वाढदिवसाला रक्तदान करण्यासाठी केला ३० किमी प्रवास

14 Apr 2020 15:12:35
Prashant Mhatre_1 &n
 
 


मुंबई
: लॉकडाऊनच्या काळात वाढदिवस साजरा न करता आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असेल. मात्र, प्रशांत म्हात्रे यांनी १३ एप्रिल रोजी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. संचारबंदीतही चारकोप-बोरिवली-मालाड, असा ३० किमी प्रवास करत त्यांनी सोमवारी रक्तदान केले. इतरांनीही या प्रमाणे आदर्श घेत सुरक्षितता बाळगून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी 'महाएमटीबी'च्या माध्यमातून केले आहे.

 
जीवनदाता संस्थेचे प्रमुख असलेले प्रशांत म्हात्रे यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यंदाच्या वर्षीही १३ एप्रिल रोजी संस्थेतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र, रक्तपेढीत रक्ताचा पुरेसा साठा असल्याने हे शिबीर सामाजिक अंतराच्या कारणास्तव रद्द करावे लागले. मात्र, प्रशांत यांनी या दिवशी रक्तदानाच्या मोहिमेत यंदाच्या वर्षी खंड पडू न देण्याचा निर्धार केला. पश्चिम उपनगरांतील इतर रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे एकही वाहन तिथे जाण्यासाठी उपलब्ध झाले नाही.
 
 
 
प्रशांत यांनी आपली सायकल बाहेर काढली आणि थेट कांदिवलीतील चारकोपहून नऊ किमी दूर असलेल्या बोरिवली येथील रक्तपेढीकडे कूच केली. मात्र, इथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी १३ किमी दूर असलेल्या मालाडच्या रक्तपेढीत जाण्याचे ठरवले. मालाड येथील हायटेक रक्तपेढीत त्यांनी ८५ वे रक्तदान केले आणि पुन्हा घरी परतताना आठ किमी सायकलने असा प्रवास केला.
 


पोलीसांनीही केले अभिनंदन


बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांकडून तीन ठिकाणी त्यांना अडवण्यात आले होते. मात्र, रक्तदानाचे ध्येय समोर असलेल्या प्रशांत यांनी परिस्थिती समजावून सांगितली. त्यांचे अभिनंदन करत पाण्याची बाटलीही दिली.
 
 
 


सर्व नियम पाळून रक्तदान करा ! 

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आपण स्वतःहून पुढे येत सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असे आवाहन प्रशांत म्हात्रे यांनी 'महाएमटीबी'शी बोलताना केले.




Certificate of Blood Dona
Powered By Sangraha 9.0