'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२०’ अहवालाची माहिती
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या २५ वर्षांमध्ये भारतात मोर आणि चिमण्यांची संख्या वाढली असून गिधाड आणि गरुडांच्या संख्येत घट झाल्याचे ’स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२०’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या ’सीएमएस कॉप-१३’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील दोन सरकारी आणि आठ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या २४ वर्षांमध्ये भारतातील पक्ष्यांच्या ४८ टक्के जातींमध्ये सुरक्षितरित्या वाढ झाली असून गेल्या पाच वर्षांत ७९ टक्के पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये घट झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
’सिटीझन्स सायन्स’ म्हणजेच लोकांच्या मदतीने देशात प्रथमच पक्ष्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. १५ हजार, ५०० पक्षीनिरीक्षकांनी पक्ष्यांच्या एक कोटींहून अधिक नोंदींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यासाठी देशात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या १ हजार ३३२ जातींपैकी ८६७ प्रजातींच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. भारतातील पक्ष्यांची प्रदेशानुरुप विभागणी आणि त्यांच्या विपुलतेचा अभ्यास या अहवालाव्दारे करण्यात आला आहे. 'इ-बर्ड' या संकेतस्थळावर पक्षी निरीक्षकांनी संकलित केलेल्या माहितीवरून, पक्ष्यांच्या कोणत्या जातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे आणि कोणत्या जाती सुरक्षित आहेत, यासंबंधीचा आढावा या अहवालात घेण्यात आला. या कामामध्ये 'अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलोजी एंड इंविरोनमेंट' (एटीआरईई), 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस), 'फौंडेशन फॉर ईकॉलोजीकल सिक्युरिटी' (एईएस), 'नॅशनल बायोडायव्हरर्सिटी ऑथॉरिटी' (एनबीए), 'नॅशनल सेंटर फॉर बायोलोजीकॅल सायन्स' (एनसीबीएस), 'नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन' (एनसीएफ), 'सालिम अली सेंटर फॉर ओर्निथोलोजी एंड नॅचरल हिस्ट्री' (सेकाॅन), 'वेटलँडस इंटरनॅशनल साउथ एशिया' (डब्लूआयएसआय), 'वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (डब्लूआयआय) आणि 'वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया' (डब्लूडब्लूए) यांचा सहभाग होता.
’ई-बर्ड’द्वारे संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर आढळले की, गेल्या २५ वर्षांमध्ये पक्ष्यांच्या ४८ टक्के प्रजातींमध्ये सुरक्षितरित्या वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ७९ टक्के पक्ष्यांच्या जाती घटल्याचे निदर्शनास आले आहे. पक्ष्यांच्या घट झालेल्या प्रजातींमध्ये प्रामुख्याने पांढर्या पाठीचे गिधाड आणि भारतीय गिधाडांचा समावेश आहे. भारतात सर्वत्र चिमण्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या स्थिर किंवा वाढत आहे. मात्र, शहरी भागात त्यांचा संख्येत घट होत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. या अहवालानुसार भारतातील १०१ पक्ष्यांच्या जातींना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. सामान्य पक्ष्यांची संख्या कमालीची घटत असून ही संख्या आणखी घटण्याआधीच त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत ’सेकॉन’चे डॉ. राजा जयपाल यांनी व्यक्त केले आहे. शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि चिखले आणि अधिवासनिष्ठ पक्ष्यांच्या संख्येत कमालीची घट आढळली आहे. सद्यस्थितीत पक्षीसंवर्धनासाठी कृतिशील धोरण, चांगले व्यवस्थापन आणि आर्थिक पाठबळ निर्माण होणे महत्त्वाचे आहे. पूर्वी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी घेण्यात येणारे निर्णय वस्तुनिष्ठ माहिती अभावी घेण्यात येत होते. परंतु, २०२० च्या या अहवालातून पुढे आलेली माहिती विश्वसनीय असून यापुढे पक्षीसंवर्धनासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी ती उपयुक्त ठरणार असल्याचे ’डब्लूआयआय’चे संचालक डॉ. धनंजय मोहन यांनी सांगितले.