हवा बदलते आहे...

26 Mar 2020 19:27:56

air pollution_1 &nbs




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावे लागलेले ‘लॉकडाऊन’ व त्याचा अखिल मानवजातीला भोगावा लागणारा परिणाम याची गणतीच होऊ शकत नाही. तरीही अशा निराशामय वातावरणात आलेली ’वातावरणशुद्धी’ची हीच काय ती सकारात्मक बातमी.


कोरोनाच्या महामारीमुळे जगात शिथिलता आली आहे. दररोज कोरोनाबाधितांचे नवे आकडे आपण ऐकत आहोत. जगभरातील अनेक देशांनी संपूर्ण ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वातावरणात एकप्रकारची अनिश्चितता, भय आहे. सगळ्या जगाला चिंतेने ग्रासले आहे. अशा पार्श्वभूमीवर थोडासा दिलासा देणारी बातमी कानावर पडली. माहितीच्या नावाखाली चालवलेल्या भयबाजारात हीच एकमेव कानाला सुखद वाटणारी बातमी. तिच्याही सत्यासत्यतेवर चर्चा सुरू आहे. मात्र, अल्प प्रमाणात तरी संबंधित बातमीत तथ्य आहे, हे नक्की.


कोरोनाच्या अनुषंगाने झालेल्या ‘लॉकडाऊन’मार्फत प्रत्यक्ष पृथ्वीभोवतालच्या वातावरणात सुधारणा झाल्याचे दिसून आले. रस्त्यावरील वाहने, दळणवळण कमी झाल्याने कार्बन उत्सर्जन घटून हवा शुद्ध झाल्याची लक्षणे दिसत आहेत. युरोपियन अंतराळ संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार चीन, इटली, ब्रिटन या देशातील हवेच्या पातळीत आरोग्यदायी बदल होत आहेत. नायट्रोजन डायऑक्साईड या हानिकारक वायूचे प्रमाण कमी होत असल्याचे युरोपियन अंतराळ संस्थेचे म्हणणे आहे. ‘नासा’ या संशोधन संस्थेने असाच दावा केला आहे. मात्र, विविध तज्ज्ञ, संशोधक यांच्या आकडेवारीत बदल दिसून येतात. युरोपियन अंतराळ संस्थेच्या म्हणण्यानुसार, जगभरातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रमाणात २०-३० टक्क्यांनी घट झाली आहे. कोलंबिया विद्यापीठातील प्रोफेसर रॉइसिन कॉम्माने यांनी न्यूयॉर्क शहरातील हवेत कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात ५-१० टक्के कमी असल्याचे म्हटले आहे. हवामानात असाच बदल जागतिक मंदीच्या दरम्यानही झाला होता. विनाकारण केलेला प्रवास, मालवाहतूक ही वायूप्रदूषणाची पातळी वाढवण्यामागील काही कारणे आहेत. कोरोनाने घडवून आणलेल्या ‘लॉकडाऊन’ने प्रवास, वाहनांच्या संख्येत एका चुटकीसरशी कमी आणली आहे. ज्याचा परिणाम एकूण हवामानावर होतो आहे. वुहान शहरावरील हवेत तर नायट्रोजन ऑक्साईड या वायूच्या प्रमाणात लक्षणीय बदल झाले आहेत.


वायुप्रदूषणाचा थेट परिणाम हा ओझोन थरावर होत असतो. ‘लॉकडाऊन’मुळे आटोक्यात आलेले वायुप्रदूषण जागतिक तापमानवाढीवर परिणाम साधणार का, याविषयी संशोधकांनी कोणतेही अनुमान मांडलेले नाही. वाहतूक व दळणवळण पूर्णतः नियंत्रित झाले आहे. वाहनांची संख्या कमी राहणे, इंधनबचत, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण असे अनेक फायदे त्यामुळे होतील. भारताच्या बाबतीत अजून कोणताही अधिकृत आकडा पुढे आलेला नाही. चीन, अमेरिका यांची उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यात विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वायुची घनता दाखवली आहे. भारताच्या हवेत असा कोणताही बदल झाल्याची नोंद अद्याप घेतली गेलेली नाही.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावे लागलेले ‘लॉकडाऊन’ व त्याचा अखिल मानवजातीला भोगावा लागणारा परिणाम याची गणतीच होऊ शकत नाही. तरीही अशा निराशामय वातावरणात आलेली ’वातावरणशुद्धी’ची हीच काय ती सकारात्मक बातमी. प्रत्यक्षात कोरोनामुळे जितके नुकसान झाले व होते आहे ते अपरिमित असेल. ते नुकसान भरून निघणारे नाही. कोरोनाची हवा व प्रत्यक्ष हवेवरील त्याचा परिणाम याची योग्य सांगड घालायला हवी. जशी प्रत्यक्ष वातावरणातील हवा बदलते आहे, त्याच प्रमाणात ती वेगळ्या अर्थानेही बदलली आहे. त्याचे गंभीर परिणाम जनजीवनावर व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, फक्त कोरोनाचीच हवा वाहत राहिली, तर त्या सगळ्याच विषयांकडे दुर्लक्ष व्हायला नको. हवेवरील बातम्या व बातम्यांची हवा सतत नकारात्मकतेच्या दिशेने वाहत राहायला नको. त्याऐवजी भविष्यातील प्रश्न कसे सुटतील, यावर भर द्यायला पाहिजे. ते प्रश्न काय असणार आहेत, याचा अंदाज डोळसपणे घ्यावा लागेल. त्याची जाणीव करून द्यावी लागेल. प्राथमिकतेच्या यादीत ते प्रश्न आणावे लागतील. तसे होताना दिसत नाही. त्याऐवजी हवेच्या दिशेने माहितीचा रोख दिसतो. हवा बदलते आहे, हे जसे पर्यावरणाच्या बाबतीत सकारात्मक ठरते. तसेच माहिती प्रवाहाची हवा प्रयत्नपूर्वक बदलणे, हे मानवजातीच्या दृष्टीने आशावादी ठरेल.



Powered By Sangraha 9.0