येस बँक प्रकरणी राणा कपूर यांच्या कुटुंबियांची चौकशी होणार

09 Mar 2020 11:43:05
yes bank _1  H





मुंबई :
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने राणा यांच्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळवला आहे. राणा यांची पत्नी बिंदूसह, त्यांच्या मुलीची रविवारी रात्री सुमारे दोन तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.


येस बँकेचे संस्थापक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ३० तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रविवारी पहाटे अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता ११ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी रात्री ईडीने राणा यांची पत्नी व मुलीला चौकशीसाठी बोलावले होते. रात्री १० वाजता या दोघी ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर पुढचे दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली व त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


दरम्यान, येस बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर राणा कपूर व त्यांचे कुटुंबीय गोत्यात आले असतानाच, राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर रविवारी विदेशात जाण्याच्या तयारीत होती. मात्र तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. ब्रिटिश एअरवेजने ती लंडनला जाणार होती. त्याआधी ईडीने राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर व राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर या तीन मुलींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यापैकी कुणीही परवानगीशिवाय आता देशाबाहेर जाऊ शकणार नाही.

Powered By Sangraha 9.0