भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल या हॉकीपटूने जगप्रसिद्ध 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला आहे. जाणून घेऊया तिचा संघर्षमयी प्रवास...
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उताराची मालिका सुरू असते. जगामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी संकटांवर मात करत लोकांसमोर स्वतःचा एका आदर्श ठेवला आहे. या लोकांचा संघर्ष वाचल्यावर नेहमी असे वाटते की जगात अशक्य असे काही नाही. असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी शून्यापासून जग निर्माण केले आहे. छोट्याशा गल्ल्यांपासून, खेडेगावापासून सातासमुद्रापार स्वतःच्या यशोगाथेचे धडे पोहोचवले आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे नुकतेच 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' या पुरस्काराची मानकरी ठरलेली भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल. हा पुरस्कार क्रीडाविश्वात महत्त्वाचा मानला जातो. जगभरातील विविध अॅथलिट प्रकारांमधील खेळाडूंची यासाठी निवड करण्यात येते. जगभरामधून या पुरस्कारासाठी मतदान घेण्यात येते. त्यानंतर या पुरस्काराचे विजेते ठरवले जातात. विशेष म्हणजे, २०१९चा हा बहुमान २५ वर्षीय रानीने पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय तर जगभरातील एकमेव हॉकीपटू ठरली आहे. तब्बल २० दिवस चाललेल्या या प्रक्रियेमध्ये एकूण 7 लाख, ५ हजार, ६१० क्रीडाप्रेमींनी मतदान केले होते. यामध्ये रानीला १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळाली. या सर्व यशामागे तिचा खूप मोठा संघर्ष आहे. तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पण, कुठेही न डगमगता ती यशाकडे मार्गक्रमण करत राहिली. जाणून घेऊया तिचा प्रेरणादायी संघर्ष.
४ डिसेंबर, १९९४ मध्ये हरियाणामधील शाहबाद मारकंडा शहरात राणीचा जन्म झाला. एका गरीब घरात जन्मलेली राणी एक दिवस जगाच्या पाठीवर स्वतःची मोठी छाप सोडेल, असा त्यावेळी कोणी विचारही केला नसेल. तिचे वडील हे हातगाडी चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. तिला वयाच्या सहाव्या वर्षीच शाहबाद शहराच्या संघामध्ये खेळण्यासाठी धाडले. परंतु, यावेळेस तिला कोणी एवढे महत्त्व देत नसे. तिच्या क्षमतेवर अनेक प्रश्न उचलले गेले. लहान वयात प्रशिक्षणादरम्यान तिला तिचे कर्तृत्व सिद्ध करावे लागले होते. हॉकी खेळाबद्दल असलेल्या तिच्या कुतूहलामुळे तिने या संघामध्ये भाग घेतला होता. कालांतराने तिने तिच्यातील क्षमता आणि कर्तृत्वाची सिद्धता प्रशिक्षकांसमोर केली. शालेय शिक्षण घेताना काहीकाळ हॉकीचे मूलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बलदेवसिंग यांच्या शाहबाद हॉकी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. याच अंतर्गत तिने पहिल्या ज्युनियर नॅशनलच्या संघामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती चंदीगढ स्कूल नॅशनल्सकडून खेळली. यामध्ये तिने चांगली कामगिरी केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर पुढे तिला राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळाले. त्यावेळी राणीच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्याकडे हॉकी कीट घ्यायचे आणि प्रशिक्षणाचेही पैसे नव्हते. इतकेच नव्हे तर समाजानेही तिला या खेळामध्ये येण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. परंतु, तिच्या आईवडिलांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाशी आणि परिस्थितीशी दोन हात करत तिला या खेळामध्ये पारंगत करण्याचा निर्धार केला होता. तिने त्यांचा हा लढा वाया जाऊ दिला नाही. तिने केवळ वयाच्या 14व्या वर्षातच सिनियर वर्षात पदार्पण केले होते, ज्यामुळे ती भारतीय महिला हॉकी संघातील सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. व्यावसायिक पातळीवर खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिला 'गोस्पोर्ट्स फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेकडून आर्थिक पाठबळ मिळाले.
जून २००९ मध्ये राणीने रशियाच्या काझान येथे झालेल्या चॅम्पियन चॅलेंज टूर्नामेंटमध्ये तुफान कामगिरी केली. तिने अंतिम सामन्यामध्ये ४ गोल करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तिला 'टॉप गोल स्कोअरर आणि 'यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर २००९ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी रौप्यपदक मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती. राष्ट्रकुल खेळ, २०१० आणि २०१०च्या आशियाई खेळांमध्ये रानी रामपालला 'एफआयएच महिला ऑल-स्टार' संघामध्ये नामांकन देण्यात आले होते. २०१०च्या क्वांगचौ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारे तिला आशियाई हॉकी महासंघाच्या ऑल-स्टार संघातही स्थान देण्यात आले होते. अर्जेंटिनामधील रोजारियो येथे झालेल्या २०१०च्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये तिने एकूण सात गोल नोंदवले होते. यामुळे जागतिक महिला हॉकी क्रमवारीमध्ये भारताने नवव्या स्थानावर झेप घेतली होती. विशेष म्हणजे, १९७८ नंतरची ही भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. २०१३च्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेमध्ये तिला कांस्यपदक मिळाले होते. २०१३च्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचे हे पहिले कांस्यपदक होते. तिच्या कामगिरीच्या आधारावर २०१६ मध्ये तिचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. २०१८च्या आशियाई खेळांमध्ये तिने भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले. या स्पर्धेमध्ये त्यांनी रौप्यपदक पटकावले. याशिवाय तिने भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये 'सहायक प्रशिक्षक' म्हणून काम केले आहे.तसेच, तिने रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून काम सांभाळले आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला दै. 'मुंबई तरुण भारत'कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!