अरुणाचल प्रदेशातून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध !

16 Apr 2020 17:52:57
snake _1  H x W
 
 
 

'पाक्के व्याघ्र प्रकल्पाती'ल नव्या प्रजातीचा अधिवास धोक्यात

 
 
 
 मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील 'पाक्के व्याघ्र प्रकल्पा'मधून सापाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. पिट व्हायपर प्रजातीच्या या विषारी सापाचे नामकरण 'ट्रायमेरेसरस सलझार' असे करण्यात आले आहे. भारतात आढळणाऱ्या पिट व्हायपर सापांमधील ही १५ वी प्रजात आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रजातीचा शोध लागलेल्या 'पाक्के व्याघ्र प्रकल्पा'मधून रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित आल्याने या नव्या प्रजातीच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
 
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींमध्ये भर पडत आहे. याचे कारण म्हणजे उभयसृपशास्त्र संशोधनात काम करणारी तरुण संशोधकांची फळी देशात तयार झाली आहे. यामधील काही तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशमधून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. 'झुसिस्टीमॅटिक्स अॅण्ड इव्होल्यूशन' या संशोधनपत्रिकेत बुधवार या शोधाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. ही नवी प्रजात पिट व्हायपर सापांच्या 'ट्रायमेरेसरस' या पोटजातीमधील असून ती विषारी आहे. या सापाचे नामकरण हॅरी पाॅटर चित्रपटातील सलझार स्लीथेरिन या पात्राच्या नावावरुन 'ट्रायमेरेसरस सलझार' असे करण्यात आले. बंगळूरूमधील 'नॅशनल सेंटर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स' संस्थेचे झिशान मिर्झा, 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे हर्षल भोसले आणि मंदार सावंत, पुण्याच्या 'फर्ग्युसन महाविद्याल'यातील गौरांग गोंडवे आणि 'वाईल्डलाईफ इस्ट्रीट्यूट आॅफ इंडिया'चे पुष्कर फणसाळकर आणि हर्षिल पटेल या तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
 
 
 

snake_1  H x W: 
 
 
 
 
जून, २०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशात सुरू असलेल्या शोधकार्यादरम्यान 'पाक्के व्याघ्र प्रकल्पा'मध्ये या नव्या प्रजातीचे दोन नमुने आम्हाला आढळल्याची माहिती संशोधक हर्षल भोसले यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना दिली. या नमुन्यांची गुणसुत्र आणि आकारशास्त्राच्या आधारे केलेल्या तपासणीअंती ही प्रजात पिट व्हायपर सापांमधील नवी प्रजात असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजातीचे दात भारतात आढळणाऱ्या पिट व्हायपरच्या १४ प्रजातींपेक्षा वेगळे असल्याचे, भोसले म्हणाले. या संशोधनाकरिता शास्त्रज्ञांना 'ब्रीहद भारतीय समाज ट्रस्ट' आणि श्रीपाद हळबे यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
 
 
 
संशोधकांनी शोधून काढलेल्या या नव्या प्रजातीचा 'पाक्के व्याघ्र प्रकल्पा'मधील अधिवास धोक्यात आला आहे. कारण, या व्याघ्र प्रकल्पामधून ४९ किमीचा रस्ते प्रकल्प प्रस्तावित आहे. या भूभागामध्ये संशोधकांना अजूनही काही नव्या प्रजाती सापडल्या असून त्यावर शास्त्रीय काम सुरू आहे. मात्र, सध्या अरुणाचल प्रदेशातील या हरितक्षेत्रावर रस्ते रुंदीकरण,धरण, जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहेत. त्यामुळे येथील वन्यजीव प्रजाती संकाटात सापडणार आहेत. म्हणूनच वन्यजीव संरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने विकास प्रकल्प राबवताना उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0