श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस - मराठमोळी उद्योगाची ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2020   
Total Views |


sri Krishna boarding hous



दादर. अनेक मराठी माणसांच्या जडणघडणीत महत्त्वाचं घटक असलेलं असं स्थान. मराठी माणसाचा जर इतिहास लिहिला गेला तर दादर वगळून तो इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच ठिकाणी एक टॅक्सीवाला होता. गोखले नावाचा. एके दिवशी त्याने चक्क टॅक्सीच विकली आणि त्याकाळी म्हणजे १९३७ साली निव्वळ ५०० रुपयांमध्ये दादरला जागा विकत घेऊन एक बोर्डिंग हाऊस सुरू केलं. सुमारे ८३ वर्षांनंतरसुद्धा हे बोर्डिंग हाऊस दिमाखात उभं आहे. विष्णू वामन गोखल्यांचे नातू राहुल पाटगांवकर हे बोर्डिंग हाऊस चालवतात. रानडे रोडवरील ‘न्यू श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस’ हे ते नाव.

 
 

विष्णू वामन गोखल्यांना एकूण तीन भाऊ. सर्वांत धाकटे भाऊ नीळकंठ वामन गोखले यांची छाया पाटगांवकर ही कन्या. छाया पाटगांवकर यांनी हा बोर्डिंग व्यवसाय पुढे वाढवला. विष्णू गोखले हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे मराठी नाट्य आणि संगीतक्षेत्रात त्यांच्या अनेक ओळखी होत्या. मल्लिकार्जुन मन्सूर आणि गंगूबाई हनगळ यांसारखे नामवंत कलाकार येथे मुक्कामी असायचे. त्यावेळेस अनेकदा गाण्याच्या मैफिली रंगायच्या. या वास्तूने तो स्वर्गीय आवाज अनुभवलाय. त्याचप्रमाणे दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या मराठी नाट्य-चित्रसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेलेल्या दिग्गजांनी येथे मुक्काम केलेला आहे. छाया पाटगांवकर यांचे चिरंजीव राहुल पाटगांवकर सध्या या बोर्डिंग हाऊसच्या भोजनालयाचे व्यवस्थापन पाहतात. एचआर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. एक वर्ष बँकेत नोकरी केल्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसला वाहून घेतले. राहण्याच्या आणि जेवणाच्या उत्तम व्यवस्थेसाठी हे बोर्डिंग हाऊस ओळखले जाते. एकूण १७ खोल्या येथे उपलब्ध आहेत. ५० ते ६० जणांची सकाळ-संध्याकाळ जेवणाची येथे व्यवस्था आहे. कमी तेलातलं जेवण ही श्रीकृष्ण बोर्डिंगची खासियत. येथील जेवण मराठी मालिकांच्या सेटवरदेखील पुरविले जाते. याआधी वहिनीसाहेब, कुलवधू सारख्या मालिकांच्या सेटवर जेवण पुरविले गेले आहे. राहुल पाटगांवकरांनी शुश्रूषा इस्पितळ सारख्या नामांकित इस्पितळासोबतच इंडिया बुल्स, बिर्ला इन्शुरन्स, एचडीएफसीसारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज संस्थांनासुद्धा कॅन्टीनची सुविधा पुरवलेली आहे. २००४ साली रुजुता या सुविद्य मुलीसोबत राहुल यांचा विवाह झाला. त्यानंतर रुजुता या सुद्धा तितक्याच हिरिरीने आपल्या पतीला व्यवसायात हातभार लावत आहेत. या दाम्पत्यास ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. सध्या तो पाचवीत शिकतोय.

 
 

दादर हा परिसर सुरुवातीपासूनच समाजकारण, राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. राहुल यांचे आजोबा, विष्णू वामन गोखलेंचे धाकटे बंधू केशव वामन गोखले हे संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. या परिसरातील अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे अनेक सामाजिक, विविध पक्षीय राजकारण्यांचा नेहमीच येथे राबता असायचा. निव्वळ पैसे कमवावे हा उद्देश ठेवून विष्णू गोखल्यांनी श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस सुरू केले नव्हते. दादरमध्ये देशाच्या, महाराष्ट्राच्या विविध भागांतून विविध कारणांसाठी लोक येतात. जवळच केईएम, वाडिया, टाटा, जे.जे सारखी नामवंत इस्पितळे असल्याने येथे उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाचा मोठाच प्रश्न असतो. त्यांच्या खिशाला परवडणारे असे हे बोर्डिंग हाऊस आहे. आजोबांचा हा सामाजिक वसा राहुल पाटगांवकर समर्थपणे पुढे नेत आहेत. आजसुद्धा अवघ्या ४०० रुपयांत येथे मुक्कामाची व्यवस्था आहे. न्यू श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊस प्रा. लि. या संस्थेच्या प्रज्ञा रानडे या देखील संचालिका आहेत. त्यांचं या संस्थेत मोलाचं योगदान आहे. मराठी भाषा दिन काल संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झाला. संपूर्ण जगात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सात कोटींपेक्षा अधिक आहे. जगात ही भाषा १६ व्या स्थानावर आहे. जसे जगात भाषेच्या बाबतीत आपण सर्वोच्च २० मध्ये आहोत तसेच उद्योगातसुद्धा येणे आवश्यक आहे. राहुल पाटगांवकरांसारखे उद्योजक तिसऱ्या पिढीमध्येसुद्धा हा उद्योग पुढे नेटाने नेत आहेत, हे चित्र मराठी भाषकांसाठी आश्वासक आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@