गोष्ट ब्रिटनच्या प्रिन्सने गौरविलेल्या बीडच्या उद्योजकाची

16 Apr 2020 21:43:36
sharad tandale_1 &nb


१२ सप्टेंबर २०१३. स्थळ- बकिंगहॅम पॅलेस. भारतावर ज्या इंग्रजांनी राज्य केलं, त्या इंग्रजांच्या राजमहालात तो बीडचा तरुण गौरवमूर्ती होता. अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजवाड्यातून राज्य केलं गेलं तो हा राजवाडा. १२६ देशांतल्या तरुणांमधून निवड होऊन या मराठमोळ्या मुलाला या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं होतं. थोड्याच वेळात इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स आले. ‘यंग आन्त्रप्रिन्युअर अ‍ॅवॉर्ड गोज टू मिस्टर शरद तांदळे फ्रॉम इंडिया.’ टाळ्यांच्या कडकडाटात भारताचं नाव दाही दिशा दुमदुमू लागलं. प्रिन्स चार्ल्सने शरद तांदळेंना गौरविले. हा गौरव खर्‍या अर्थाने १३० कोटी भारतीय जनतेचा होता. जगामध्ये सर्वांत जास्त संख्येने असलेल्या तरुणाईचा होता. निमित्त होतं प्रतिकूल परिस्थितीतून उद्योजक घडलेल्या ३२ वर्षीय शरद तांदळेंच्या उद्योजकीय प्रवासाचे.




सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक प्रतिकूलतेने नटलेला मराठवाडा. या मराठवाड्यातला बीड जिल्हा म्हणजे राजकारणाचं केंद्रबिंदू. याच भागातील वंजारवाडी म्हणजे एक खेडेगाव. उत्तमराव तांदळे आणि शोभा तांदळे हे शिक्षक दाम्पत्य म्हणजे नवीन पिढीला घडविणारे वंजारवाडीसाठी भूषणच. शरद त्यांचा मुलगा. बारावीला पठ्ठ्याने तब्बल ९२ टक्के मिळवले. पुढे काय करायचं माहीत नाही. कारण, मित्राने अकरावीला ‘विज्ञान’ विषय घेतला म्हणून हा इकडे आला. त्या काळात मराठी माणसांची गाडी दोनच रस्त्यांवर भरवेगात धावायची. एकतर वैद्यकीय आणि दुसरं म्हणजे अभियांत्रिकी. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. काहींनी सांगितलं, ‘मेकॅनिक’ विषयात खूप चांगला वाव आहे. पुढे भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळेल म्हणून पठ्ठ्याने ‘मेकॅनिकल’ विषय निवडला. तांत्रिक विषयात आपल्याला स्वारस्य नाही, हे कळेपर्यंत अर्ध इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं. आता घेतलंच तर पूर्ण करायचंच, या इराद्याने शरदने इंजिनिअरिंगचे शिक्षण एकदाचे पूर्ण केले.


पुण्यात इंजिनिअरिंग क्षेत्रात वाव आहे, हे कळल्यानंतर तो मित्रांसोबत पुण्याला नोकरीसाठी आला. एका कंपनीत पाच-सहा हजार रुपयांची नोकरी मिळाली. सहा महिने नोकरी केली. त्याचवेळी कोणीतरी सांगितलं, संगणक युग आहे म्हणून शरदने ‘सिस्टीम अ‍ॅप्लिकेशन प्रॉडक्ट’ अर्थात ‘सॅप’चा कोर्स केला. दरम्यान, एमबीएची प्रवेश परीक्षा पण दिली. त्याच्यात मात्र अपयश आलं. नोकरी नव्हती मिळत. करायचं काय, हा प्रश्न होता. समोर दोनच पर्याय होते. पहिला उद्योजक तर दुसरा राजकारण. या दोन्ही क्षेत्रात शिक्षणाची तेवढी गरज लागत नाही, असे शरदला वाटत होते. सर्वसाधारण सुशिक्षित तरुण विचार करतो, तसाच व्यवसायाचा विचार त्यानेसुद्धा केला. कमी मेहनत, जास्त पैसे आणि समाजात प्रतिष्ठा असे सारं मिळण्यासाठी दोन उद्योगधंदे त्याला सुचले. एक म्हणजे हॉटेल आणि दुसरं म्हणजे बीपीओ कंपनी. एवढ्या मोठ्या व्यवसायासाठी भांडवल लागणार. त्याने उत्तमरावांना सांगितले की, “उद्योगव्यवसाय करायचा आहे, पैसे द्या.” मात्र, उद्योगास पैसे देण्यासाठी उत्तमरावांनी स्पष्ट नकार दिला.


पण, हिंमत न हारता आपण आपल्या क्षेत्रातच असणारा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचा हे त्याने ठरवले. पुन्हा वडिलांकडे तो गेला. कोणता व्यवसाय करणार, हाच व्यवसाय का करायचा आहे? त्याचा काही अनुभव आहे का? कोणते कागदपत्र लागतात? कोणते परवाने लागतात? किती भांडवल लागतं? संबंधित व्यवसायाला बाजारपेठ आहे का? आपल्या शिक्षक असलेल्या पित्याच्या अस्सल व्यावसायिक प्रश्नांनी शरद भानावर आला. सगळेच प्रश्न रास्त होते. त्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. शरदने सगळी प्रेरणादायी पुस्तके वाचली होती. पण, त्यात उद्योग करण्यासाठी आवश्यक बाबींचा उल्लेख नव्हता, बाबांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. त्याने सभोवताली पाहिले. रिक्षावाला, टेम्पोवाला, प्लंबर, सुतार, एलआयसीवाला सगळेच व्यवसाय करत होते. सेवा देत होते. उद्योग म्हणजे कारखाना नव्हे, तर सेवा पुरविणे हासुद्धा व्यवसायच आहे, हे त्याला उमगले. त्याने काही उद्योजकीय मासिके वाचली. त्यातल्या काही उद्योजकांच्या यशोगाथा वाचल्या. त्यातून आपण कंत्राटदार व्हायचं हे ठरलं. पण कोणता, ते मात्र निश्चित नव्हतं. उद्योगात शिक्षणाची गरज नसते, हे त्याला आजूबाजूच्या लोकांना पाहून जाणवलं. एक- दोन इलेक्ट्रिकल कंत्राटदार हे चौथी आणि सातवी पास होते. पण, लाखांची उलाढाल करायचे, असं विचारचक्र सुरुच होतं.


याचवेळी एक इलेक्ट्रिक जोडणीचं काम मिळालं. त्यातून इलेक्ट्रिकची कामे मिळू लागली. याचदरम्यान एक छोटंसं टाकी बांधायचं काम मिळालं. १० हजार रुपयांच्या कामातून तीन-चार हजार रुपयांचा नफा मिळाला. एखाद्याच्या मासिक पगाराइतका पैसा निव्वळ दोन दिवस काम केलं तर मिळतो. उद्योगाची ताकद शरदला उमजली. त्याने मागे वळून पाहिलंच नाही. व्यावसायिक संबंध जोडले. काहीच वर्षांत महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ, सिंचन विभाग, लष्कर सारख्या महत्त्वाच्या विभागांची कामे मिळाली. गुणवत्तेच्या आधारावर दीडशेहून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. याचदरम्यान ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ अर्थात ‘बीवायएसटी’ या ‘सीआयआय’ संचालित संस्थेशी ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून एका बँकेने तांदळेंना १० लाखाचं व्यावसायिक कर्ज दिलं. त्याच्या जोरावर त्यांच्या कंपनीने जोरदार मुसंडी मारत व्यवसाय कैकपटीने वाढवला. आज तांदळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चारशेहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. याशिवाय त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार महाराष्ट्रभर घडवलेले आहेत. एक सॉफ्टवेअर कंपनी, प्रकाशन संस्था आणि कंत्राटदारांना प्रशिक्षण देणारी संस्था अशा संस्थासुद्धा ते चालवितात.


लंडनहून भारतात परतण्यासाठी जेव्हा ते विमानात बसले, तेव्हा सहज विचार त्यांच्या मनात आला की, भारतातलं पहिलं विमान कोणतं? सीतेचं अपहरण करताना रावणाने विमानाचा वापर केलेला आठवलं. घरी आल्यावर अनेक रामायाणाचे ग्रंथ वाचले तेव्हा जाणवले की रावणावर पुस्तकंच नाही. शरदरावांनी स्वभावाप्रमाणे स्वत:ला झोकून दिलं. तीन वर्षे सखोल संशोधन केले आणि त्यातून २०१८ साली आकारास आली रावणावरची पहिली कादंबरी ‘रावण- राजा राक्षसांचा.’ अवघ्या एका वर्षांत १५ हजारांहून अधिक प्रति विकल्या गेल्या. सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ते प्रसिद्ध झाले. लवकरच त्याची इंग्रजी आवृत्तीसुद्धा येत आहे. याच दरम्यान ‘मिटकॉन’ संस्थेच्या अधिकार्‍यांनी तांदळेंना उद्योगाविषयी इत्थंभूत माहिती देणारे पुस्तक लिहिण्याविषयी सुचविले. उद्योग करु इच्छिणार्‍यांसाठी आणि उद्योजकांसाठी आदर्शवत ठरेल असं ‘दी आन्त्रप्रिन्युअर’ नावाचं पुस्तक प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे.


“व्यावसायिक नाती निर्माण करा, ती जपा. समोरच्याला किती फायदा आहे, हे कळल्यावरच आपल्यासोबत व्यावसायिक मैत्री होते, जो जाण ठेवेल. भविष्यात मदत करेल अशा उद्योजकांसोबतच मैत्री केली जाते, स्वयंभू कोणीच नसतो. प्रत्येकजण कष्टाने वर आलेला असतो. कष्ट करा, नवीन मार्ग शोधा,” असे शरद तांदळे उद्योजकांना कानमंत्र देत महाराष्ट्रभर व्याख्यान देत असतात. बीड ते ब्रिटन असा प्रवास करणारे शरद तांदळे भारतीय तरुणांसाठी खरे आदर्श उद्योजक आहेत.


Powered By Sangraha 9.0