्षेत्रात संघर्ष हा असतोच. मात्र, प्रत्येक भूमिकेसाठी मेहनत घेण्याच्या सवयीमुळे मला या संघर्षाची तितकीशी झळ बसली नाही.” ‘तालीम’ चित्रपट करताना त्याने कुस्ती शिकून घेतली, कुस्तीबरोबरच त्याने कोल्हापुरी भाषाही शिकून घेतली. या नव्या गोष्टी शिकताना त्यांचा थोडा त्रास नक्कीच झाला, पण भविष्यात त्याला या प्रत्येक गोष्टीचा फायदा झाला. ‘तालीम’च्या वेळी शिकलेली कोल्हापुरी भाषा त्याला ‘बापमाणूस’ करताना कामी आली. कोल्हापुरी रांगड्या भाषेवर बसलेला जम त्याच्या संवादांना एक वेगळीच लय देत गेला. त्याच्या संवादफेकीची शैली तयार झाली.
‘बाजी’ ही मालिका पेशवेकालीन कालखंडावर आधारित असल्याने, ती चित्रित करताना विशेष काळजी घेतली जायची. अनेकवेळा हे चित्रीकरण २४ तास आणि आठवडाभर चालायचे. अशा वेळी त्याला कुस्तीचा सराव कामी आला. ‘बाजी’च्या दरम्यान त्याने घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकून घेतली. ‘बाजी’ हा मावळा असल्याने रानावनातून सराईतपणे पळणे, घोड्यावरून दौड या गोष्टी आल्याच...तेही चपलांशिवाय... सुरुवातीला काटे, खिळे आणि काचाही लागल्या. त्यानंतर सतत टीटीचे इंजेक्शन आणि वेदनाशामक औषधांनी जखमा बर्‍या झाल्या. आता मात्र त्या वेदनांची सवय झाल्याचे आणि त्या जाणवतही नसल्याचे तो सांगतो. ‘बाजी’ साकारताना अंगमेहनतीवर विशेष लक्ष द्यावे लागले. बर्‍याचदा नवीन कलाकारांच्या पायांना खडे लागतात, त्रास होतो अशा तक्रारी असायच्या. सतत सहा महिने २४ तास चपलांशिवाय केलेल्या मेहनतीमुळे मला या सगळ्याची आता सवय झाल्याचे अभिजीत आवर्जून सांगतो.


अभिनयाव्यतिरिक्त अभिजीतला खेळांची आवड आहे. सायकलिंगमध्ये त्याने राज्यपातळीपर्यंतच्या स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक पटकावले आहे. याव्यतिरिक्त कबड्डीमध्येही त्याने अनेक बक्षिसे मिळवली आहेत.


अभिजीतच्या ‘श्वेतचंद्र’ या अनोख्या आडनावामागे ही कथा आहे. ‘अभिजीत श्वेतचंद्र’ हे नाव ऐकल्यानंतर बर्‍याच लोकांना तो नेमका कुठचा, आडनाव असे काय, हा प्रश्न पडतोच. हल्ली आईचे नाव लावण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे बर्‍याचदा त्याला विचारलेसुद्धा जाते. त्याचे खरे नाव अभिजीत भगत. अभिनयक्षेत्राकडे वळल्यानंतर त्याने आडनावाच्या जागी ‘श्वेतचंद्र’ लावायला सुरुवात केली. ‘’आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात. कष्ट करून आपल्याला वाढवतात. आज मी जो काही आहे ते त्यांच्यामुळेच! त्यांनी मला कुठल्याही गोष्टीसाठी आडकाठी केली नाही. हेच कर किंवा हे करूच नको, असं त्यांनी कधीच केलं नाही. नेहमी मला पाठिंबा दिला. पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात ते माझ्यासोबत होते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आई किंवा बाबांचं वेगळंवेगळं नाव लावण्याऐवजी दोन्ही नावं एकत्र करून लावतो,” असे अभिजीत सांगतो. त्याच्या आईचे नाव ‘श्वेता’ आणि बाबांचे नाव ‘चंद्रकांत’ यातूनच तयार झाले ‘श्वेतचंद्र’. स्वतःच्या नावात आई-बाबा दोघांचे नाव लावताना खूप आनंद होत असल्याचे तो सांगतो.


आपल्या बहारदार अभिनयाने आणि अनोख्या संवादफेकीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार्‍या अभिजीत श्वेतचंद्रला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा!!!
Powered By Sangraha 9.0