जनमत निवडणुकांच्या माध्यमातून व्यक्त होत. येथे ‘जनमत’ याचा अर्थ जनतेचे सर्वसाधारण मत असा आहे. एका पक्षाचे शासन अधिकारावर येते. ते काम करू लागते. शासनाचे काही निर्णय-धोरणे सामान्य माणसांना पसंत पडत नाहीत. त्याविरुद्ध ‘जनमत’ तयार होते. हे मत मतपेटीच्या माध्यमातून प्रकट होते. कधी शासन राहते, कधी जाते.
जनमत कसं असतं, हे सांगणारी इसापची ही कथा अतिशय प्रसिद्ध आहे. एक शेतकरी आपले गाढव विकण्यासाठी बाजारात निघाला, त्याचा मुलगाही त्याच्याबरोबर होता. बाजारात जाणाऱ्या काही मुली त्याला भेटल्या. गाढव चालला आहे आणि बाप-लेक पायी चालत आहेत, हे पाहून त्या म्हणाल्या, “गाढवावर बसायचे सोडून चालत का निघालात?”
त्यांच बोलणं ऐकून शेतकऱ्याने मुलाला गाढवावर बसविले आणि तो पायी चालू लागला. थोडे अंतर चालून गेल्यावर काही म्हातारे त्याला भेटले. ते म्हणाले, “अरे तू पायी चालतो आहेस आणि मुलाला मात्र गाढवावर बसविले आहे. मुलगा तर धडधाकट आहे. तू आता वयस्क झाला आहेस. मुलाला पायी चालू दे आणि तू गाढवावर बस, मुलांचे फार लाड करु नयेत, नाही तर ती बिघडतात.”
त्या शेतकऱ्याला त्यांचे म्हणणे पटले. त्याने मुलाला गाढवावरून उतरविले आणि स्वत: गाढवावर बसला. असेच काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला काही स्त्रिया भेटल्या. त्या म्हणाल्या, “हा म्हातारा स्वत:चेच सुख पाहतोय. मुलगा पायी चालत चालला आहे, स्वत: मात्र आरामात गाढवावर बसला आहे.”
हे ऐकून शेतकऱ्याने मुलालाही गाढवावर आपल्यापुढे बसविले. असेच काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला काही व्यापारी भेटले. त्यातील एकाने शेतकऱ्याला विचारले, “हे गाढव घेऊन कुठे निघालात?” शेतकरी म्हणाला, ”बाजारात गाढवाला विकायला जात आहे.” व्यापारी म्हणाला, “एका गाढवावर दोघांचा भार पडला आहे, अशाने गाढव खूप दमून गेले आहे, मरणाला टेकले आहे. बाजारात त्यांची किंमत कमी होईल. खरं सांगायचे तर आता गाढवालाच उचलून तुम्ही न्यायला पाहिजे.”
शेतकऱ्याला त्यांचे हे म्हणणे योग्य वाटले. त्याने एक बांबू घेतला. गाढवाचे पुढचे आणि मागचे पाय बांधून त्याने त्याला बांबूवर उलटे टाकले. बाप-लेक गाढवाचे ओझे उचलून चालू लागले. हे विचित्र दृश्य बघून लोकांना हसू आले. मुलांचा घोळका त्यांच्या मागे लागला.
मुलांचा मोठा आवाज ऐकून ते गाढव बिथरले. उलट्या टांगलेल्या गाढवाची मिरवणूक नदीच्या एका पुलावर आली. तेथील आवाजाने आणि उलटे टांगले गेल्यामुळे गाढव घाबरले. त्याने जोरजोराने आपले पाय हलविण्यास सुरुवात केली. त्यामुळे पायाला बांधलेली दोरी निसटली. बांबूवरुन गाढव सरळ नदीत पडले आणि मेले.
शेतकरी खाली मान घालून घरी निघाला. लोकांना खूश करण्यासाठी तो त्यांचं ऐकत गेला. त्याचा परिणाम एवढाच झाला की, त्याचे गाढव गेले. उपदेश करणाऱ्याचे काहीच गेले नाही.
जनमत असं असतं. जितके लोक तितकी तोंडे. कोणी काय बोलेल याचा कसलाही धरबंद नसतो. प्रत्येक जण त्याला जे योग्य वाटेल ते सांगत असतो. उलटसुलट विचार ऐकायला मिळतात. प्रत्येकाचे ऐकून तसे वागायचे ठरविल्यास त्याचा शेतकरी आणि गाढव होतो.
जनमत कसं असतं, यावर सुंदर प्रकाश संत तुकाराम महाराजांनी टाकला आहे. दहा चरणातील त्यांच्या अंभगातील काही चरणे आपण पाहूया. संत तुकाराम महाराज म्हणतात,
संसार करिता म्हणती हा दोषी
टाकिता आळसी पोटपोसा
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी
येरा अभाग्यासी ज्ञान नाही
धन नाही त्यासी ठायीचा करंटा
समर्थासी ताठा लाविताती
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ
न बोलता सकळ म्हणे गर्वी
लग्न करु जाता म्हणती हा मातला
न करिता जाला नपुंसक
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ
पातकाचे मूळ पोरवडा
जनमतावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या या ओव्या आहेत. जो कमी बोलतो त्याला ‘गर्विष्ठ’ समजतात आणि जो जास्त बोलतो, त्याला ‘वाचाळ’ म्हणतात. मूल नसेल त्याला दोष देतात आणि खूप मुले असतील त्याला ‘पातकाचा पोरवडा’ असे म्हणतात. यासाठी लोकांच्या अशा बोलण्याकडे शहाण्या माणसाने अजिबात लक्ष देता नये.
असे असले तरी प्रजासत्ताक राजवटीत जनमत काय आहे, याचा अंदाज राज्यकर्त्यांना सतत घ्यावाच लागतो. हे जनमत निवडणुकांच्या माध्यमातून व्यक्त होत. येथे ‘जनमत’ याचा अर्थ जनतेचे सर्वसाधारण मत असा आहे. एका पक्षाचे शासन अधिकारावर येते. ते काम करू लागते. शासनाचे काही निर्णय-धोरणे सामान्य माणसांना पसंत पडत नाहीत. त्याविरुद्ध ‘जनमत’ तयार होते. हे मत मतपेटीच्या माध्यमातून प्रकट होते. कधी शासन राहते, कधी जाते.
जनमत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते. आपल्या देशाची जनसंख्या १३० कोटी आहे. सर्वेक्षण करणारी कोणतीही संस्था १३० कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून प्रातिनिधिक (सॅम्पल) सर्व्हे केले जातात. त्यावरून अंदाज बांधले जातात. बहुतेक वेळा ते फसतात. एका माणसाचे मत, समुदायाचे मत बनू शकत नाही. कारण, प्रत्येक माणूस वेगळा माणूस असतो.
वर्तमानपत्रांना जनमताचा आरसा असे मानतात. पण हेदेखील खरे नाही. आजची वर्तमानपत्र भूमिकानिष्ठ वर्तमानपत्र झालेली आहेत. त्यांच्या भूमिका ठरलेल्या असतात. म्हणून साध्या बातम्या देतानाही त्यात आपल्या भूमिकांचा मालमसाला ते भरतात. वर्तमानपत्रांची विश्वासार्हता नेहमीच प्रश्नांकित असते.
जनमत कशाच्या आधारावर घडते? न्याय-अन्याय, धर्म-अधर्म, सत्य-असत्य, जनमत घडविणाऱ्या मोठ्या शक्ती आहेत. अमेरिकन गृहयुद्धात गुलामगिरी विरुद्ध जनमत तयार करण्याचे काम बीचर स्टोव्हे या अमेरिकन लेखिकेच्या ’अंकल टॉम्स केबिन’ या कादंबरीने केले. निग्रो गुलामाच्या कुटुंबाची करुण कहाणी सांगणारी ही कादंबरी आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात थॉमस पेन यांच्या ’कॉमन सेन्स’ या छोट्या पुस्तिकेने जनमत घडविण्याचे महान कार्य केले. भारतात ‘वंदे मातरम्’ या गीताने देशभक्तीची ज्वाला निर्माण केली. एखाद्या प्रामाणिक आणि समर्पित नेत्याविरुद्ध सतत अपप्रचार केल्यास त्याचा उलटा परिणाम होतो. जसा २०१४ साली मोदींच्या बाबतीत झाला.
शेवटी इसापच्या कथेकडे येऊया. इसापच्या कथेत शेतकऱ्याला सांगणारी माणसे प्रामाणिक होती. पण, नेहमी अशी प्रामाणिक माणसेच भेटतील, असे नाही. एका ब्राह्मणाला दानात एक बकरी मिळाली. ती लहान असल्याने दोन्ही खांद्यावर घेऊन तो निघाला.
तीन ठग त्याला पाहतात. त्याची बकरी पळविण्याची योजना करतात. एक ठग वेषांतर करून ब्राह्मणाकडे येतो. ब्राह्मणाला वंदन करून तो म्हणतो, “भूदेव, असे आपण अपवित्र काम का करता? आपल्या खांद्यावर कुत्र्याचे पिल्लू कशाला?” ब्राह्मण म्हणतो,“हे कुत्र्याचे पिल्लू नाही, हे तुला दिसत नाही का, ही बकरी आहे.” तो ठग ब्राह्मणाला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करतो की, ज्याला तुम्ही बकरी म्हणता ती बकरी नसून कुत्राच आहे.
आणखी थोडे पुढे गेल्यावर दुसरा ठग येतो आणि खांद्यावर कुत्रे का घेऊन जाता असे विचारतो. नंतर तिसरा येतो आणि तेच विचारतो. असे पाच वेळा घडल्यानंतर ब्राह्मणाच्या मनात संदेह निर्माण होतो. बहुमत बकरी नसून कुत्राच आहे असे होते. त्याला वाटते की, आपल्या खांद्यावर बकरी नसून कुत्रा आहे आणि बकरी सोडून देतो. बकरीला कुत्रा ठरविणारे ठग समाजात खूप असतात. काही खूप विद्वान असतात, काही पत्रपंडित असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावे. ऐकावे सर्वांचे आणि हिताचे व सत्याचे ग्रहण करावे. इसापचा शेतकरी होऊ नये आणि लोककथेतील ब्राह्मणही होऊ नये.