शनिवार, दि. १४ मार्च रोजी नाथषष्ठी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने एकनाथ महाराजांच्या विचारमूल्यांचा घेतलेला हा धांदोळा...
एकनाथ महाराजांचा काळ इ. स. १५३३ ते १५९९ असा आहे. या ६६ वर्षांच्या काळात एकनाथांनी प्रचंड सामाजिक आणि वाड्.मयीन कार्य केले आहे. यादवांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर एकनाथकालीन समाजव्यवस्था भ्रष्ट झाली होती. तिचे समर्पक वर्णन वि. का. राजवाडे यांनी एका लेखात केले आहे. ते म्हणतात, "ब्राह्मण, क्षत्रिय धर्मभ्रष्ट झाले. ब्राह्मणांनी कारकुनी पत्करली. क्षत्रियांनी नांगर हाती धरला. वैश्य लढाया, लूटमार, दुष्काळ यांनी नागवला गेला. शूद्रातिशूद्र आपणहून मुसलमान झाले. देवळांच्या मशिदी झाल्या. पर्वत्यांचे पीर दर्गे झाले. काझी न्यायासनावर बसला. अग्निहोत्री पीरांचे मुजावर (पुजारी) झाले. सर्वत्र उलथापालथ होऊन धर्म लोपून गेला." सोळाव्या शतकातील एकनाथकालीन हिंदू धर्माची ही पडझड आहे. ही शिथिल धर्मनिष्ठा सावरून तिला पुनरुज्जीवित करण्याचे कार्य त्याकाळी दत्तसंप्रदायाने केले. परंतु, ते ब्राह्मण वर्गापुरते उपयोगी ठरले. इतर अज्ञ बहुजन समाज, जाखाई, जोखाई, मरिआई इत्यादी दैवते पूजत राहिले. अथवा ते कबरी, पीर, दर्गे यांचे भजन-पूजन करू लागले. एकनाथांचे गुरू जनार्दनस्वामी दत्तसंप्रदायी असल्याने तो वारसा नाथांकडे आला. परंतु, नाथांच्या स्वभावात कर्मठपणा नव्हता, तर त्यांच्या अंगी सौजन्य, प्रेमळपणा, शांती व एकंदर समन्वयाची भूमिका हे गुण होते. ते ओळखून गुरू जनार्दनस्वामींनी एकनाथांना ज्ञानेश्वरी अमृतानुभव यांचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यांनी नाथांना भागवत धर्मतत्त्वज्ञानाकडे वळवले. तत्कालीन धर्मतत्त्वे सर्वसामान्यांना न समजणाऱ्या संस्कृत भाषेत होती. ज्ञानेश्वरांनी ती सोप्या मराठी भाषेत मांडली. त्यांनी सुलभ आचाराच्या भक्तिमार्गाचा पुरस्कार केला. त्यामुळे नाथांच्या व्यक्तिमत्वात वारकरी संप्रदायाची समन्वयाची भूमिका, प्रेमळपणा, सौजन्य, दत्तसंप्रदायातील ज्ञानोपासना, आचारशुचित्व तसेच, पैठणच्या परंपरेतील ब्राह्मण बहुश्रुतपांडित्य, संस्कृतप्रचुरभाषा यांचा संगम पाहायला मिळतो. त्याकाळी अध्यात्म क्षेत्रात संस्कृतचा दुराग्रह होता. पंडितांचा तो चिवट भाषाभ्रम नाथांनी सौजन्याने दूर केला. नाथांनी, 'संस्कृत भाषा देवे केली। मराठी काय चोरे निर्मिली' असा परखड सवाल करून पैठण व काशीक्षेत्रातील पंडितांची कानउघडणी केली. एकनाथांनी मराठी भाषेतच वाड्.मयनिर्मिती केली. ज्ञानदेवांची 'ज्ञानेश्वरी','एकनाथी भागवत', तुकारामांची 'गाथा', आणि समर्थांचा 'दासबोध' हे चार ग्रंथ मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे. या ग्रंथांचा विसर म्हणजे महाराष्ट्राचे मरण.
नाथांनी लिहिलेला 'एकनाथी भागवत' (२० हजार ओव्या) हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या 'एकादश स्कंदा'वर लिहिलेली टीका आहे. एकनाथी भागवताचे पहिले पाच अध्याय त्यांनी पैठणला लिहिले आणि नंतरचे २६ अध्याय वाराणशी क्षेत्री राहून तेथे लिहिले. इ. स. १५७४च्या सुमारास हा ग्रंथ पूर्ण झाला. मराठी भाषेतील ग्रंथाला तीव्र आक्षेप घेणाऱ्या काशीच्या पंडितांनी ग्रंथसमाप्तीनंतर त्याची पालखीतून काशीक्षेत्री मिरवूणक काढली. मराठीच्या सामर्थ्याचा हा बहुमान तर होताच, पण मराठीला मिळालेले मोठे शिफारस पत्र होते. नाथांचे दुसरे वाड्.मयीन कर्तृत्व म्हणजे त्यांनी लिहिलेले 'भावार्थ रामायण' (ओवी संख्या ४० हजार) हा ग्रंथ पूर्ण होण्याअगोदर इ. स. १५९९ मध्ये नाथांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे शेवटच्या सुमारे १५ हजार ओव्या त्यांचा शिष्य गावबा याने नाथांच्या शैलीत लिहिल्या आहेत. हे रामायण मूळ 'वाल्मिकी रामायणा'च्या आधारे लिहिले असले तरी नाथ बहुश्रुत असल्याने इतर रामायणांचा व कथांचा आधार त्यांनी घेतला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थितींवर त्यात टिप्पणी आढळते. 'रामचरित्र' सांगण्यामागची नाथांची प्रमुख भूमिका म्हणजे सज्जनाचे रक्षण आणि दुष्टांचा नाश, त्यासाठी सशक्त प्रतिकार. त्यांची पुढील ओवी हेच सांगते.
निजधर्माचे रक्षण ।
करावया साधूंचे पाळण ॥
मारावया दृष्टजन ।
रघुनंदन अवतरला ॥
'भावार्थ रामायणा'तील ही भाषा तत्कालीन जुलमी मुसलमानी राज्यसत्तेबद्दल आहे, हे लक्षात येते. तथापि स्पष्टपणे बोलण्याचा तो काळ नव्हता. तशाही परिस्थितीत नाथ म्हणतात,
देवद्रोही देवकंटक ।
भूतद्रोही जीव घातक ॥
धर्मद्रोही दुःखदायक ।
यांसी अवश्य मारावे ॥
असे क्रांतिकारी विचार स्पष्टपणे राज्यसत्तेविरुद्ध बोलण्याचा काळ अजून यायचा होता. पण तो लवकरच येईल, असे नाथांच्या मनात कुठेतरी होते. नाथांच्या मनातील ही सुप्त इच्छा प्रत्यक्षात उतरायला नाथांच्या निधनानंतर ४७ वर्षे वाट पाहावी लागली. इ. स. १६४६ साली शिवाजी महाराजांनी परकीय जुलमी सत्तेच्या विरोधात बंड उभारून स्वराज्याचे तोरण बांधले व आदिलशाही राजवटीला पहिला तडाखा दिला. नंतर पुढे २५-३० वर्षांमध्ये दक्षिणेकडील मुसलमानी सत्ता खिळखिळी करून उत्तरेकडील मुघल आक्रमणांना टक्कर दिली व थोपावले. रामकथा लोकांसमोर ठेवताना नाथांचा हेतू राष्ट्रीय होता. चतुरस्त्र रामचरित्राचे रहस्य लंकेच्या तुरुंगातील देवांच्या मुक्तीत आहे, असे नाथांना वाटते. ते म्हणतात,
राये रक्षावे गोब्राह्मण ।
करावे दुष्टांचे निर्दाकण ॥
परिपालन साधुंचे ।
संरक्षावे गोब्राह्मण ॥
रामायणातील या शब्दांनी नाथांच्या मनातील राष्ट्रीय ध्येयकार्य स्पष्ट होते. छ. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व या संस्कारांनी उभारले असणार. कारण, ते 'गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्याग, तपस्या, राष्ट्रीय भावना, स्वामिनिष्ठा, धर्मनिष्ठा या अलौकिक गुणांची ओळख महाराष्ट्राला एकनाथांच्या 'भावार्थ रामायणा'ने झाली असे म्हणायला हरकत नाही. जुलमी राज्यसत्तेच्या विनाशार्थ नाथांनी जी भाषा या भूमीत रुजवली, तिची फळे पुढे रामदासस्वामी व शिवाजी महाराज यांच्या रुपाने महाराष्ट्राने पाहिली. 'भावार्थ रामायणा'त नाथांच्या सामाजिक विचारांचेही प्रतिबिंब दिसते. सीतास्वयंवर आटपून राम अयोध्येला आला, तेव्हा सारी अयोध्यानगरी त्याला पाहायला गेली. पण, सोवळ्या-ओवळ्याच्या भ्रांत कल्पनेत अडकलेले काही ब्राह्मण गेले नाहीत. त्या प्रसंगी एका वेश्येच्या तोंडून त्यांनी ब्राह्मणांचा उपहास केला आहे. ती वेश्या म्हणते, "अरेरे! हे ब्राह्मण कर्मठपणापायी भक्तीस व परमार्थास मुकले." हा प्रसंग रामायणात मांडताना नाथांना समाजसुधारणेचे भान होते हे स्पष्टपणे दिसते.
नाथांच्या व्यक्तिमत्त्वात भूतदया, शुद्ध आचार, चारित्र्य, भक्ती, अज्ञानी जीवांविषयी कळकळ हे गुण पाहायला मिळतात. त्यांच्या वाड्यात कीर्तन-प्रवचन ऐकण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेश होता. परंतु, नाथांचा मुलगा हरिपंडित याला ते आवडत नसे. त्याचा विरोध मोडून नाथांनी त्याचा कर्मठपणा घालवला व त्याला सामाजिक जाणिवेची समज दिली. समाजातील अगदी खालच्या थराशी एकरूप होऊन नाथांनी त्यांच्या भाषेत अध्यात्मज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यांच्या चालीरीतीत दैवतात फरक न करता आत्मबोध करणारी भारुडे नाथांनी रचली. नाथांनी १२५ विषयांवर सुमारे ३०० भारुडे लिहिली. नाथांच्या रचनेतील भारुडांची ध्रुपदे आजही लोकप्रिय आहेत, लोकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. 'दार उघड बये दार उघड', 'दादला नको गं बाई', 'विंचू चावला' इ. भारुडांच्याद्वारा एकनाथांनी खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत अध्यात्म त्यांच्या भाषेत पोहोचवले. एकनाथ भूतदयावादी, समन्वयवादी संत होते. तसेच ते आदर्श समाजसुधारक होते. पैठणच्या रणरणत्या उन्हात पाय पोळल्याने रडणाऱ्या महाराच्या मुलाला त्यांनी उचलून कडेवर घेतले व स्वतः त्याच्या घरी त्याला नेऊन सोडले. ही घटना ४०० वर्षांपूर्वीची आहे, याची जाणीव ठेवून या प्रसंगाकडे पाहावे. म्हणजे त्यातील गांभीर्य व नाथांच्या स्वभावाची कल्पना येईल. नाथ समन्वयवादी, उदारमतवादाचे जनक व शांतीब्रह्म होते. तसेच आदर्श समाजसुधारकही होते. नाथांच्या सर्व क्षेत्रातील कार्याची ओळख करून घेणे हीच नाथषष्ठीची खरी श्रद्धांजली!
- सुरेश जाखडी