८०च्या दशकातील धडाकेबाज!

22 Mar 2020 21:21:47


jairam kulkarni_1 &n


ऐंशीच्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड गेले. आजच्या लेखातून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर एक नजर...


जयराम कुलकर्णी म्हटले की आठवतात ते विविध चित्रपटांत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची भूमिका साकारणारे नट. आपल्या अभिनयाने जयराम कुलकर्णी यांनी नव्वदीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी तर गाजवलीच, पण त्याचबरोबर त्याकाळात आपल्याला मिळालेल्या भूमिकेतून प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. मराठी चित्रपटांमधील हसतमुख अभिनेत्याचा चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. जयराम कुलकर्णी यांचे सुपुत्र रुचिर हे वकील असून, त्यांच्या सुनबाई अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजळगाव हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची गोडी लागली. शालेय जीवनात त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले, तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. पुढे स. प. महाविद्यालयात शिकत असताना नाटकाशी जुळलेला त्यांच्यातला कलाकार घडत गेला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.




१९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली. व्यंकटेश माडगूळकर यांचे साहाय्यक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला. आकाशवाणीवर माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन करण्याची महत्त्वाची जबाबदारी जयराम पार पाडायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे सारे काम जयराम यांनाच पाहावे लागे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहाय्यक पदाचा भार सांभाळत असल्याकारणाने कामाच्यानिमित्ताने जयराम यांचे प्रभात रस्त्यावरील ग. दि. माडगूळकरांच्या निवासस्थानी येणे-जाणे होत असे. ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात असतानाच जयराम यांची मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांशी ओळख झाली. जयराम यांची चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द काहीशी उशिराच, त्यांच्या चाळीशीत सुरू झाली. नाटकातील त्यांचे अभिनयकौशल्य बघून मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. चित्रपटांचे चित्रीकरण मुंबई तसेच कोल्हापूरला असे. त्यामुळे आकाशवाणीचे काम आणि चित्रीकरण हे दोन्हीही एकावेळेस करणे शक्य नसल्याकारणाने त्यांनी १९७०च्या सुमारास आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकला. यानंतर मात्र ते पूर्णवेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. आकाशवाणीत काम करत असतानाच त्यांचे अनेक अभिनेते, कलाकार यांच्याशी जवळचे संबंध आले. आकाशवाणीतील गावरान बोलीचा व नाटकातील ठसकेबाज भूमिकांच्या जोरावर चित्रपटात काम करतानाही त्यांचे समीकरण पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम असेच जुळले. सुरुवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु, नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी पोलीस अधिकारी, वडील यांसारख्या वेगवेगळ्या भूमिका आपल्या कसदार अभिनयाच्या शैलीतून अजरामर केल्या.




मराठी चित्रपटसृष्टीतील तो काळच मुळात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या चौकडीचा. जयराम कुलकर्णी यांची गट्टी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्याशी जमली. त्यामुळे त्यांच्या बहुतांशी चित्रपटांतून जयराम वेगवेगळ्या भूमिकांमधून लोकांसमोर आले. कधी इन्स्पेक्टर, कधी कमिशनर, कधी तात्या, कधी इनामदार. त्यातही पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेतील त्यांची रूपे सहजपणे डोळ्यासमोर तरळतात. ‘धूमधडाका’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट...’ अशा दीडशेहून अधिक मराठी चित्रपटांतून त्यांनी कामे केली. नव्वदीच्या दशकात मराठी चित्रपटांसाठी सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली ही चित्रपटांच्या यशाची परिमाणे होती. जयराम यांनी ज्या चित्रपटांमधून काम केले ते सर्व चित्रपट ‘हिट’ झाले. आपल्या सहज अभिनयाने त्यांनी चित्रपटांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांची उशिरानेच सुरू झालेली चित्रपट कारकिर्द मराठी चित्रपटसृष्टीच्या त्या बहरत्या काळाबरोबर अधिक बहरली. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. १७ मार्च, २०२० रोजी त्यांचे निधन झाले. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता ही ओळख त्यांनी कायम जपली. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीनेदेखील त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली. आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या अभिनेत्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली...!
Powered By Sangraha 9.0