शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना अखिल भारतीय पातळीवर नेण्याची टिळकांची महत्त्वाकांक्षा होती असेच दिसते. शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना ‘नॅशनल हिरो’ अशीच करायची होती. महाराष्ट्रात तर शिवाजी उत्सव साजरा झालाच, पण महाराष्ट्राबाहेर बंगाल, पंजाब आणि इतर सर्वच प्रांतांमध्ये शिवाजी महाराज शिरोधार्य होऊ लागले. अमेरिका आणि जपानसारख्या परदेशातही शिवजयंती साजरी झाल्याचे उल्लेख सापडतात. समग्र हिंदुस्थानात आणि बाहेरच्या देशातही शिवाजी महाराजांची कीर्ती यामुळे पसरली आणि शिवजयंतीच्या उत्सवाला टिळकांच्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. स्वातंत्र्याला ७० वर्षं उलटून गेल्यानंतर आजही आपण देशात शिवजयंती करतो, आज हा उत्सव आम्ही कुठे नेऊन ठेवलाय? हा प्रश्न स्वतःला कठोरपणे विचारायला हवा, असे वाटत नाही का?
‘शिवजयंती’ आणि ‘गणेशोत्सव’ याबद्दल लिहिताना काही भाग हे या दोन्ही उत्सवांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यात आणि वस्तुस्थिती काय ते समोर आणण्यात गेले. ते गरजेचेही होते. कारण, आजकाल पुरावे, ऐतिहासिक दस्तावेज नसताना काहीही सर्रास लिहिले-बोलले जाते. अशा प्रकारांना उत्तर देणे गरजेचे आहे, असे टिळकांनीच एके ठिकाणी सांगितलेले आहे. टिळक म्हणतात, “सूर्यावर आलेली अभ्रे जशी वायुस वारंवार दूर करावी लागतात, तद्वतच काही अंशी प्रत्येक सार्वजनिक विषयाची स्थिती असल्यामुळे काही गढूळ मातीच्या लोकांकडून मध्यंतरी जे आक्षेप निघतात, त्यातील चुका दाखवणे हे उत्सवाच्या पुरस्कर्त्याचे काम आहे.” एका सर्वस्पर्शी आणि जाणत्या पुढार्याप्रमाणे टिळक बोलताना दिसतात.
शिवजयंतीची कल्पना टिळकांनी किती मनापासून राबवली हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी राष्ट्रीय उत्सवाबद्दल वेळोवेळी काढलेले उद्गार फार महत्त्वाचे जाणवतात. टिळक लिहितात, “आपल्या थोर पुरुषास विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणेही शक्य नाही, असा जो सर्वसामान्य ऐतिहासिक सिद्धांत आहे, याचेच शिवजयंत्युत्सवासारखे उत्सव हे दृश्य स्वरूप होय.” (केसरी, अग्रलेख - ९ एप्रिल, १९०१) भाषा, धर्म आणि थोर पुरुष यांचे स्मरण किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देताना टिळक म्हणतात, “स्वभाषेची अभिवृद्धी, स्वराष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीने अभ्यास व मनन, स्वधर्मश्रद्धा इत्यादी गोष्टी जशा राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात, त्यातलाच शिवजयंत्युत्सवासारख्या उत्सवाचा प्रकार होय.” ( समग्र टिळक पान - ४१ ) राष्ट्र स्वतंत्र असो किंवा परतंत्र, पूर्वजांचे स्मरण करणारे उत्सव किती गरजेचे आहेत, हे सांगतांना टिळक म्हणतात, “आम्ही कोणत्याही स्थितीत असलो तरी अशा प्रकारचे उत्सव करणे हाच अमुच्या अभ्युदयाचा मार्ग असून परिणामी तोच श्रेयस्कर आहे, असे आम्ही मानतो.” (केसरी अग्रलेख - शिवजयंत्युत्सव)
धर्म आणि राजकारण हे एकमेकांपासून वेगळे करता येतील का, या प्रश्नावर शहाजोग चर्चा आजही आजूबाजूला होताना दिसतात. स्वतःला ‘राष्ट्रीय विचारांचे पाईक’ वगैरे म्हणवणारे सोयीस्करपणे आपल्या भूमिका बदलतात. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या उत्सवातही हा मुद्दा वारंवार उपस्थित झालाच. मात्र, टिळकांनी लिहिले, “राजनीतीला धर्मातून अजिबात फाटा मिळण्याची कल्पना अलीकडची आहे. शिवाजी महाराजांची राष्ट्रीयता अशी फारकत घेऊन बाहेर पडलेली नाही. धर्म हा तिचा पोषक होता. परंतु, महाराजांचा हेतू कोणताही मानला तरी त्यामुळे राष्ट्रोदय व राष्ट्रोन्नती खरोखर झाली हे प्रत्येकास मान्य आहे.” (लोकमान्य-फाटक - ११४) धर्माला राजकारणाची जोड हवीच, ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत, याची फार चांगली जाण टिळकांना होती.
टिळकांच्या नेतृत्वाचे वेगळेपण हेच की, शिवजयंती उत्सव सुरू करून स्वस्थपणे काय घडते आहे, हे टिळक बघत बसले, पाहत राहिले नाहीत, तर त्याच्या अनुषंगाने जे जे वाद उभे राहिले ते सगळे वादसुद्धा टिळकांनी अंगावर घेतले; मग मराठे-ब्राह्मणवाद असो किंवा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे जमवण्याचा प्रश्न असो. वेळोवेळी टिळक पुढे झाले. वर्गणी किती गोळा झाली, तिचा विनियोग कसा केला, याबद्दल खुलासा करणारे अग्रलेख टिळकांनी त्या काळी ‘केसरी’त लिहिलेले दिसून येतात. खरेतर सार्वजनिक कामासाठी जमा झालेला पैसा, त्याचे हिशोब हे त्या कामाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर असते त्याने सर्वार्थाने पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवायची असते. यात कुठलाही आडपडदा ठेवून चालत नाही. याचा वस्तुपाठ टिळक लोकांसमोर मांडत होते. या सगळ्याच्या तुलनेत आजचे आपले पुढारी बघितले तर गेल्या १०० वर्षांत पुढारीपणाचा, नेतृत्वाचा स्तर किती खालावला आहे, याची दुर्दैवी जाणीव मनाला झाल्यावाचून राहत नाही.
आजही ज्या वादावर आम्ही चर्चा करतो तो शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद टिळकांनी अंगावर घेतला. एके ठिकाणी तर त्यांनी आजवरच्या देशी परदेशी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल काय काय आणि कसे कसे लिहून ठेवले आहे, याचा मोठा हिशेब मांडलेला दिसतो. एका लेखात त्यांनी शिवाजी महाराजांची जन्मकुंडली छापलेली आहे आणि त्यावरून काही अनुमान काढलेले दिसतात. नेता कसा असावा, हे आपल्या कृतीतून टिळक दाखवून देत होते. एखादा विषय त्यांनी हातात घेतला तर त्याच्या मुळाशी जाऊन ते शोध लावत असत. इतक्या खोलवर शोध घेणे फार थोड्या लोकांना जमते. एखाद्या विषयांमध्ये तितका सखोलपणे जाण्याची तयारी टिळकांच्या अभ्यासू आणि चिकित्सक स्वभावात होती म्हणूनच शिवजयंतीचा उत्सव त्या काळात लोकप्रिय झाला.
या उत्सवाच्या निमित्ताने शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुते मर्यादित न ठेवता, त्यांना अखिल भारतीय पातळीवर नेण्याची टिळकांची महात्त्वाकांक्षा होती असेच दिसते. शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना ‘नॅशनल हिरो’ अशीच करायची होती. कोलकात्याच्या एका भाषणात टिळक म्हणतात, “शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यात जन्मास आले त्यासाठी त्यांना ‘मराठा’ म्हणावे लागते, पाहिजे तर तुम्ही त्यांना बंगाली समजा. त्यांची चेहरेपट्टी पाहिल्यास ते राजपुताप्रमाणे दिसतात, तेव्हा त्यांना ‘राजपूत’ लोकांत गणता येईल. ते कोण होते, कुठे जन्मले हे गौण प्रश्न बाजूला सारून राष्ट्रीय दृष्टीने विचार केल्यास त्यांची कामगिरी ही राष्ट्रीय स्वरुपाची होती, असे ध्यानात येईल व त्या कामगिरीकडे पाहूनच त्यांचा गौरव सार्या देशाने केला पाहिजे. आपण त्यांच्या कामगिरीतील प्रेरणा घेतली पाहिजे. या प्रेरणेने आजच्या काळात न जाणो एखादा शिवाजीसारखा लोकाग्रणी इतर प्रांतात जन्माला येईल.”
गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजन्मोत्सवसुद्धा महाराष्ट्रानंतर सर्वप्रथम बंगालमध्ये सुरू झाला. बंगालमध्ये तो सुरू होण्याचे कारण गोपाळराव देऊसकर हे होय. त्यांनी टिळकांच्या सांगण्यावरून तिकडे खटपट सुरू केली आणि टिळकांच्या अनुपस्थितीत बंगालमध्ये शिवजन्मोत्सव घडवून आणला. बंगाली साहित्यात त्याच्या अनेक खुणा सापडतात. विशेषतः गुरुदेव रवींद्र आणि श्रीअरविंद यांच्या साहित्यात हे उल्लेख ठळकपणे सापडतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यात शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करणारी त्यांनी लिहिलेली एक दीर्घ कविता सापडते. त्याचा मराठी अनुवाद पु. ल. देशपांडे यांनी केलेला आहे. महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील संबंध दृढ करणारा आणखीन एक महत्त्वाचा दुवा म्हणजे योगी अरविंद! लोकमान्य टिळक आणि योगी अरविंदांचे संबंध फार निकटचे होते. अरविंदांच्या साहित्यात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित केलेली एक दीर्घ काव्य सापडते. अरविंदांना, शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातल्या पराक्रमी पुरुषांचा किती अभिमान होता, यांच्या अनेक कथा आम्ही स्वतः अरविंदांच्या आश्रमातील त्यांच्या काही अभ्यासू मंडळींकडून नुकतेच ऐकून आलो आहोत. आज अरविंद आणि टिळक दोघेही नाहीत. परंतु, भारताचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी चळवळ आणि शिवाजी महाराज या सगळ्याबद्दल महाराष्ट्र आणि बंगाल यांच्याबद्दल आजही अरविंद सोसायटीच्या लोकांमध्ये आस्था आहे, जिव्हाळा आहे. शिवाजी महाराजांबद्दलचा आदरभाव आजही तसाच दिसून येतो.
महाराष्ट्रात तर शिवाजी उत्सव साजरा झालाच, पण महाराष्ट्राबाहेर बंगाल, पंजाब आणि इतर सर्वच प्रांतात शिवाजी महाराज शिरोधार्य होऊ लागले, अमेरिका आणि जपानसारख्या परदेशातही शिवजयंती साजरी झाल्याचे उल्लेख सापडतात. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील नेत्यांपेक्षा महाराष्ट्राच्या बाहेरील नेत्यांनी टिळकांच्या शिवजयंतीचे फार कौतुक केलेले आपल्याला दिसते. अनेक इंग्रज इतिहासकार, तत्कालीन सरकारी अधिकारी यांनी नंतरच्या काळात आपल्या आठवणी लिहिल्या, त्यात टिळकांच्या शिवजयंती आणि गणेशोत्सवाचे तोंड भरून कौतुक केल्याचे दिसते. समग्र हिंदुस्थानात शिवाजी महाराजांची कीर्ती यामुळे पसरली आणि शिवजयंतीच्या उत्सवाला टिळकांच्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
स्वातंत्र्याला ७० वर्षं उलटून गेल्यानंतर आजही आपण देशात शिवजयंती करतो, आज हा उत्सव आम्ही कुठे नेऊन ठेवला आहे, हा प्रश्न आपण स्वतःला कठोरपणे विचारायला हवा असे वाटत नाही का?
(टिळक आणि शिवजन्मोत्सव - प्रकरण समाप्त)