भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’चा ‘प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने मनप्रीतच्या जिद्दीची ही कहाणी...
क्रीडाक्षेत्रामध्येही भारतीय खेळाडूंनी अनेकानेक विक्रम रचत तिरंग्याची शान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली. भारतामध्ये क्रिकेट, फुटबॉल, कबड्डीप्रमाणे हॉकी राष्ट्रीय खेळदेखील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. या खेळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारताने चांगली प्रगती करून अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत. हॉकीमुळे अनेक खेळाडूंना ओळखही मिळाली. परिस्थितीवर मात करत अनेकांनी नवीन पिढीसमोर आदर्श प्रस्थापित केला. नुकतेच हॉकीमध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्या ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’ म्हणजेच ‘एफआयएच’ने आंतरराष्ट्रीय कामगिरीवर ’प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर केला. गौरवास्पद म्हणजे, हॉकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय हॉकीपटूने हा पुरस्कार पटकावला आहे. तो हॉकीपटू म्हणजे भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंग. या पुरस्कारासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत मनप्रीतला सर्वाधिक म्हणजे ३५.२ टक्के मते मिळाली आणि तो या बहुमानाचा मानकरी ठरला. परंतु, त्याचा आजवरचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. तेव्हा, जाणून घेऊया त्याच्या या संघर्षाबद्दल...
मनप्रीत सिंग पवार याचा जन्म हा २६ जून १९९२ रोजी झाला. तो मूळचा पंजाबमधील जालंधर शहरापासून थोड्या अंतरावर वसलेल्या मिठापूर गावचा. मनप्रीत हा सध्या भारतीय हॉकीतील ‘स्टायलिश खेळाडू’ म्हणून ओळखला जातो. पण, खरंतर त्याचा जन्म हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातला. असे म्हटले जाते की, मनप्रीतने हातामध्ये पेन्सिल घेण्याआधी हॉकी स्टिक घेतली. त्याचे कारण म्हणजे, त्याचे दोन्ही मोठे भाऊ हे हाडाचे हॉकीपटू. त्यामुळे मनप्रीतला लहानपणापासून घरातूनच हॉकीचे बाळकडू मिळाले. हॉकी सामने जिंकल्यावर आपल्या मोठ्या भावांना मिळणार्या बक्षिसाच्या रकमेमुळे मनप्रीत या खेळाकडे आकर्षित झाला. घरातील परिस्थिती फारशी चांगली नसली तरी हॉकीपटू म्हणून करिअर घडविण्यासाठी घरच्यांचा मनप्रीतला पूर्ण पाठिंबा होता. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री परगतसिंग यांनी मनप्रीतला हॉकीमध्ये करिअर संबंधी मार्गदर्शन केले. तेही जालंधरमध्येच असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शखाली मनप्रीतने हॉकीकडे केवळ एक खेळ म्हणून न पाहता, या खेळात स्वतःचेनाव कमावण्याचा दृढनिश्चय केला. मनप्रीतने वयाच्या नवव्या वर्षीच स्टिक आणि बॉलच्या स्पर्धा खेळायला सुरुवात केली. बक्षिसांच्या आकर्षणाने त्याने या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरीदेखील केली. त्यावेळी हॉकी खेळताना मोठ्या भावांना झालेल्या जखमा बघून त्याची आई मनप्रीतच्याही चिंतेत असायची. परंतु, हॉकीबद्दल त्याच्या मनामध्ये एक वेगळी जिद्द होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मनप्रीतने एक हॉकीचा सामना जिंकून बक्षीस म्हणून ५०० रुपये जिंकले. मनप्रीतची खेळाबद्दल जिद्द पाहून त्याच्या आईने मनप्रीतला हॉकी अकादमीमध्ये जाण्याची परवानगी दिली आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. त्यानंतर मनप्रीतने कधीही मागे वळून पाहिले नाही.
२००५ मध्ये त्याने जालंधरमधील प्रसिद्ध सुरजित हॉकी अकादमीमध्ये प्रवेश केला. शहरातील छोट्या खेळांमध्ये त्याची कामगिरी उत्तम राहिली. त्यानंतर सहा वर्षांचे प्रशिक्षण आणि अनुभवावर २०११ मध्ये ‘भारतीय ज्युनिअर संघा’चा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये मनप्रीतने पदार्पण केले. भारताच्या ज्युनिअर संघाकडून खेळताना त्याने उत्तम कामगिरी बजावली. २०१३ मध्ये ‘पुरुष ज्युनिअर विश्वचषक स्पर्धे’मध्ये भारतीय ‘ज्युनिअर हॉकी संघा’ची जबाबदारी मनप्रीतकडे सोपवण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्येच ’सुलतान ऑफ जोहोर कप’ या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मनप्रीतच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीमध्ये मलेशियाच्या संघाला पराभूत करुन सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीमध्ये मलेशियावर ‘३-०’ अशी मात करत मनप्रीतनेही एक गोल केला होता. २०१४च्या आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. या संघाचा मनप्रीतदेखील एक भाग होता. तसेच, २०१६ मध्ये ‘आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक पुरुष’ स्पर्धेमध्येदेखील भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मनप्रीतचा सिंहाचा वाटा होता. २०१४ मध्ये स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे झालेल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे २०१६ मध्ये ‘सुलतान अझलान शहा कप’साठी भारताचे प्रतिनिधित्व करत असताना पहिल्या सामन्याच्या काही तास आधी त्याच्या वडिलांचे अचानक निधन झाल्याची बातमी त्याला मिळाली. तरीही मनप्रीतने तो सामना खेळला आणि भारताने जपानसारख्या तगड्या मानल्या जाणार्या हॉकी संघाला ‘१-२’ अशी मात देत विजयश्री मिळवली. त्यावेळी मनप्रीतच्या त्याच्या खिलाडू वृत्तीचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. त्याच्या या खेळावरील प्रेमाने भारताला त्यानंतरही अनेक हॉकी सामने जिंकवून दिले. २०१८ मध्ये मनप्रीतला ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानितही करण्यात आले. २७ वर्षीय मनप्रीतने स्वकर्तृत्वावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. अशा हुरहुन्नरी आणि युवा हॉकीपटूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!