हिंदुत्वाचे अवकाश आणि राज ठाकरे

11 Feb 2020 19:51:17



raj thackeray_1 &nbs


मनसेला हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. ध्वज बदलला, प्रचंड मोर्चा काढला, ही चांगली सुरुवात आहे. पण, हे जर ‘टर्मिनस’ झाले तर काही खरे नाही.


नागरिकत्व दुरुस्तीकायदा’ संमत झाला. संसदेने तो बहुमताने पारित केला. लोकशाहीच्या नियमाप्रमाणे आणि राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून हा कायदा करण्यात आला. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाने सतत विरोध करायचा असतो. कधी कधी हा विरोध ‘विरोधासाठी विरोध’ या प्रकारात मोडतो आणि कधी कधी हा विरोध सर्व मर्यादा सोडून केला जातो. विरोध करत असताना ‘राष्ट्रहीत गेले खड्ड्यात, आम्ही आमचा निवडणूक स्वार्थच बघू’ एवढाच एक निष्कर्ष राहतो. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’चा विरोध या प्रकारात मोडणारा आहे
हा ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ मुसलमानांच्या विरोधात नाही. देशातील कुठल्याही मुसलमानाचे नागरिकत्व समाप्त केले जाणार नाही. परदेशातून जे मुसलमान भारतात घुसले आहेत, त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, केरळमधील डावी आघाडी या सर्वांनी मुसलमानांच्या डोक्यात हे घुसवण्यास सुरुवात केली की, तुमचे नागरिकत्व काढून घेतले जाणार आहे, तुम्हाला भारतातून हाकलून लावणार आहे, वगैरे...त्यांनी ठिकठिकाणी बुरखाधारी महिलांना आंदोलन करण्यासाठी आणले. या बुरखाधारी महिलांना कायदा किती समजतो, संविधान किती समजते, याविषयी न लिहिलेले बरे!



त्यांचा प्रयत्न हळूहळू मुसलमानांना रस्त्यावर आणण्याचा आहे
, त्यांना हिंसक करण्याचा आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे, ज्या ठिकाणी भाजपचे शासन आहे, त्याठिकाणी मोर्चेकर्‍यांवर लाठीमार, गोळीबार होईल, मग त्याचे भरपूर भांडवल करता येईल. एक अकलाख मेला, तर वातावरण असे करण्यात आले की, लाख अकलाख मेले. प्रसिद्धी माध्यमांना ‘मॅनेज’ करणे त्यांना खूप सोपे जाते. या प्रसिद्धी माध्यमांचे वर्णन काही ज्येष्ठ पत्रकार ‘प्रेस्टिट्यूट’ (‘प्रोस्टिट्यूट’चा प्रतिशब्द) असे करतात. हे आंदोलन दिसायला मोदी शासनाविरुद्ध आहे. शासनाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी आणखी खूप विषय आहेत. मध्यंतरी कांद्याचे भाव वाढले होते. आंदोलनासाठी तो एक विषय होता. आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हा एक आंदोलनाचा विषय आहे. यापैकी कोणताही विषय काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी घेतलेला नाही. या विषयात मुसलमान आणि ख्रिश्चनांना रस्त्यावर उतरविण्याचे सामर्थ्य नाही. त्याने ‘व्होटबँका’ तयार होत नाहीत की ‘आम्ही मुसलमानांचे रक्षणकर्ते आहोत,’ असा संदेश जात नाही.



मुसलमानांना बरोबर घेऊन आंदोलन करणार्‍यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे आवश्यक होते
. हिंदू समाजाची ती भूक होती, गरज होती. त्याची मागणीदेखील होती. ज्यांनी हे उत्तर द्यायला पाहिजे, त्यातील एका पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्रिपदाची खुर्ची उबवीत बसले आहेत. ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाणार नाही, असे ते म्हणतात. त्यांना मुसलमानांचे साथीदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना दुखवायचे नाही. दुखवले तर खुर्चीचे दोन पाय तुटून पडतील. दुसरा पक्ष ‘आमची सत्ता गेली, आम्ही सत्तेवर येणार, शिवसेना आमच्याबरोबर येणार’ म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला आहे. या दोन्ही पक्षांना हिंदू समाजाविषयी आणि दीर्घकालीन विचार करता त्याच्या अस्तित्त्वासंबंधी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या प्रतिष्ठेच्या कोशात गुंग झालेला आहेअशा वेळी मनसेचे राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी ९ फेब्रुवारीला मुंबईत ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’च्या समर्थनार्थ प्रचंड मोर्चा काढला. तसेच हिंदूंच्या भावभावना व्यक्त करणारे सणसणीत, तिखट आणि परखड भाषण केले. ‘दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ’ ही भाषा त्यांनी वापरली. भारत म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, जे पाकिस्तानी आणि बांगलादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे. भारतात जन्मलेला मुसलमान शांततेत राहू इच्छितो. परंतु, बाहेरून आलेले मुसलमान गडबड करत असतात. कोणत्या तरी राजकीय नेत्याने असे घणाघाती भाषण करावे ही जनतेची अपेक्षा होती. राज ठाकरे यांनी ती पूर्ण केली. लोकांच्या मनात काय आहे, हे त्यांनी जाणले. त्याला वाट करून दिली. यासाठी आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे.




एक काळ असा होता की
, हिंदूंचा पक्ष घेऊन बोलणे, महापातक समजले जाई. ज्या-ज्या लोकांनी हिंदूंचा पक्ष घेतला, त्या सर्वांना ‘खलनायक’ ठरविण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीगुरुजी यांच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत लिहिले गेले. अशा वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आधारे राजकारण करायला प्रारंभ केला. कोर्टात केस झाली. या सर्व दिव्यातून बाळासाहेब ठाकरे यांना जावे लागले. त्यांचा हा वारसा तेवढ्याच जोमाने पुढे नेण्याची गरज होती. त्यांच्या मुलाला वारशापेक्षा गादीची ऊब महत्त्वाची वाटली आणि त्यांनी असंगाशी संग केला. आज ते म्हणतात, “मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण, ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचे ठरलेले आहे. जगाला ठाऊक आहे आपले हिंदुत्व काय आहे?” राज ठाकरे यांच्या मोर्चाचा टोला योग्य जागी बरोबर जाऊन बसला आहे, एवढाच त्याचा अर्थ. महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचा विषय घेऊन राजकारण करणारे तीन पक्ष झाले आहेत - शिवसेना, भाजप आणि मनसे. दुसर्‍या भाषेत राजकारणाच्या हिंदुत्वकरणाला आता वेग येत चाललेला आहे. हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा लागेल. ‘आमचेच हिंदुत्व खरे, तुमचे बेगडी’ अशी भाषा भविष्यात ऐकायला आली तर त्याचे आश्चर्य वाटू नये. आजचा विचार करता तिन्ही पक्षांमध्ये शिवसेना ही कोंडीत सापडलेली आहे. एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीची सोबत, पिता आणि मुलाचे मंत्रिपद आणि दुसर्‍या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा. एक धरून ठेवायचा तर दुसरा सोडावा लागतो. आज ना उद्या शिवसेनेला याचा अंतिम निर्णय करावा लागेल.



भाजप संघविचारधारेवर चालणारा पक्ष आहे
. संघाची विचारधारा प्रत्यक्षपणे सत्तेशी संबंधित नाही. परंतु, तिचा प्रभाव सत्तेवर फार मोठ्या प्रमाणात पडत असतो. संघाची बांधिलकी हिंदू विचारांशी आहे, सत्तेशी नाही. जेव्हा ‘सत्ता’ की ‘हिंदुहित’ असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा संघ हिंदुहिताच्या बाजूने उभा राहतो. काही इतिहास कटू असतो. त्याच्या आठवणी काढल्या असता काहीजणांना आवडत नाहीत. पण, हा इतिहास विसरताही येत नाही. २००४ साली केंद्रात भाजपचा पराभव झाला. सरकार उत्तम प्रकारे चालू असतानादेखील पराभव झाला. काँग्रेसला अनुकूल वातावरण नसतानादेखील भाजपला सत्ता बनविण्याइतक्या जागा मिळाल्या नाहीत. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने (स्वपन दासगुप्ता) याने पराभवाचे कारण ‘क्वाएट हिंदू’ म्हणजे ‘हिंदू शांत बसला’ अशा मोजक्या शब्दात सांगितले. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने तेव्हा हिंदू आस्थांचे, श्रद्धांचे विषय हाताळले, त्यावरून माझ्यासारख्याची भावना अशी झाली की, सत्तेत बसलेले लोक आमचे आहेत, पण शासन आमचे नाही. महाराष्ट्रातील भाजपने यातून काही धडा घेतला नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

मनसेला हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. ध्वज बदलला, प्रचंड मोर्चा काढला, ही चांगली सुरुवात आहे. पण, हे जर ‘टर्मिनस’ झाले तर काही खरे नाही. हिंदुत्वाचे विषय सातत्याने पुढे येत राहतील. ते स्वीकारावे लागतील. राजकीय भाषेत आणि कार्यक्रमात ते आणावे लागतील. सतत हिंदू मानसिकतेच्या बरोबर राहावे लागेल. एक हजार वर्षांच्या पारतंत्र्याने राष्ट्रीय हिंदू मनावर अतिशय खोलवरच्या जखमा झालेल्या आहेत. ‘औरंगजेबाने संभाजी महाराजांचे केलेले तुकडे’ येथून जर सुरुवात केली, तर पृथ्वीराज चौहान यांचा हालहाल करून झालेला मृत्यू, गुरुगोविंद सिंगांच्या चार बालकांचा क्रूर मृत्यू, पद्मिनीचा जोहार, विषयांची मालिका संपणार नाही आणि यातला कुठलाही विषय असा नाही की, जो येणार्‍या काळात मोठा बनून समोर येणार नाही. एक रामजन्मभूमीचा अपमान धुवून काढला गेला. अन्य अपमानांचे काय? ही राष्ट्रीय सूची आहे. ज्यांना ही सूची ऐकूनच भीतीचे कापरे भरते आणि ज्यांची विजार ओली होते, त्यांना आपल्याकडे ‘पुरोगामी’, ‘मानवतावादी’, ‘वैश्विक विचार करणारे’ म्हणतात. त्यांना त्यांच्या विश्वात जगू द्या. आपल्याला हिंदू म्हणून उभे राहायचे आहे, हिंदू म्हणून जगायचे आहे आणि हिंदू म्हणून पराक्रम करायचा आहे. राजकारण त्याचे एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात नव्या दमाने राज ठाकरे उतरले आहेत. त्यांचा दम टिकून राहो आणि अशीच वाटचाल त्यांनी आयुष्यात करीत राहावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया.

Powered By Sangraha 9.0