भारतीयत्वाचा आत्मा असलेला इतिहास जगासमोर आणायला हवा : डॉ. बालमुकुंद पांडेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Feb-2020   
Total Views |


dr balkumar pandey_1 




डॉ. बालमुकुंद पांडेय यांनी गोरखपूर विश्वविद्यालयातून एम.ए व बी.एड केले. ‘महामना मदनमोहन मानवीय : व्यक्तित्व एवं विचार’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली आहे. २००७ पासून ते रा. स्व. संघाशी संबंधित अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय संघटन सचिव आहेत. ‘कॉमनवेल्थ का निहितार्थ’, ‘विभाजन के गुनाहगार’, ‘प्राचीन भारत मे गोमांस : एक प्रवंचना’, ‘उपनिषिदीय शिक्षा पद्धती’, ‘रामचरित मानस मे महिला पात्र’ याविषयावरचे त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत त्यांनी ५० शोधनिबंध लिहिले आहेत. भारताचा खरा गौरवशाली इतिहास जगासमोर यावा म्हणून ते अहर्निश कार्यरत आहेत. तेव्हा, इतिहास, पुराणातील समज-गैरसमज या विषयावर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी त्यांनी केलेली ही मनमोकळी बातचित...



‘इंग्रजांना अभिप्रेत असलेला’ आणि ‘आपला नसलेला’ इतिहास आहे, असे आपण कसे म्हणू शकतो?



स्वामी विवेकांनद एका भाषणात म्हणतात की
, “इंग्रजांनी आपल्या इतिहासाची इतकी मोडतोड केली आहे की, त्यामुळे आपली बदनामी झाली आहे. हिंदी महासागरातला अख्खा चिखल जरी आपल्या तोंडावर फासला तरी त्यापेक्षाही ही बदनामीची काळोखी जास्त आहे.” विवेकानंदांनी असे म्हटले कारण त्यांना माहिती होते की, इंग्रजांना त्यांचे श्रेष्ठत्व सत्तेद्वारे आणि संस्कृतीद्वारेही भारतावर प्रस्थापित करायचे होते. इंग्रजांची कालगणना ख्रिस्त जन्मापासून सुरू होते. पण, जेव्हा त्यांना भारतातले रामायण, महाभारत, बौद्धपर्व माहिती झाले, तेव्हा त्यांना वाटले की, हा कालखंड तर ख्रिस्ती कालगणनेच्या खूप आधीचा आहे. भारत हा हजारो वर्षांपासून सुसंस्कृत, समृद्ध आहे. आपल्यापेक्षा आणि आपल्याआधी कुणीही श्रेष्ठ असूच नये, या मत्सरापोटी आणि भीतीमुळे इंग्रजांनी भारतीय इतिहासाची अक्षरश: विटबंना केली. हेच मत लोकमान्य टिळक, गांधींजी, सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर नेहरूंनी भाषणात म्हटले होते की, “आम्ही उद्यापासून नवीन इतिहास लिहू.” पण, नेहरूंच्या कालखंडात १९५० पर्यंत इतिहास लेखनाची पूर्ण जबाबदारी अशा लोकांवर दिली गेली, जे पूर्वी इंग्रजांसाठी विद्वता पाजळायचे, जे रशियामध्ये थंडी पडली तर इथे सर्दी झाले म्हणायचे. या लोकांनी भारतीय समृद्ध, गौरवशाली परंपरांपेक्षा त्यातील अगदी छोट्या छोट्या त्रुटी काढल्या. त्या त्रुटींनाच मोठे करून इतिहासात मांडले. तोच इतिहास आपण इतिहास म्हणून शिकायचा आणि शिकवायचाही का? त्यामुळे आता वेळ आली आहे की, जो इतिहास भारतीयांनी भारतासाठी लिहिला असेल, ज्या इतिहासामध्ये खर्‍या भारताचे प्रतिबिंब असेल, भारतीयत्वाचा आत्मा असलेला इतिहास जगासमोर आणायला हवा. नेमके हेच काम इतिहास संकलन समिती करत आहे.



राजा रामचंद्राने कुणाच्या तरी आक्षेपामुळे सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि सीतेचा त्याग केला
, असे म्हटले जाते. यामध्ये कितपत तथ्य अथवा मिथ्य आहे?



मी
रामचरितमानस मे महिला पात्र’ यावर संशोधन केले आहे. या लिखित रामायणामध्ये ४८ स्त्री पात्रे असून त्यातील २७ स्त्रीभूमिका वास्तव आणि बाकीच्या संदर्भांसाठी आलेल्या आहेत. त्या २७ पैकी २३ या दैवगुणी होत्या, तर ४ स्त्रिया मंथरा, शूर्पणखा, तारका, सिंहिका या राक्षसगुणी होत्या. रामायणामधील शूर्पणखा, मंथरा, तारका, सिंहिका यांच्याशी श्रीराम कधीही वाईट वागले अथवा बोलले असा दाखला नाही. कैकयी मातेमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, असे लक्ष्मणाला वाटते. त्यावेळी श्रीराम हे लक्ष्मणाला मातेचा आदर करावा असेच सांगतात. शापित अहिल्याची गोष्ट ही अशीच. इंद्राने तिचे पावित्र्य भंग केले. त्यामुळे अहिल्येला शाप मिळाला आणि तिची शिळा झाली. मात्र, इंद्राचे राजेपण अबाधित राहिले. त्यावेळी अहिल्या श्रीरामांच्या स्पर्शाने पुन्हा माणूस झाली असे लिहिले आहे. याचा अर्थ असा आहे की, पहिल्यांदा राम तिला चरणस्पर्श करतात. सगळ्या जगाने वाळीत टाकल्यावरही एक सर्वशक्तिमान राजा आपले चरणस्पर्श करतो म्हटल्यावर अहिल्येमध्ये आत्मसन्मानाची चेतना निर्माण होते. तिचा आत्मसन्मान जागृत होणे म्हणजे अहिल्या पुन्हा मानवरूपात येणे हेच आहे. शबरीची उष्टी बोरे खाणारा श्रीराम राजा आहे. तसेच, रामाने रावणाचा वध केला. आता मंदोदरीचे काय? असा प्रश्न विचारल्यावर श्रीराम म्हणतात, “मंदोदरी लंकेची महाराणी होती आहे आणि राहील.” लंकेचे सार्वभौमत्व ते मंदोदरीला प्रदान करतात. पती वारला म्हणून त्याच्या पत्नीने मरून जावे, तिला कवडीचीही किंमत नाही, असे मत श्रीरामाचे नव्हते. स्त्रियांचे दु:ख जाणणारा, स्त्रियांची शक्ती मानणारा आणि आदर करणारा प्रभू रामचंद्रांसारखा दुसरा कुणीही राजा नाही. तो आपल्या लाडक्या पत्नीला कसे त्यागू शकेल आणि अग्निपरीक्षा द्यायला लावूशकेल? हे सगळे शब्दमिथक आहेत.



मुळात सीतामाता लंकेहून पुन्हा अयोध्येत येते
, तेव्हाच सुखान्त झालेला आहे. त्याच्यानंतर जे काही लिहिले आहे, त्यात आणि पूर्वीच्या रामायणात कमालीची तफावत आहे. सीतामातेचे लंकेहून अयोध्येला आगमन होण्यापूर्वी आणि आगमनानंतरच्या रामायणामध्ये भाषा, शब्दालंकार, रचना आणि रामायणातील पात्रांचे स्वभाव यामध्ये बिलकूल साधर्म्य नाही. रामायणानंतरच्या खूप वर्षांच्या कालावधीनंतर बौद्ध जातककथा निर्माण झाल्या. त्यामध्ये ‘दशरथ जातककथा’ वाचा. त्यामध्ये दशरथाला राम-लक्ष्मण-सीता अशी तीन अपत्ये असतात. पुढे वनवासात गेल्यावर राम सीतेसोबत म्हणजेच आपल्या बहिणीसोबत विवाह करतो, असे लिहिले आहे. या कथेला मिथक, काल्पनिकच समजले जाते ना? स्वत:च्या मान्यतेचे प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी पुढे काही लोकांनी प्रभू श्रीरामचंद्रांसारख्या देशनायकाच्या नावे काहीबाही लिहिले असे मला वाटते. सीतामाई अयोध्येला परतल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचा सुखाचा संसार होतो, इथपर्यंतचे रामायण वास्तविक आहे. पुढचे कुणीतरी मुद्दाम लिहिलेले वाटते. मुळात आमचा राम एकवचनी, एकपत्नी, प्रजेच्या सुखासाठी धडपडणारा, अत्याचाराचा विरोध करणारा, दुष्टांचे निर्दालन करणारा, भारत म्हणून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एक संस्कृतीचा वारसा सांगणारा आहे.



इथले काही तथाकथित स्वयंघोषित विचारवंत रावणाची पूजा करा
, रावणदहन करू नका म्हणून आंदोलन करतात, याविषयी आपण काय सांगाल?



ज्याला
रावणाची लंका’ म्हणतात, त्या श्रीलंकेमध्येही रावणाचे आठवणीत राहील असे एकही देऊळ स्मारक किंवा लोकरचनात्मक साहित्य नाही. आता कुणाला रावण आवडत असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण, यांना रावणाचे अस्तित्व मान्य आहे म्हणजेच ते प्रभू श्रीरामचंद्रांचे अस्तित्व मानतात हे सिद्ध होते. तसेच प्रभू रामचंद्रांनी उत्तरेपासून लंकेपर्यंत प्रवास केला. त्यादरम्यान कितीतरी ठिकाणी त्यांना युद्ध करावे लागले. पण, या युद्धात त्यांनी जनतेला कधीही त्रास दिला नाही. जी भूमी जिंकली तिथे कधीही स्वत:चे राज्य श्रीरामाने स्थापन केले नाही, तर त्यांनी स्थानिकांनाच राज्यकर्ते बनवले. ‘एक संस्कृती एक देश’ ही भूमिका त्यावेळेपासून आहे.



देशातील काही लोक आजही अखंड वाद घालतात की
, पूर्वी भारतात सर्रास गोमांस खाल्ले जायचे. हा दावा कपोलकल्पित, दिशाभूल करणारा आहे, असे आपल्याला वाटते का?



या विषयावरच माझा
प्राचीन भारत मे गोमांस : एक प्रवंचना’ हा शोधनिबंध आहे. आपल्या अन्ननलिकेच्या मार्गालाही ‘गो’ म्हटले जाते. अन्ननलिकेच्या मार्गावर एक मांसाचा गोळा असतो, त्याला ‘गो’ म्हटले जाते. जुन्या काळी योग करताना ही ‘पडजीभ’ म्हणजे ‘गोमांस’ श्वसनक्रियेद्वारे शरीराच्या आत खेचायचे. त्याला ‘खेचर क्रिया’ म्हणतात. या क्रियेलाच ‘गोमांस’ भक्षण समजून काही लोक दाखले देतात की, पूर्वी भारतात सर्रास गोमांस खाल्ले जायचे. उत्खननामध्ये जी काही हवनकुंडे मिळाली आहेत, ती जर पाहिली तर ती इतकी मोठी नाहीत की ज्यामध्ये घोडा किंवा गाई किंवा इतर पशू यज्ञात आहुती म्हणून टाकता येतील. काही लोकांनी हा केवळ कल्पनाविलास केला आहे.



दुसरे असे की
, समजा माणूस ज्यावेळी अज्ञात युगात असेल, त्यावेळी त्याने गोमांस भक्षण केलेही असेल, पण त्यानंतर पुढे कळू लागल्यावर खाण्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे त्याला कळल्यावर त्यातल्या काहींनी ते खाणे सोडले आणि आजही बहुसंख्य लोक गोमांस भक्षण करत नाहीत. मग यावर पुन्हा तेच तेच उकरून काढण्यात काही अर्थ नाही. हे सगळे केले जाते ते केवळ बुद्धिभेदासाठी. इतिहास, शिक्षणपद्धती या माणसावर खूप परिणाम करतात. त्या सकारात्मक, सत्यावर आधारित हव्यात. ‘उपनिषदीय शिक्षा पद्धती’ या विषयावर संशोधन केले आहे. उपनिषदामध्ये जे शिक्षण वर्णिले आहे, त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की, विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीनुसार, रूचीनुसार त्याचे शिक्षण हवे. पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये गुरू विद्यार्थ्यांमधील २७ दोष दूरकरायचे. त्यानंतर त्याला शिकवायचे. आज असे होत आहे का? समाजाभिमुख शिक्षण हवे. असे शिक्षण जे विद्यार्थ्यांना माणूस बनवेल, समाजशील आणि देशाभिमानी बनवेल.

@@AUTHORINFO_V1@@