ड्रॅगनची शंकास्पद वळवळ!

01 Apr 2020 21:01:38

XI_1  H x W: 0

 


कोरोना... कोरोना आणि कोरोना... जगात जाल तिथे कोरोनाचे वैश्विक संकट ‘आ’ वासून उभे आहे. ज्या काळात जगाने अस्तित्वाची लढाई सुरू केली, त्या काळात चीन मात्र युद्धसराव करण्यात धन्यता मानत आहे. चिनी सैनिकांच्या युद्धसरावाने शेजारील राष्ट्रांना धडकी भरणे, साहजिक आहे. त्यामुळे कोरोनाशी लढायचे की युद्धसज्जतेसाठी सैन्य उभे करायचे, अशी द्विधा मनस्थिती या राष्ट्रांची आहे.

 

ज्या काळात जगाला आधाराची गरज आहे, तिथे असले उद्योग करून शौर्य सिद्ध करणे हे मर्दुमकीचे लक्षण मुळीच नाही. चीन आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांतील तणाव सारं काही सांगून जातो. चीनच्या उत्तर पूर्व भागात युद्धसराव सुरू आहे. त्यामुळे जपानने लगेचच क्षेपणास्त्रांसह ३४० सैनिक तैनात केले. चीनने या भागात लढाऊ विमाने पाठवली आहेत. कोरोनाच्या आपत्तीचा फायदा घेत चीन हल्ला करेल, अशी भीतीही या लगतच्या देशांना आहे.

 

दि. १७ मार्च रोजी चीनने युद्धसराव सुरू केला आणि २५ मार्चपर्यंत हा प्रकार सुरूच राहिला. याचे वृत्तांकन चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने दि. २९ मार्च रोजी केले. तोपर्यंत याबद्दल कुठलीही वाच्यता केली गेली नाही. चीनचे लष्कर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ७८व्या तुकडीने हा युद्धसराव केला. समोर येईल त्याला उडवणे हेच ध्येय ठेवून शत्रूला झुकवण्यासाठी वाट्टेल तितकी ताकद लावण्याची ती तयारी होती. चिनी रणगाडे समोरचे लक्ष्य अचूक भेदतात. शत्रूला उद्ध्वस्त करतात, रणगाड्यांचा ताफा ‘नॉर्दन कमांड’मध्ये येतो आणि चीन आणि तैवानच्या सुरक्षाव्यवस्थेचा वेध घेतो आणि परततो.
 
 

साहजिकच इतक्या प्रकारानंतर शेजारील राष्ट्राने गाफील राहणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनकच ठरेल. दुसर्‍या दिवशी तैवानही युद्धसरावाला सुरुवात करतो. या देशाच्या रस्त्यांवर रणगाडे धावतानाची दुर्मीळ दृश्ये तिथल्या प्रसारमाध्यमांवर झळकतात. जपानसारखा देशही यानंतर सतर्क होतो. युद्धनौका उद्ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे तैनात करतो. सोबतच सैनिकांच्या तुकड्याही सज्ज होतात. वादग्रस्त चीन सागरात सेनकाकू व दिआओयू बेटाच्या समूहातही क्षेपणास्त्रे तैनात केली जात आहेत.

 

याउलट जगातील परिस्थिती पाहू...१७ ते २९ मार्च या काळात सर्व देश कोरोनाशी लढत आहेत. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’, ‘कर्फ्यू’ घोषित करण्यात आले आहेत. जगाने सीमा, धर्म, वर्णभेद विसरून एकमेकांना मदत सुरू केली. ‘लॉकडाऊन’मुळे उद्भवणार्‍या आर्थिक मंदीवर चर्चा केली जाऊ लागली, तर इटली, अमेरिका, स्पेनसारख्या देशांतून कोरोना मृतांच्या आकडेवारीचा आलेख हा वाढतच होता. भारतातली परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत काहीशी बरी म्हणता येईल, अशी होती. मात्र, इथेही युद्धपातळीवर उपाययोजना सुरू होत्या, अजूनही सुरूच आहेत. मात्र, ज्या ठिकाणाहून या रोगाचा प्रचार-प्रसार झाला, तो चीन मात्र युद्धसरावात व्यस्त होता. हे प्रकरण बरेच काही सांगून जाते. कोरोनाचे संकट टळल्यावर यावर विस्तृत चर्चा होईल का? ‘आम्ही त्या गावचेच नाही,’ असे दाखवणारा चीन वठणीवर येईल का? याचे उत्तर येणारा काळच ठरवेल. पण, चीनच्या या करामतींची आठवण जगाच्या इतिहासात कायम नोंदवली जाईल, हे मात्र तितकेच खरे.

 

चीनने याहून दुसरी दिशाभूल केली ती म्हणजे कोरोनाबद्दल... चीन म्हणतो आमच्याकडे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, चीनने मृतांची आकडेवारी लपवली, असेही सांगण्यात आले. ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा वुहानच्या स्थानिकांनी विदेशी प्रसिद्धीमाध्यमांना केला. मात्र, चीन सरकार मृतांची संख्या ही ३५०० असल्याचेच सांगत राहिला. एकाच महिन्यात २८ हजार लोकांवर अंत्यसंस्कार केल्याचा दावाही स्थानिकांनी केला. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया २४ तास सुरू आहे. चीनने ही दिशाभूल करण्यामागचे कारण ते काय?

 

वास्तविक पाहता जबाबदारी घेऊन कोरोनाशी लढाईत जगाचे नेतृत्व चीनने करणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मदत मार्गदर्शन सोडाच, कोरोनाबद्दल इतर राष्ट्रांशी चर्चा करण्याचीही तसदी घेतली नाही. शंकेची पाल तेव्हा जास्त चुकचुकली की, चीनने नेदरलँडला सहा लाख खराब झालेले मास्क विकले. यामुळे नेदरलँडची परिस्थिती आणखी चिंताजनक बनली. स्पेनलाही निकामी किट देऊ केले. तिथल्या कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना या किटद्वारे केलेल्या चाचणीत ‘निगेटिव्ह’ अहवाल दिला आहे. चीन या सगळ्यातून काय साध्य करू इच्छित आहे? जगाला संपवून स्वतःला मजबूत करण्याची ही कुठली स्पर्धा आहे? व्यापारयुद्धाचा सूड उगवण्यासाठी पुकारलेले हे जैविक युद्ध तर नाही ना?




Powered By Sangraha 9.0