‘हंता’ विषाणूची चिंता

25 Mar 2020 20:00:45
HantaVirus_1  H
 
 
 
 
 

चीनने एका नव्या विषाणूमुळे तेथील एक जण दगावल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण जगाचे लक्ष या गोष्टीकडे वेधले गेले. आता नेमका काय आहे हा ‘हंता’ विषाणू? याचा प्रसारही कोरोनाप्रमाणे झाला, तर या दुहेरी संकटाला जग कसे सामोरे जाणार?

 

जगभरातील लोकांनी कोरोनाचा धसका घेतलेला असतानाच चीनने आता आणखी एका विषाणूला जन्म दिला आणि भल्याभल्यांची भंबेरी उडून गेली. गेले दोन दिवस चीनमध्ये पसरणार्‍या ‘हंता’ विषाणूची चिंता जागतिक आरोग्य संघटनेपासून ते इतर देशांमध्येही लागून राहिली आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग ’लॉकडाऊन’ झाले असून एक बंदीशाळा बनले आहे, चीनने या महामारीवर उपायही शोधला. एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आता तिथे शिल्लक नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चीनने जाहीर केले खरे. मात्र, अशातच चीनने एका नव्या विषाणूमुळे तेथील एक जण दगावल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण जगाचे लक्ष या गोष्टीकडे वेधले गेले. आता नेमका काय आहे हा ‘हंता’ विषाणू? याचा प्रसारही कोरोनाप्रमाणे झाला, तर या दुहेरी संकटाला जग कसे सामोरे जाणार?

 

चीनच्या युनान प्रांतात बसमधून प्रवास करतानाच एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाला. इतरवेळी हा मृत्यू झाला असता तर हे प्रकरण कदाचित प्रकाशझोतात आले नसते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित मृताची चाचणी करण्यात आली आणि कोरोनाच्या संकटातून सावरत असणार्‍या चीनला आणखी एक धक्का बसला. हंता विषाणू, ज्याची साथ वर्षभरापूर्वी येऊन गेली होती, त्याने पुन्हा डोके वर काढले असल्याचे चाचणीतील अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर याच बसमधील सहप्रवाशांची चाचणी करण्यात आली. मात्र, सुदैवाने कुणालाही या आजाराची लागण झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

 

जगभरातील नागरिकांनी, माध्यमांनी विविध समाजमाध्यमांतून या विषाणूसाठी पुन्हा चीनला धारेवर धरले. मात्र, चिंतेचे काही कारण नसल्याचे चीनने स्पष्ट केले. एका अहवालानुसार ‘हंता’ हा विषाणू उंदरांमुळे पसरतो. त्याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे होत नाही. याची लक्षणे मात्र उलट्या, ताप, सर्दी, अंगदुखी अशी कोरोनाशी साधर्म्य साधणारीच आहेत. मात्र, या विषाणूचे संक्रमण समजण्यासाठी दोन ते आठ आठवडे इतका कालावधी लागू शकतो. फुफ्फुसात पाणी होणे, व्यक्तीला अशक्तपणा येणे असा त्रास रुग्णाला होतो. दुसर्‍या टप्प्यातील लक्षणांमध्ये रक्तदाब आणि मूत्रपिंडाचाही आजार होऊ शकतो.

 

वर्षभरापूर्वी म्हणजे २०१९च्या जानेवारीत चीनमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील पर्यटकांना याबद्दल सूचना देत त्यांना त्या भागात फिरकण्यासाठी मज्जाव केला होता. या विषाणूचे एकूण ६० रुग्ण आढळले. पैकी ५० जणांना विलगीकरण कक्षात ठेवल्याचा अहवाल होता. या विषाणूचा मृत्यूदर हा ३८ टक्के होता. कोरोनाप्रमाणे याचीही विशिष्ट लस किंवा उपचारपद्धती उपलब्ध नाही. ‘हंता’ विषाणूचा धसका जगाने असा काही घेतला, जणूकाही आता आपला खेळ खल्लास! मात्र, प्रसारमाध्यमांनी याबद्दलचा खुलासा केल्यानंतर काहीशी चिंता मिटली, पण एक गोष्ट अंतर्मुख करून गेली की, कोरोनामुळे जगाचे कंबरडे मोडले असताना असा आणखी एक विषाणूचा दणका बसल्यास परिस्थिती किती हाताबाहेर जाऊ शकते?

 

विज्ञानवादी, एकविसाव्या शतकात संशोधन क्षेत्रात चंद्रसूर्याकडे झेप घेणारी मानव जमात मृत्यूलाही जिंकल्याची पैज लावते. अत्याधुनिक औषधोपचार आणि चिकित्सा पद्धतीतून मानवी आयुष्य किती सहज झाले, याच्या बढाया मारण्यात गुंग असते, त्यातच असा एखादा विषाणू अवघ्या मानव जातीला गिळून टाकू पाहतो. विज्ञानवादी आणि अत्याधुनिक यंत्रणेचे गोडवे गाणार्‍या याच मनुष्याकडे हतबल होऊन केवळ हा मृत्यूचा थयथयाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. कोरोनाच्या रूपात भौगोलिक सीमा, धर्म, गरीब-श्रीमंत, वर्णभेद या जाळ्यात गुंतवून स्वतःला धन्य मानणारा माणूस आज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थांबला आहे.

 

जगाला महामारीच्या संकटात ढकलणारा देश म्हणून चीनकडे यापुढे पाहिले जाईल. तिथला आहार विशेषतः मांसाहार एव्हाना अवघ्या जगाला कळून चुकला असेल. ‘हंता’ विषाणूची बाधा अशाच मांसाहारामुळे झाली असावी, अशी शक्यता आहे. तिथे उंदरांची संख्या ही कमी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. चीनसारख्या विकसित देशाची ही स्थिती असेल तर भारतात जिथे झोपडपट्ट्या, वस्त्या, नाल्यांची दुर्गंधी, विलगीकरण न केलेला कचरा, तुंबलेली गटारे आणि ती स्वच्छ करण्यासाठी त्यात उतरणारे कामगार या गोष्टी सुधारण्याची संधी किंवा इशारा निसर्गाने या विषाणू फैलावाच्या रूपात मनुष्याला दिला, असे समजूयात आणि या महामारीशी लढण्यासाठी सज्ज होऊयात...!




Powered By Sangraha 9.0