देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना गेली काही वर्षे ‘आझादी’च्या नावे आंदोलन करणारी काही अपरिपक्व टाळकी पुढे येऊ लागली. मात्र, ज्या संविधानाने आपल्याला हा अधिकार, ज्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या जोरावर आपण इथवर पोहोचलो, याची थोडीशी जाणही मग अशांना राहत नाही. मग जेएनयुतील आंदोलन असो वा शाहीनबाग आंदोलन आणि प्रदर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला धिंगाणा म्हणजे काही तुमची कथित ‘आझादी’ असेल तर सौदी अरबच्या महिलांना खर्या अर्थाने मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दलचे मतही एकदा त्यांनी सांगायला हवे.
सौदी अरब... जगाच्या पटलावरील मध्य पूर्व आशियातला एक महत्त्वाचा मुस्लीम देश. इथले कायदे हे स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत कठोर. धार्मिक कट्टरता आणि महिलांवरील अनावश्यक निर्बंधांसाठी ओळखल्या जाणार्या या देशाने महिलांना वाहन चालवणे, खेळ आणि स्पर्धा पाहणे, पती किंवा वडिलांच्या परवानगीविना यात्रा करणे यांना आताकुठे मुभा देण्यात दिली आहे. या देशातील स्त्री आता केस मोकळे सोडून हिंडू बागडू शकते, पुरुषांसोबत मिळून-मिसळून राहू लागली आहे. मदिना, रियाध, जेद्दा या शहरांतील कॉफी शॉप, हॉटेलमध्ये ती नोकरी करू शकते. मात्र, यापूर्वी अशी स्थिती नव्हती मात्र, युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी उचललेली ही काही पावले आहेत.
मात्र, अद्याप सौदीत सारं काही आलबेल नाही. अजूनही या महिलांना आपल्या पतीची, वडिलांची किंवा भावाची परवानगी घ्यावीच लागते. इथल्या स्त्रीच्या इच्छेला फार महत्त्व नाहीच. मग ते लग्न असो वा कामाची संधी. सर्वकाही घरच्यांच्या मर्जीनेच. सध्याचे युवराज यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करतील, त्यांचे स्वागत. मात्र, जनमानसात अशा निर्णयांना रुजण्यास अजून काही अवकाश लागेल. मदिना येथील रागदा आणि रफा अबुजा यांनी एका कॉफी शॉपमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या प्रकारामुळे त्यांच्या घरच्यांनी आकांडतांडव सुरू केले.
लोक काय म्हणतील, असे अनेक प्रश्न दोघींना विचारले जाऊ लागले. या वृत्तीशी लढा देण्यासाठी या दोन्ही मुलींना दोन वर्षे लागली. आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. निर्बंध मात्र काही हटले नाहीत. घरच्यांनी परवानगी दिली, पण समाजाने अजूनही मोकळीक दिली नाही. दोघी काम करू लागल्या, मात्र चेहरा दाखवू शकतील इतकीच परवानगी त्यांनी मिळवली. केसांचा बुचडा हा कपड्यांमध्ये झाकून ठेवावा लागणार आहे. या दोन्ही मुलींचे आई-वडील आता या दुकानात येऊ लागले खरे, परंतु इथवर पोहोचण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष हा वाखाणण्याजोगा होता. रागदा आणि रफाच्या या संघर्षाची आणखीही एक कहाणी आहे. पूर्वी ज्या ऑफिसमध्ये त्या काम करायच्या, तिथेही महिलांना बसण्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.
बुरखा हिजाब घालण्याची सक्तीही होतीच. शहरात आता परिस्थिती बदलत आहे. अनेक स्त्रिया रोजगाराच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागल्या आहेत. त्यांना स्वतःचा मार्ग सापडू लागला आहेच. मात्र, गावाकडे आजही परिस्थिती तीच आहे. जुनाट रुढी परंपरांच्या नावाखाली त्यांच्या आवाजाची, हक्कांची पायमल्ली केली जात आहे. पुरुषांना आपल्या पत्नीने बाहेर पडून काम करावे, असे वाटते. अनेकांनी त्याप्रमाणे तिथल्या प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नावनोंदणीही केली आहे, परंतु विषय येतो तो समाजाचा...
‘लोग क्या कहेंगे’ हा प्रश्न आजही तिथल्या पुरुषांना पडतो. महिलांना दिलेले हे स्वातंत्र्य याच महिलांच्या परिजनांना खुपल्याचीही उदाहरणे आहेत. तिच्या उडणार्या पंखांना कात्री लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, हेही तितकेच खरे. पाकिस्तानात ज्यावेळी महिला दिनानिमित्त मोर्चा काढण्यात आला, त्या दिवशीही कट्टरवाद्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. ‘औरत मार्च’ विरोधात आवाज उठवून कट्टरवाद्यांनी स्वतःच्या नामर्दपणाचे दर्शनच जगाला घडवले. याउलट परिस्थिती भारतातली होती. जिथे स्त्रीला मातृवत आणि देवी मानणारी आपली संस्कृती. पण, आजही स्त्री अत्याचारांच्या ग्रहणातून आपण सुटलो, असा दावा थेट करता येणार नाही. मात्र, ‘दिशाहीनबागे’त ‘आझादी’च्या घोषणा देणार्या कथित ‘शेरनीं’ना या गोष्टींची जाणीव व्हायला हवी. मिळालेल्या स्वातंत्र्याचा कुणाच्या भडकवण्याने असा दुरुपयोग व्हायला नको, याची दक्षता घ्यायला नको का? ही ऊर्जा समाजासाठी काम करून सत्कारणी कशी लावता येईल, याचाही विचार करायला हवा.