लाॅकडाऊनमुळे घरबसलेल्या पर्यावरणप्रेमींसाठी विशेष उपक्रम
मुंबई (प्रतिनिधी) - ऐरवी निसर्गात भटकणारे अनेक निसर्गप्रेमी, भटके, अभ्यासक सध्या लाॅकडाऊनमुळे चार भिंतींच्या आत कैद झाले आहेत. या निसर्गप्रेमींसाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) पर्यावरण विषयक विविध विषयांवरील आॅनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे. 'बीएनएचएस'च्या मुंबईतील 'निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्रा'ने या आॅनलाईन व्याख्यान मालिकेचे नियोजन केले आहे. याअंतर्गत सागरी परिसंस्थेपासून पक्षी, फुलपाखरे, उभयसृप अशा विषयांवर 'बीएनएचएस'च्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
निसर्ग संवर्धन आणि संशोधन क्षेत्रातील 'बीएनएचएस'ही ही जगातील अग्रणी संस्था आहे. या संस्थेला निसर्ग संवर्धन क्षेत्रात दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास लाभला आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे निसर्गात भटकण्याची आवड असणारे अनेक लोक घरीच अडकले आहेत. अशा निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींसाठी 'बीएनएचएस'ने आॅनलाईन व्याख्यांनाची मालिका सुरू केली आहे. याअंतर्गत गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी चतुर आणि टाचण्यांची ओळख करुन देणारे व्याख्यान पार पडेल. संस्थेच्या नेहा मुजूमदार पाल याविषयी मार्गदर्शन करतील. १७ एप्रिल रोजी संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ सागरी अभ्यासक डाॅ. दिपक आपटे यांचे सागरी जैवविविधतेचे संवर्धन याविषयावर व्याख्यान होईल. १८ एप्रिलला नेहा सिन्हा या पक्षी संवर्धनामधील आव्हान आणि यश याविषयी बोलतील.
२० एप्रिलला गिरीष जठार हे भारतातील घुबडांच्या प्रजातींविषयी मार्गदर्शन करतील. २२ एप्रिल रोजी डाॅ. राजू कसंबे हे फुलपाखरांचे अनोखे विश्व आपल्यासमोर उलगडतील. २४ एप्रिल रोजी बेडूक या उभयचरांची ओळख मृगांक प्रभू करुन देतील. तर २६ एप्रिल रोजी फुलपाखरु उद्यानाविषयी डाॅ. राजू कसंबे व्याख्यान देतील. वरील सर्व व्याख्याने ही सायंकाळी ७ ते ८ वाजण्यादरम्यान बीएनएचएसच्या इन्स्टाग्राम (https://instagram.com/bombaynaturalhistorysociety?igshid=u0c6vq3h9iil) आणि फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/groups/18423928338/) पार पडणार आहेत.